शहीद दिन :  भगतसिंगाच्या विचारांची आजच्या काळात प्रासंगिकता 

File photo
File photo

ब्रिटीशांच्या अन्यायी व अत्याचारी  राजवटीतून भारतमातेला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या क्रांतिकारकांच्या मालिकेतील मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणारे शहीद भगतसिंग हे एक जाज्वल्य देशभक्तीचा अभिमान असणारे क्रांतिकारक होते. म्हणूनच त्यांना ‘शहीद- ए -आझम’ ही उपाधी  देवून  सन्मानाने गौरविले जाते. आपल्या जेमतेम साडेतेवीस वर्षाच्या काळात ते एक क्रांतिकारक म्हणून सर्वपरिचित तर होतेच; याशिवाय एक प्रसिद्ध लेखक, विचारवंत, पत्रकार, तत्वज्ञानी व व्यासंगी अभ्यासक म्हणून जगातील क्रांतिकारकांच्या इतिहासात त्यांनी मानाचे स्थान मिळविले. 

का गरज आहे भगतसिंगांच्या विचारांची
भगतसिंगांनी आपल्या उभ्या आयुष्यात भांडवलशाही, साम्राज्यवाद, धर्मांधता, जातीयता, अनिष्ट चाली, प्रथा-परंपरा, व्यसनाधीनता इत्यादी शत्रूंचा जाहीर विरोध केला. हे सर्व शत्रू आजही जशास तसे समाजासमोर उभे आहेत. त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी भगतसिंगांच्या विचाराची आजही  तितकीच गरज आहे.आज भांडवली व्यवस्थेने शोषणाचे उग्र स्वरूप धारण केले असून त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. मुळात भांडवली व्यवस्था ही विषमतेवर आधारलेली असून श्रीमंत श्रीमंत आणि गरीब अधिकच गरीब बनत चालला आहे. ही विषमतेवर आधारलेली व्यवस्था उलथवून टाकून समतावादी समाज निर्माण करण्यासाठी भगतसिंगांनी जीवाचे रान केले.

समताधिष्ठीत समाज निर्माण व्हावा
स्वातंत्र्यानंतरही भांडवलदारी व्यवस्था राहणार हे ओळखून आपल्या अखेरच्या संदेशात भगतसिंगांनी म्हटले होते, ‘स्वातंत्र्याचा सूर्योदय होईल तेव्हा मी असणार नाही. पण मला खात्री आहे की, माझे विचार मात्र या आसमंतात दरवळत राहतील. हे विचार साम्राज्यवादी आणि भांडवलदारी शोषणकर्त्याचा शेवटपर्यंत मुकाबला करीत राहतील". भगतसिंगाचे हे भाकीत स्वातंत्र्यानंतर खरे ठरले. आज आपल्यासमोर ही भांडवली व्यवस्था आणि त्यामधून विषमतेवर आधारित निर्माण झालेले वर्गीय वर्चस्व एक आव्हान म्हणून उभे आहे. भगतसिंगाच्या विचारांची कास धरून  समताधिष्ठित  समाजाच्या निर्मितीसाठी आपणास प्रयत्न करावे लागणार आहेत.

विचारांची लढाई विचारांनीच लढावी लागते
धर्मांधता व जाती व्यवस्थेच्या विरुद्धही भगतसिंगांनी निकराचा लढा दिला. भगतसिंग म्हणतात, ‘जो धर्म माणसाला माणसापासून अलग करतो, प्रेमाच्या ऐवजी त्यांना परस्परांची घणा करायला शिकवितो, अंधश्रद्धांना उत्तेजन देतो, तो माझा धर्म कधीच असणार नाही. जो माणसाला सुखी करू शकतो, समता, समृद्धी आणि बंधुभावाच्या मार्गावर नेऊ शकतो तो माझा धर्म आहे’. यामधून धर्माविषयी भगतसिंगाचे विचार किती स्पष्ट होते हे लक्षात येते. आज आपल्या देशात धर्मांध व जात्यंध शक्तीने अक्षरशः  हैदोस घातला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक  कलबुर्गी, गौरी लंकेश अशा अनेक विचारी आणि विवेकाची कास धरून चालणाऱ्या निरपराधांना  आपला जीव गमवावा लागला आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढावी, हातात शस्त्र घेऊन विचारासोबत लढता येत नाही.  हा विचारही धर्मांध शक्तींना मान्य नाही.  

