रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला जीव, ट्रकच्या चाकाखाली चिरडून संघ कार्यकर्त्याचा मृत्यू

अविनाश काळे
Saturday, 31 October 2020

राष्ट्रीय महामार्गावर येळी गावाजवळ ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी ( ता.३१) चारच्या सुमारास झाला.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गावर येळी गावाजवळ ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी ( ता.३१) चारच्या सुमारास झाला. दरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. शहरातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते जयंत किशनराव पाटील (वय ४९) यांना खड्ड्यांमुळे ट्रकच्या चाकाखाली येऊन जीव गमवावा लागला.

Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात

याबाबतची माहिती अशी की, शहरातील बालाजी नगर येथील राम मंदिराचे व्यवस्थापक जयंत किशनराव पाटील हे शनिवारी दुचाकीवरून (एमएच १२ सीएन ५६४८) अणदूर येथे भुजंगराव घुगे यांच्या अस्थी दर्शनासाठी गेले होते. अणदूरहुन उमरगाकडे परत येताना राष्ट्रीय महामार्गावर येळी गावाजवळ आले असताना सोलापूरहुन हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच १२ एचडी १८०१) पाठी मागून जोरदार धडक दिल्याने जागेवर दुचाकी चालक जयंत पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

भाजप कार्यकर्त्याच्या हत्येची पाकिस्तानी झेंडा जाळून युवा मोर्चाने केला निषेध

पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ग्रामविकास परिवर्तन संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. ग्रामीण भागात संघाचे विचार व गो आधारित शेतीचा प्रचार व प्रसार करणारे एकनिष्ठपणे काम करणारे कार्यकर्ते होते. त्यांच्या अकाली निधनामुळे, शहर, तालुका व जिल्हाभरात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून ट्रक व चालक यास ताब्यात घेतले आहे. सांयकाळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया रात्री सुरू होती. या प्रकरणी उमरगा पोलिसांत रात्री उशीरा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangh Activist Dies In Truck Accident Umarga