परिवर्तनवादी चळवळीचे नेते प्राचार्य कॉम्रेड डॉ. विठ्ठल मोरे यांचे निधन

dr more.jpg
dr more.jpg

लातूर : ज्येष्ठ विचारवंत, परिवर्तनवादी चळवळीचे नेते प्राचार्य कॉम्रेड डॉ. विठ्ठल मोरे (वय ७१) यांचे शुक्रवारी (ता. १८) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी जयक्रांती महाविद्यालयाच्या प्राचार्य कुसुमताई मोरे, मुलगा प्राचार्य संग्राम मोरे, मुलगी प्रा. क्रांती मोरे  असा परिवार आहे.

डॉ. मोरे यांनी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, शेतमजूर, कामगार, अंगणवाडी कार्यकर्ते अशा विविध शोषित घटकांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण आयुष्य काम केले. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी युवक संघटनांचे ते महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष होते. प्राध्यापकांच्या मुक्टा व एमफुक्टो या संघटनांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. विद्यापीठाच्या सिनेट, व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, तक्रार निवारण समितीचे अध्यक्षही ते राहिले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचेही ते सभासद राहिले आहेत.

छात्र संघर्ष, युवा संघर्ष व क्रांतीज्योत या नियतकालिकांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. सध्या `विचार मंथन` या राज्यशास्त्र विषयातील संशोधन पत्रिकेचे प्रमुख संपादक होते. तसेच माकपचे मुखपत्र `जीवन मार्ग` या साप्ताहिकाच्या ते संपादक मंडळावर होते. वाशी (जि. उस्मानाबाद) येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात येथे तीस वर्षे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

रेणापूरच्या शिवाजी महाविद्यालय व किल्लारी येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्षही ते राहिले होते. राज्यशास्त्र या विषयातील मौलिक योगदानाबद्दल त्यांना प्रा. दत्ता चौघुले स्मृती पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार व विशेष सेवा योगदान व उपक्रमशीलचेबद्दल स्वामी विवेकानंद भूषण पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांचा गौरवही झाला होता. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीवर शोककळा पसरली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com