डाक विभागाच्या अधिकाऱ्यांना खा. राजेनिंबाळकरांचा सज्जड दम ! 

omraje ninbalkar.jpg
omraje ninbalkar.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये डाक विभागामध्ये गुंतवणुक केलेल्या नागरीकांच्या पैशामध्ये तीन ठिकाणी अपहार होण्यासारखे गंभीर प्रकार घडले आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्यांकडू पैसे वसूल करण्यासाठी कार्यवाही सूरु करावी, अशा सुचना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी डाक विभागातील अधिकार्याना दिल्या. जर हे काम त्वरीत झाले नाही. तर मला यात लक्ष घालावे असे सांगत त्यांनी अधिकार्यांना सज्जड दम दिला आहे. 

शिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात खासदार राजेनिंबाळकर यांनी डाक विभागामार्फत विविध योजना संदर्भात सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. 

डाक विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या पाच वर्षीय डाकघर आवर्ती जमा खाते (आर.डी.), डाकघर सावधी जमा खाते (टी.डी.), डाकघर मासिक आय योजना खाते (एम.आई.एस.), वरिष्ठ नागरिक बचत योजना (एस.सी.एस.एस.), १५ वर्षीय सार्वजनिक भविष्य निधि खाते (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र (एन.एस.सी), किसान विकास पत्र (के.वी.पी.), सुकन्या समृध्दी योजना विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. 

ग्रामीण भागामध्ये शेतकरी, शेतमजूर, निरक्षर नागरिकांचे पैसे पोस्ट ऑफिस मध्ये आहेत. यामध्ये बोर्डा, निपाणी, वाशी या ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वच पोस्ट ऑफिसच्या निरिक्षकामार्फत पाहणी करून अहवाल देण्याचे आदेशही खासदार राजेनिंबाळकर यानी अधिकाऱ्यांना दिले. संबंधित खातेदारांच्या तक्रारीसाठी पोस्ट ऑफिसमध्ये दर्शनी भागावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक लावावेत, जेणेकरुन खातेदाराना त्वरीत त्यांच्याकडे तक्रार किंवा दाद मागता येईल. झालेल्या प्रत्येक व्यवहाराची पावती देवून तात्काळ ऑनलाइन नोंद घेण्याच्या सुचना देण्यात याव्यात. यामुळे गैरव्यवहाराचे प्रमाण कमी होईल व पोस्टाच्या व्यवहारात पारदर्शकता येण्यास मदत होईल अशाही सुचना त्यानी दिल्या.

गैरव्यवहारामुळे पोस्ट ऑफीसची प्रतिमा मलिन होत चालली आहे. ती बदलून पुन्हा एकदा लोकांच्या विश्वासास पात्र राहण्यासंबधी जे काही करता येईल ते करा अशा कडक शब्दात खासदार राजेनिंबाळकर यानी अधिकाऱ्यांना बजावुन सांगितले. डाकघरामध्ये जनजागृती करणारे फलक लावण्यात यावेत. त्याचप्रमाणे डाकविभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या हिताच्या योजनांची प्रसिध्दी करण्यात यावी. याबाबत सूचना करण्यात आल्या. बैठकीला डाकघर अधिक्षक उस्मानाबाद डाक विभाग बी. रवीकुमार, सहायक अधिक्षक, डाकघर उस्मानाबाद उपविभाग एस. एस. रणखांब, सहायक अधिक्षक एस. पी. कोळपाक, भूम उपविभागाचे डाकनिरिक्षक एस. जे. माने, उमरगा येथील आर.जी. जेठे आदी अधिकारी उपस्थित होते. 

(संपादन-प्रताप अवचार) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com