‘क्वारंनटाइन झोन’सह इतरही ठिकाणी घ्यावी लागणार दक्षता

अभय कुळकजाईकर
Sunday, 26 April 2020

नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आता पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यापासून खबरदारीच्या उपाययोजना आणखी वाढविण्यात आल्या आहेत.
 

नांदेड : कोरोनाशी महिनाभर लढा दिल्यानंतर बुधवारी (ता. २२) नांदेडला एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पिरबुऱ्हाणनगर आणि आजूबाजूचा परिसर हा ‘क्वारंनटाइन झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हा रुग्ण आढळल्यानंतर आता क्वारंनटाइन झोनसह इतरही महत्वाच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आणखी खबरदारी आणि दक्षता घ्यावी लागणार आहे.

नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आता पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यापासून खबरदारीच्या उपाययोजना आणखी वाढविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - कोरोना : ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी-आशा सेविकांची वाट बिकट

२० कोविड केअर सेंटरची स्थापना
कोरोनामुळे देशभरात ता. तीन मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हा आणि राज्य सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. शहर आणि जिल्ह्यात २० कोविड - १९ केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरोना रुग्णासाठी तीन हजार पन्नास बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरोनाचे संशयित आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

शहरातही कोरोना केअर सेंटरची स्थापना
जिल्हास्तरावर शासकीय आयुर्वेद रुग्णालय आणि श्री गुरुगोविंदसिंगजी स्मारक रुग्णालयात कोरोना केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील हदगाव, देगलूर, किनवट, अर्धापूर व लोहा येथे कोरोना केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी ४८० बेडची व्यवस्थआ करण्यात आली आहे. या ठिकाणी संशयित व मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

हे देखील वाचाच - Video - लॉकडाउन : स्ट्रेस कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, मुखेड उपजिल्हा रुग्णालयासह नांदेड शहरातील ग्लोबल हॉस्पीटल, यशोसाई हॉस्पीटल, अभ्युदय लाईफ केअर हॉस्पीटल, संजीवनी हॉस्पीटल, नंदीग्राम हॉस्पीटल, अश्‍विनी हॉस्पीटल या ठिकाणी ७७० बेडच्या क्षमतेचे कोविड हॉस्पीटल तयार करण्यात आले आहे. येथे संशयितासह तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

क्वारनटाइन रुग्णांचेही समुपदेशन
कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना तसेच जिल्ह्याबाहेरुन आलेल्यांना संस्थात्मक तसेच होम क्वारनटाइन करण्यात येत आहे. या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांना समुपदेशनही करण्यात येत आहे. तसेच कॅम्पच्या ठिकाणी योग, मेडिटेशन आदी बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. जिल्ह्यात ग्रामिण भागात १६ तालुका आरोग्य अधिकारी, ६८ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नागरी रुग्णालयाचे वैद्यकीय, आयुर्वेद व युनानी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी, फिरत्या पथकाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह औषध निर्माण अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती अशा एकूण तीन हजार ६४४ जण कार्यरत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Precautions should be taken in other places ‘Quarantine Zone’ Nanded News