जालना कोविड हॉस्पिटल : सात इन, चार आऊट 

महेश गायकवाड
Saturday, 13 June 2020

कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या शहरातील शंकरनगरमधील ४२ वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी (ता. १२) उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाचा जिल्ह्यातील हा आठवा बळी आहे. दरम्यान, सात संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २५५ वर पोचली आहे. तर उपचारानंतर तीनजणांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. 

जालना - कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या शहरातील शंकरनगरमधील ४२ वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी (ता. १२) उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाचा जिल्ह्यातील हा आठवा बळी आहे. दरम्यान, सात संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २५५ वर पोचली आहे. तर उपचारानंतर तीनजणांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. 

अंबड शहरातील मदिना चौक परिसरातील ६५ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी (ता. ११) मृत्यू झाला होता; तसेच २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाचा जिल्ह्यात उद्रेक दिसून आला. त्यातच शुक्रवारी शहरातील शंकरनगर येथील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. हा रुग्ण फुप्फुसाचा जंतुसंसर्ग व हृदयाच्या आजाराने ग्रस्त होता. ता. पाच जून रोजी अत्यवस्‍थ स्थितीत तो जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा : आठवणींना जोडणारा लोखंडी पूल

दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यातील पुन्हा सात संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात अंबड शहरातील नाईकवाडी मोहल्ला भागातील पाच, जालना शहरातील जयनगर येथील एक व राज्य राखीव दलातील एका जवानाचा समावेश आहे; तसेच कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी चार रुग्णांवर यशस्‍वी उपचार करण्यात आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील व्यंकटेशनगरमधील ३३ वर्षीय पुरुष, मोदीखाना भागातील ७६ वर्षीय महिला, २३ वर्षीय पुरुष व ३८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

हेही वाचा : जुईत पाऊस थुईथुई... 

जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांपैकी आठ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी वाढलेल्या सात रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २५५ झाली आहे. त्यापैकी १४९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

कोळी सिरसगाव येथील दहा व्यक्तींचे अलगीकरण 

नातेवाइकाच्या अंत्यसंस्‍काराला गेलेल्या कार्यक्रमातील एक व्यक्ती औरंगाबाद येथे पॉझिटिव्ह आढळून आला. त्याच्या संपर्कात अंबड तालुक्यातील एक व्यक्ती आला होता. त्यामुळे त्याच्यासह कुटुंबातील दहा व्यक्तींचे शुक्रवारी (ता. १२) अंबड येथील कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरण करण्यात आले आहे. 
नातेवाइकाचा अंत्यसंस्‍कारासाठी कोळी सिरसगावातील एक व्यक्ती नगर जिल्ह्यातील तीसगाव येथे गेला होता. या अंत्यसंस्‍कार कार्यक्रमात जमलेल्यांपैकी औरंगाबाद येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला. त्यामुळे या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना कोळी सिरसगाव येथील एका व्यक्तीची माहिती समोर आली. त्यामुळे औरंगाबाद येथील आरोग्य विभागाने कोळी सिरसगाव येथील सरपंचाला संपर्क करून याबाबत माहिती दिली. त्यांनी तातडीने आरोग्यसेवक नितीन बिबे यांच्यांशी संपर्क करून गावातील कुटुंबाचे सर्वेक्षण केले व संपर्कात आलेल्या कुटुंबातील दहा व्यक्तींचे अंबड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात अलगीकरण केल्याची माहिती आरोग्यसेवक बिबे यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven Corona report positive and three negative in Jalna