शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी आता 'पॅकेज' 

2nrega.jpg
2nrega.jpg

लातूर : जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांच्या प्रयत्नांतून मोठ्या संख्येने शेत, पाणंद व शिवरस्त्यांवरील अतिक्रमणे दूर करून लोकसहभागातून कच्चे रस्ते तयार करण्यात आले. या रस्त्यांचे मजबुतीकरण करून ते पक्के करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (नरेगा) निधी उपलब्ध होतो. मात्र, कुशल व अकुशल कामाचे प्रमाण राखता येत नसल्याने अडचण होऊन रस्त्यांची कामे तडीस जात नाहीत. यावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पॅकेजची संकल्पना पुढे आणली आहे. रस्त्यांच्या कामाला जोडून गावात आणखी कामे मंजूर करून त्यातून कुशल व अकुशल कामाचे प्रमाण राखून रस्त्यांची कामे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 


शेतीसाठी रस्ता महत्त्वाचा आहे. शेतरस्त्यामुळे नेहमीच शेतकऱ्यांत वाद उद्‍भवतात. हाणामारीपासून खुनापर्यंत हे प्रकरण जातात. अनेक रस्त्यांची प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत. यामुळेच श्री. डवले यांनी जिल्ह्यात शेत, पाणंद व शिवरस्त्यांवरील अतिक्रमणे काढून त्यावर शेतकऱ्यांच्या सहभागाने कच्चे रस्ते तयार करण्याची मोहीम राबवली. त्यांची मोहीम राजस्व अभियानातून अखंडपणे सुरू आहे. मोहिमेला शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिल्याने हजारो किलोमीटर लांबीचे कच्चे रस्ते तयार झाले. नरेगातून या रस्त्यांचे मजबुतीकरण करून ते पक्के करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, ते तडीस गेले नाहीत. रस्त्यांच्या कामात चाळीस टक्के कुशल तर साठ टक्के अकुशल कामांचे प्रमाण आहे.

हे प्रमाण राखून रस्त्यांची कामे पूर्ण करणे शक्य नाही. काही गावांनी अन्य योजनांतून अकुशल कामांचे प्रमाण वाढविल्याने त्या भागातील रस्त्यांची कामे झाली. सर्वच गावांना हा फॉर्म्युला उपयोगात आणता आला नाही. अकुशलचे प्रमाण कमी असलेल्या कामांनाच बहुतांश ठिकाणी प्राधान्य दिले जाते. यामुळे अलीकडच्या काळात रस्त्यांचे कामे बंद पडली. नरेगातून गावाच्या शिवारात केलेल्या विविध कामांतून कुशल व अकुशल कामांचे प्रमाण निश्चित केले जाते. हेच प्रमाण रस्त्याचे काम करताना साधण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. 

रस्त्यासोबत अन्य कामांची सांगड 
रस्त्याचे काम मंजूर करताना रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांना बांधबंदिस्ती, बांधावरील वृक्षलागवड, फळबागलागवड आदी अकुशल कामाचे प्रमाण जास्त असलेली कामे घेण्यास प्रवृत्त करायचे. यामुळे रस्त्याच्या कामातील अकुशल व अकुशलचे प्रमाण थोडे कमीअधिक झाले तरी अडचण येणार नाही. रस्त्यांच्या कामाशी अन्य कामांची सांगड घालून पॅकेजची संकल्पना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी पुढे आणली आहे. पॅकेजमधून रस्त्यांच्या कामांसोबत कोणत्या कामाची सांगड घालता येईल, याचा आराखडा तयार करण्यात येत असून, लवकरच तो प्रत्यक्षात येईल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले. 

रस्त्यांमुळे जमिनीला भाव 
रस्ता असल्यास जमिनीला चांगला भाव मिळतो. शेजाऱ्यांसोबत वाद टाळण्यासोबत शेती व्यवसाय करण्यासाठी असलेल्या अनेक अडचणी दूर होतात, याची जाणीव करून देऊन पॅकेजमधील अन्य कामांसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात येणार आहे. पॅकेजमुळे सिमेंट रस्ताही करणे शक्य होणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. अनेक शेतकरी नरेगातून जनावरांच्या गोठ्यांची मागणी करतात. पॅकेजमुळे शेतकऱ्यांना गोठ्यांची कामेही करता येणार आहेत. कोरोनामुळे विविध योजनांतील निधीसाठी मर्यादा आल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सरपंचांनी कामे केल्यास नरेगातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांचे कामे करणे शक्य असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com