धनंजय मुंडेंची जागा संजय दौंड यांना, शरद पवारांचे एका दगडात अनेक पक्षी

दत्ता देशमुख
बुधवार, 15 जानेवारी 2020

धनंजय मुंडे यांची विधान परिषदेची रिक्त झालेली राष्ट्रवादीच्या वाट्याची जागा कॉंग्रेसच्या संजय दौंड यांना देऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या उमेदवारीतून एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

बीड - राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहायमंत्री धनंजय मुंडे यांची रिक्त झालेली राष्ट्रवादीच्या वाट्याची जागा कॉंग्रेसच्या संजय दौंड यांना देण्यात आली आहे. दौंड यांची उमेदवारी आणि दृष्टिक्षेपात असलेली आमदारकी भविष्यातील अनेक समीकरणांची नांदी आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या उमेदवारीतून एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. सामान्यांना दिलेला शब्द पाळतो, हे मात्र पवारांनी पक्के करून दाखविले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर कॉंग्रेसमधील दिग्गज मंडळी राष्ट्रवादीत गेली. त्यामुळे आघाडीत कॉंग्रेस राज्यात मोठा भाऊ असला, तरी जिल्ह्यात लहान भाऊच राहिला.

हेही वाचा - राष्ट्रवादीचा वाटा पडला काँग्रेसच्या संजय दौंड यांच्या पदरात

मागच्या सत्तेच्या काळात कॉंग्रेसने एम. एम. शेख, श्री. पांडुळे आदींना आमदारकी दिली तरी त्यांचा जिल्ह्याशी काहीही संबंध नव्हता. रजनी पाटील यांना कॉंग्रेसने खासदारकी दिली; पण त्यांचा जिल्ह्याशी संपर्क कमी पडला. त्यामुळे कॉंग्रेसची ताकद कायम क्षीण होत गेली. आताच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या वाट्याची परळीची जागाही राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्यासाठी सोडावी लागली.

हेही वाचा - बीड झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांची अधिकृत निवड जाहीर

त्यामुळे आहे त्या कार्यकर्त्यांना फक्त आघाडीचा धर्म पाळण्याशिवाय गत्यंतर नव्हते; परंतु धनंजय मुंडेंसाठी खुद्द शरद पवार आणि अजित पवारांनी माजी मंत्री दौंड यांना प्रचाराची गळ घालत भविष्यात संधी देण्याचा शब्द दिला. त्यातून राष्ट्रवादीला फायदा झाला आणि त्याची परतफेड म्हणून कॉंग्रेसच्या संजय दौंड यांना राष्ट्रवादीच्या वाट्याची उमेदवारी दिली. 

हेही वाचा - अबब...बीडमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी!

एकप्रकारे राष्ट्रवादीच्याच फायद्यासाठी उमेदवारी देत कॉंग्रेसच्याही डोक्‍यावर हात ठेवण्यात आला आहे; पण या उमेदवारी आणि आमदारकीचे अनेक राजकीय पैलू निघत आहेत. सर्वप्रथम शरद पवार हे दिलेला शब्द पाळतात, हे सिद्ध झाले आहे; परंतु आगामी चार-पाच महिन्यांनी विधान परिषदेच्या इतर काही जागांच्या निवडणुका आणि राज्यपालांकडून आमदारांच्या नियुक्‍त्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलीम आदींच्या वाटेत आतापासूनच अडथळा निर्माण झाला आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

चारच महिन्यांत पक्षाकडून दुसरी आमदारकी मागणे जड जाणार आहे. त्यात मुंडेंच्या विजयात हातभार म्हणून दौंड यांना आमदारकी भेटणार असली, तरी त्याचा धनंजय मुंडेंना फायदा होणार की तोटा, हे भविष्यात कळणार आहे. वरकरणी आज धनंजय मुंडे यांना फायदा होईल असे वाटत असले, तरी भविष्यात दोघांत (पंकजा मुंडे, धनंजय मुंडे) तिसरा असाही पर्याय दौंड यांच्या माध्यमातून पवारांच्या हाती असू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Daund Gets Dhananjay Munde's Legislative Council Seat