माजी मंत्री निलंगेकरांनी दिलेय अमित देशमुखांना आव्हान, कलगीतुरा रंगणार?

हरी तुगावकर
Saturday, 30 May 2020

लातूर जिल्ह्यात बियाणांचा तुटवडा आहे. बांधावर खत देण्याच्या योजनेत शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे घेतले जात आहेत. पण पालकमंत्र्यांना कृषी विभागाच्या वतीने चुकीची माहिती दिली जात आहे. पीक कर्जासाठी शेतकऱय़ांना अनेक अडचणी येत आहेत.

लातूर: जिल्ह्यात बियाणांचा तुटवडा आहे. बांधावर खत देण्याच्या योजनेत शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे घेतले जात आहेत. पण पालकमंत्र्यांना कृषी विभागाच्या वतीने चुकीची माहिती दिली जात आहे. पीक कर्जासाठी शेतकऱय़ांना अनेक अडचणी येत आहेत.

वस्तुस्थिती काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांनी बाहेर पडून बांधावर यावे असे आवाहन माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी (ता. २९) दिले. बाभळगावचा किंवा निलंग्याचा बांध घ्या आम्हाला चालेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

हेही वाचा: बाहेरून आले अन् रुग्ण वाढले - चिरंजीव प्रसाद

श्री. निलंगेकर यांनी शुक्रवारी झूम ॲपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. यात ते बोलत होते. खरीप हंगाम जवळ येत आहे. कृषी विभाग कागदोपत्री आकडेवारी दाखवून मेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहे. पालकमंत्र्यांना देखील तीच माहिती दिली जात आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे. खत, बियाणांचा तुटवडा आहे. यातून बोगस बियाणे बाजारात येण्याची शक्यता आहे. पण याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. बांधावर खत दिला जात आहे, असे सांगितले जात आहे. पण यात तीनशे ते पाचशे रुपये जास्त घेतले जात आहेत.

याच्या तक्रारी वाढत आहेत. कृषी विभाग मात्र कागदावरची माहिती सांगत आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी बाहेर पडून वस्तुस्थिती काय आहे याची माहिती घेण्यासाठी बांधावर यावे. ते जर गंभीर नाही झाले तर शेतकरी अडचणीत येणार आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावे. बाभळगाव किंवा निलंग्याच्या बांधावर सर्व लोकप्रतिनिधीना घेवून बैठक घ्यावी, असे आवाहन श्री. निलंगेकर यांनी यावेळी बोलताना केले.

क्लिक करा: सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

टाळेबंदी चारमध्ये पुणे, मुंबई सारख्या ठिकाणाहून लोक येत आहेत. ते आपलेच आहेत. पण सध्याचे रुग्ण पाहता ते सर्व बाहेरून आलेलेच आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. आजून वेळ गेलेली नाही.  माझा गावा शुन्य रहावा असे म्हणत बसण्यापेक्षा बाहेर आलेल्या प्रत्येकाची स्क्रिनिंग तपासणी व्हावी. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोणत्या जिल्ह्यासाठी किती पिक कर्ज दिले जात आहे हे शासनाने जाहिर करावे.

शेतकऱयांना तलावातून काळी माती नेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. दिव्यांना साहित्य वाटप करण्यात लातूर जिल्हा परिषद देशात दुसरी असल्याची माहितीही श्री. निलंगेकर यांनी यावेळी दिली. वरील मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुरवातीला जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी दिव्यांगा देण्यात येणाऱया साहित्याबाबत माहिती दिली.

हेही वाचा- धक्कादायक: मुंबईहून गावी पळून आलेल्या जवानास कोरोना, गावही रेडझोनमध्ये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Patil Nilangekar Challenged Amit Deshmukh To Go To Farm Latur News