कुरेशी समाजाला प्रथमच औसाच्या नगराध्यक्षपदाचा मान!

जलील पठाण
Friday, 6 November 2020

  • अफसर शेख यांचे एक दूरदृष्टी पाऊल.
  • मराठा समाजानंतर प्रथमच कुरेशी समाजाचे अलिशेर कुरेशी यांना प्रभारी नगराध्यक्षपदी निवड.  

औसा (लातूर) : औसा नगरपालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यावर लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची संधी सर्व समाजाला देण्यात येईल आणि स्वीकृत नागरसेवक पदावर शहरातील मागास प्रवर्गातील व्यक्तीला प्राधान्य देण्याचे घोषित केले होते. त्या प्रमाणे भरत सुर्यवंशीच्या रूपाने प्रथम मराठा आणि आता अलिशेर कुरेशीच्या रूपाने कुरेशी समाजाला इतिहासात प्रथम नगराध्यक्ष म्हणून आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. गुरुवारी (ता. ५) रोजी त्यांनी रजेवर जात नागराध्यक्षपदाचा प्रभारी पदभार उपनगराध्यक्ष अलिशेर कुरेशी यांच्याकडे सोपविला.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

२०१६ मध्ये नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली वीस जागा असलेल्या पालिकेवर स्वतः लोकांमधून नगराध्यक्ष म्हणून बाजी मारली. तर राष्ट्रवादीचे बारा नगरसेवक निवडून आणले. यात भारतीय जनता पक्षाचे सहा तर काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले. पूर्ण बहुमत मिळाल्यावरही श्री. शेख यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करणार असून समाजातील सर्व घटकांना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद देऊ आणि स्वीकृत सदस्यपदी मागास जातीतील लोकांना संधी देण्याची घोषणा केली होती. बोलल्या प्रमाणे त्यांनी भरत सूर्यवंशी यांना सहा महिने प्रभारी नगराध्यक्ष करून मराठा समाजाला प्रथमच संधी दिली. तर दुसऱ्यांदा त्यांचेच चुलत भाऊ जावेद शेख यांचे काम पाहून नागराध्यक्षपदाची संधी दिली. त्यांनीही या संधीचे सोने करीत पंतप्रधान आवास योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली. शहरात सर्वत्र एलईडी लाईट बसवून पालिकेचा लाखों रुपयांचा विजबिलाच बोजा कमी केला तर त्यांच्याच कार्यकाळात शहराच्या हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गुरुवारी (ता.५) रोजी डॉ. शेख यांनी कुरेशी समाजाचे अलिशेर कुरेशी यांच्याकडे प्रभारी नागराध्यक्षपदाची सूत्रे देत कुरेशी समाजालाही पहिल्यांदाच हा मान मिळवून दिला. पुढे एखाद्या महिलेला हा मान दिला जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. स्वीकृत सदस्यपदी प्रथम लक्ष्मीकांत बनसोडे, विनायक सूर्यवंशी, सत्तार बागवान, रुपेश दुधनकर यांना संधी देऊन राजकारणाचा समतोल साधला आहे. औसा शहरात कुरेशी समाज जास्त असल्याने त्यांनाही नगराध्यक्षपदाची संधी दिली पाहिजे हे ध्यानात ठेवून डॉ. अफसर शेख यांनी आगामी निवडणुकीचे गणित मांडले असल्याचे दिसून येत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Qureshi community honored as first mayor Ausa