वंशाचा दिवा नसताना तिने पणतीलाच प्रज्वलीत केले..!

केज न्यूज.jpg
केज न्यूज.jpg

कडा (जि. बीड) : जग २१ व्या शतकात गेले असले तरी गरीब-श्रीमंत तसेच शिक्षित समाजात आजही मुलगा-मुलगी भेदभाव नवा नाही. वंशाचा दिवा तेवत ठेवण्यासाठी कुटुंबात बहुतेकांना मुलगाच लागतो. 

परंतु कडा (ता आष्टी) येथील साधना सैदू जाधव या अल्पशिक्षित आणि समाजातील अगदीच दुर्बल घटकातील गरीब कुटुंबातील महिलेने काबाडकष्ट करून आपल्या मुलींना घडविले. वंशाचा दिवा घरात नसताना तिनं पणतीलाच प्रज्वलीत केले. 

आई साधनाने आपल्या मुलींसाठी केलेली साधना शेवटी फळास आली. आपल्या दोन मुली शिक्षिका तर लहान मुलगी कर सहायक अधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली. साधनाने केलेल्या कष्टाचे कोमलने फलीत केले. मोठी मुलगी कीर्ती जाधव ही आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालयात तर दुसरी मुलगी शिल्पा जाधव ही कडा येथील खासगी संस्थेत संगणक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षाचा निकाल मागील आठवड्यात नुकताच जाहीर झाला आहे. आष्टी तालुक्यातील कडा या ग्रामीण भागातील कोमल सैदू जाधव या मुलीची मंत्रालयात मंगळवारी (ता.१४) लिपिक म्हणून निवड झाली तर मंगळवारी (ता.२१) जाहीर  झालेल्या निकालात कर सहायक अधिकारी परीक्षेत ती उत्तीर्ण झाली आहे. 

विशेष म्हणजे एन.टी. (ब) या प्रवर्गातून महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक तिने पटकावला आहे. कोमल जाधव चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कडा येथे तर पदवीचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून, डी.एड पुणे येथे तर पदवीत्तर पदवीचे शिक्षण लातूर येथे पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाले पुढे काय ? असा प्रश्न कोमल समोर होता. नंतर आईला मदत होईल म्हणून कोमलने कडा येथे दोन वर्षे क्लास घेतले. 

मावसबहीण ही लातूर येथे पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली. तीला पाहून मी अधिकारी का होऊ शकत नाही असा प्रश्न तिने स्वतःलाच विचारला. कोमलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाची तयारी सुरु केली.  दोन वेळेस परीक्षा दिल्या परंतु यश मिळाले नाही. मंगळवारी (ता.१४) ला निकाल आला त्यामध्ये मंत्रालयात लिपिक म्हणून निवड झाली. तर पुन्हा मंगळवारी (ता.२१) लागलेल्या अन्य एका परीक्षेच्या निकालात कर सहायकपदी निवड झाली. जुलै महिन्यातील आठ दिवसात दोन सुखदवार्ता मिळाल्या. शेवटी अधिकारी व्हायचे स्वप्नं पूर्ण झाले. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com