एकजुटीने लढा उभारण्याची गरज
व्यक्तींना मारल्याने  विचार मारले जात नाहीत, याचाही विसर या धर्मांध शक्तींना  पडलेला दिसतो. भगतसिंग एके ठिकाणी म्हणतात, ‘व्यक्तींना ठार मारणे सोपे असते; पण विचारांना ठार मारणे अवघड असते’ म्हणून  धर्मांध शक्तीने  अनेक विचारी लोकांचा बळी घेतल्यानंतरही  त्यांचे विचार घेऊन बरेच जण या शक्तीविरुद्ध धैर्याने लढताहेत, यातच त्यांच्या विचारांचा विजय आहे. धर्म आणि जातीच्या  नावावर माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करणारा धर्म भगतसिंग यांना अजिबात मान्य नव्हता. म्हणून भगतसिंगांनी आपल्या उभ्या हयातीत या धर्मांध आणि जात्यंध शक्तीचा निकराने विरोध केला. आजच्या काळात या शक्ती विरुद्ध एकजुटीने लढा उभा करून समतेवर आधारित समाज निर्मिती करण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागणार आहेत.
 
काय होते भगतसिंगांचे स्वप्न
भगतसिंगाच्या विचारसरणीतील आणखी एका पैलूचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. भगतसिंगांची लढाई केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरतीच मर्यादित नव्हती तर ती सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी होती. ब्रिटीशांच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्याबरोबरच समाजवादी रचनेवर आधारित समाज निर्माण करण्याचे  भगतसिंगाचे स्वप्न होते. सर्व माणसांच्या काही अत्यावश्यक गरजा आहेत. सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या अत्यावश्यक गरजा भागविण्याची  सोय  होणे म्हणजे  समाजवाद,  अशी भगतसिंगांनी व्याख्या केली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘क्रांती म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी साम्राज्यवादी, भांडवली समाजव्यवस्था संपूर्ण उलथवून टाकून तिच्या जागी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे.’  

निखळ मानवतावादी विचारांचा केला पुरस्कार
स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी समाजवादाचा पुरस्कार केला. परंतू  पुढे पुढे परिस्थिती बदलत गेली आणि त्याची जागा भांडवली व्यवस्थेने काबीज केली. आजच्या बदलत्या परिस्थितीत समाजवादी व्यवस्थेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना धैर्य, चिकाटी, आत्मविश्वास, प्रचंड मेहनत आणि दृढनिर्धाराणे काम करावे लागणार आहे. जात, धर्म,  रूढी, प्रथा परंपरा इत्यादीच्या मोहजाळात अडकून न पडता भगतसिंगांनी आपल्या उभ्या आयुष्यात निखळ मानवतावादी विचारांचा पुरस्कार केला. जनतेत धर्मनिरपेक्षतेचा प्रचार व प्रसार करणे, अंधश्रद्धा, रूढी परंपरा, प्रथा नष्ट करून जनतेत शास्त्रशुद्ध व विवेकी विचार बिंबवणे इत्यादीसाठी  भगतसिंगांनी अहोरात्र कष्ट घेतले.

समाज परिवर्तनासाठी...
आजच्या समाजाला परिवर्तनाच्या वाटेवर प्रवास करताना भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्यावर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी भगतसिंगाच्या विचाराची आवश्यकता आहे. भारतमातेच्या या थोर क्रांतिकारकास कोटी कोटी प्रणाम.                                                               - प्रा. डॉ. डी. एन. मोरे,  पीपल्स कॉलेज नांदेड्

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com