ऊसतोड मजूर कारखान्यावरच, बीड जिल्ह्यात श्रेय-आरोपांचा रंगला राजकीय फड 

दत्ता देशमुख
Sunday, 19 April 2020

मजूर कारखान्यावरच असले, तरी हा निर्णय कोणामुळे झाला आणि निर्णयाला उशीर का झाला यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये श्रेयवाद आणि आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरवात झाली आहे.

बीड - कारखान्यावर अडकलेल्या ऊसतोड मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याबाबतचा शासनादेश शुक्रवारी (ता. १७) निर्गमित झाला; परंतु आदेशातील नियम व सध्याची लॉकडाउन आणि संचारबंदी यामुळे मजुरांना परतायला आणखी दोन तीन दिवस आरामाने लागणार आहेत.

मजूर कारखान्यावरच असले, तरी हा निर्णय कोणामुळे झाला आणि निर्णयाला उशीर का झाला यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये श्रेयवाद आणि आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरवात झाली आहे. इकडे ही मंडळी एकमेकांचे उणे-दुणे काढत असली तरी तिकडे मजूर आज तरी त्याच परिस्थितीत आहेत. 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

त्यांनी अकलेचे दिवे पाझळू नयेत : बजरंग सोनवणे 
शासनादेशामुळे महाराष्ट्रभरातील ऊसतोड मजुरांना स्वत:च्या घरी येता येणार आहे. १६ एप्रिलला शासनाने अधिसूचना काढून १७ एप्रिल आदेश निर्गमित केले आहेत; परंतु जाणीवपूर्वक तो आदेश चार दिवस निर्गमित होऊ दिला नाही, असे सांगत अक्षय मुंदडा यांनी ज्ञानाची पातळी किती आहे? हे दाखवून दिल्याचा टोला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी लगावला आहे. ज्या दिवशी कोणतीही अधिसूचना निघते त्याच्या नंतरच शासन आदेश निर्गमित होत असतात हे त्यांना कळायला हवे. यापुढे अभ्यास करा आणि नंतर सोशल मीडियावर बोला, उगीच स्वतःचे हसू करून घेऊ नका, असा सल्लाही श्री. सोनवणे त्यांनी दिला. 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

पंकजा मुंडेंनी गोपीनाथराव मुंडेंची कमी भासू दिली नाही : राजेंद्र मस्के 
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच पंकजा मुंडे या संकटकाळात ऊसतोड मजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्या. अखेर शासनाने काढलेल्या आदेशाने ऊसतोड कामगारांना दिलासा मिळाला. गोपीनाथराव मुंडे यांची कमी पंकजा मुंडे यांनी भासू दिली नाही, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले. या लढ्याचे श्रेय त्यांनाच असल्याचे श्री. मस्के म्हणाले. फुकटचे श्रेय कोणी घेऊ नये, असेही श्री. मस्के म्हणाले. 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...

पंकजा मुंडेंच्या लढ्याचे श्रेय इतरांनी लाटू नये : अक्षय मुंदडा 
विविध भागांत अडकलेल्या मजुरांनी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या व्यथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मांडल्या. मजूर आणि त्यांच्या लेकराबाळांची होणारी आबाळ पाहून भावनाविवश झालेल्या पंकजा मुंडेंनी सर्व मजुरांची तपासणी करून सुरक्षितपणे घरी पाठवावे, अशी मागणी सरकारकडे लावून धरली. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू ठेवली. अखेर त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले. ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचे संपूर्ण श्रेय हे पंकजा मुंडे यांच्या लढ्याला आहे, असे भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा म्हणाले. त्यांनी आक्रमक मागणी लावून धरल्यानंतर जाग आलेल्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असेही श्री. मुंदडा म्हणाले. शासन आदेशाच्या तारखेत खाडाखोड का, असा सवालही त्यांनी उपस्थित करीत हा निर्णय १३ तारखेलाच झाला; परंतु, विनाकारण उशीर केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

धनंजय मुंडेंनी आमच्या मनात घर केलं : नंदकुमार मोराळे 
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारच्या माध्यमातून राज्यात अडकलेल्या दीड लाखाहून अधिक ऊसतोड मजुरांचा घरवापसीचा मार्ग मोकळा करून दिला. मजुरांची वाट पाहणाऱ्या आमच्या बांधवांची मदत करून आमच्या मनात कायमचं घर केलं आहे, असे राष्ट्रवादीचे केज तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे म्हणाले. सरकारने संचारबंदीच्या काळात सातत्याने सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केला. सुरवातीलाच या मजुरांना गावी आणण्याबाबत मुंडे यांनी आश्वस्त केले होते, असेही श्री. मोराळे म्हणाले. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

धनंजय मुंडेंनी खंबीर पालकत्व सिद्ध केले : आप्पासाहेब राख 
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सातत्याच्या प्रयत्नांनीच मजुरांना गावी पाठविण्याचा निर्णय झाला. यामुळे हजारो कामगार जिल्ह्यात परतणार आहेत. मागील मंत्रिमंडळ बैठकीत मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी व पाठपुरावा केला होता. धनंजय मुंडे यांनी आपले दमदार पालकत्व सिद्ध केल्याचे आप्पासाहेब राख म्हणाले. 

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

धनंजय मुंडे त्या उपसमितीचे सदस्यच नाहीत :  संगीता धसे 
मंत्रिमंडळाच्या ज्या कॅबिनेट उपसमितीच्या बैठकीत ऊसतोड कामगारांचा निर्णय झाला त्या उपसमितीचे पालकमंत्री धनंजय मुंडे साधे सदस्य देखील नाहीत, मग त्याचे श्रेय कसले घेता? असा सवाल भाजप महिला आघाडीच्या ॲड. संगीता धसे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांचे राजकारणच मुळात पंकजा मुंडे यांच्यावर टीका करण्यासाठी आहे. त्यांना ऊसतोड कामगारांचा प्रश्न सोडविता आला नाही, तो प्रश्न पंकजा मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून सोडविला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The political accusations in beed district