औरंगाबाद शहरातील चौक, मुख्य रस्ते बनले धोकादायक

Square, Main Roads Become Dangerous
Square, Main Roads Become Dangerous

औरंगाबाद - शहरातील सुमारे 20 ते 25 चौकांमधील अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी खड्डे बुजविणे, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल दुरुस्ती, ट्रॅफिक बूथ, कॅट आईज, लेन मार्किंग, खड्डे बुजविणे अशी अत्यावश्‍यक कामे गरजेची असून, त्यासाठी पोलिसांतर्फे वारंवार पाठपुरावा केला जात आहे; मात्र महापालिकेतर्फे निधी नसल्याचे कारण देत या कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे शनिवारी (ता. 16) समोर आले.

आता ही अत्यावश्‍यक कामे स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 
शहरातील मुख्य रस्त्यांसह चौक धोकादायक बनले आहेत. अनेक चौकांना बेशिस्त वाहतुकीमुळे रिक्षांचा गराडा, अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे. त्यात जीवघेणे खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकवेळा अपघात होऊन नाहक बळीही जात आहेत.  दरम्यान, देशभरातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. निवृत्त न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीने व अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी दरवर्षी 10 टक्के अपघात कमी करण्यासंदर्भात विशेष प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. अपघातांमध्ये घट व्हावी, यासाठी काय प्रयत्न केले याचा आढावा रस्ते सुरक्षा समिती घेते. त्यामुळे पोलिसांतर्फे अत्यावश्‍यक कामे करण्यासाठी पोलिसांतर्फे महापालिकेला वारंवार पत्रे दिली जात आहेत; मात्र निधी नसल्याचे कारण देत ही कामे करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. त्यात स्मार्ट सिटी प्रकल्पात स्मार्ट रोडसाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; तसेच शासनाने रस्त्यांसाठी दिलेल्या शंभर कोटींतूनही काही निधी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे या निधीतून आवश्‍यक कामे करण्याचे आदेश महापौरांनी दिले. बैठकीला उपायुक्त मंजूषा मुथा, रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, पोलिस निरीक्षक शिनगारे, वॉर्ड अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 
 
गतिरोधक नसल्याने अपघात 
यातील काही चौक हे सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बॅंक प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावर आहेत. त्यामुळे पोलिस या विभागाकडेही पाठपुरावा करीत आहेत. विमानतळ टी पॉइंट ते केंब्रिज चौक या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. याच रस्त्यावर शासकीय दवाखाना, विमानतळ, चिकलठाणा गाव आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांचा वेग मर्यादित असणे गरजेचे आहे. त्यामुळे गतिरोधक टाकण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) डॉ. डी. एम. कोल्हे यांनी जागतिक बॅंक प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला दिले आहे. 

  • चौकातील खड्डे बुजविणे, शोल्डर भरणे.
  • झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाइट, लेन मार्किंग करणे. 
  • हायमास्ट लाइट बसविणे  
  • सिग्नल बसविणे 
  • सूचना फलक लावणे 
  • ट्रॅफिक बूथ, कॅट आईज 
  • रिफ्लेक्‍टर पट्टी लावणे 
  • गतिरोधक टाकणे 
  • दुभाजकांना रंगरंगोटी करणे 

 
धोकादायक बनलेले चौक 
लिंक रोड टी पॉइंट, रेल्वेस्टेशन चौक, जिल्हा न्यायालय चौक, क्रांती चौक, अमरप्रीत चौक, आकाशवाणी चौक, सेव्हनहिल चौक, जळगाव टी पॉइंट, मुकुंदवाडी, महानुभव आश्रम चौक, महावीर चौक, मिल्ट्री हॉस्पिटल टी पॉइंट, छावणी गणपती विसर्जन टी पॉइंट, आयकर भवन टी पॉइंट, नगर नाका, हॉटेल शरद टी पॉइंट, आंबेडकर चौक, हर्सूल टी पॉइंट, एमआयटी चौक, गोदावरी चौक, देवळाई चौक, केंब्रिज चौक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com