वडिलांचा मृतदेह घरात होता..तीने धैर्याने परिक्षा दिली; यश मिळविले, पण बाबा तू हवा होतास...

sheetal ausa.jpg
sheetal ausa.jpg

औसा (लातूर) : उद्या इंग्रजीचा पेपर म्हणून रात्रभर अभ्यास केला. पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी घाई घाईत निघालेल्या मुलीला वडिलांच्या अचानक मृत्यूने रोखले. जन्मदाता गेल्याचा धक्का बसलेल्या मुलीने बापाचा मृतदेह घरात ठेवून परीक्षा दिली आणि त्या विषयात तिला सत्तर गुण मिळाले. पेपर देऊन पित्यावर अंत्यसंस्कार करून पुढील पेपरही तिने मोठ्या हिमतीने दिले आणि यशाला गवसणी घातली. पण तिचे कौतुक करणारे पित्याचे शब्द हरवून गेल्याचे शल्य तिला नियतीने कायम दिले आहे.

औसा तालुक्यातील बोरगाव (नकुलेश्वर) येथील शीतल तुकाराम रोंगे ही भेटा येथील भारत विद्यालयात दहावीत शिकत होती. ९ मार्च २०२० रोजी तिचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. त्याचा रात्रभर अभ्यास केल्यावर सकाळी लवकर उठून कामे आटोपून ती परीक्षेला निघाली. ती दारात आहे तो पर्यंतच तिचे वडील तुकाराम रोंगे यांना चक्कर अली आणि ते जमिनीवर कोसळले. काय होतंय हे कळण्याच्या आतच त्यांची प्राणज्योत मावळली. पित्याचे छत्र हरवलेल्या शितलला काय करावे कळत नव्हते. 

घटकाभर पेपरला विसरलेल्या शितलला गावातील बालाजी साळुंके, नाथ पाटील यांनी धीर दिला आणि तिला परीक्षा देण्यासाठी सांगितले. गाडीवर तिला परीक्षा केंद्रात आणले. अश्रूंना वाट करीत शितलने पेपर दिला. घरी परतल्यावर वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नंतरचे पेपरही तिने मोठ्या हिमतीने दिले.

२९ जून रोजी निकाल लागला आणि इंग्रजी पेपरला तिला ७० गुण मिळाले तर ती सगळ्या विषयात ५६ टक्के गुण घेत उत्तीर्ण झाली. पण ती उत्तीर्ण झाल्यावर तिच्या डोक्यावरून हात फिरवत कौतुक करणारे पित्याचे बोल तिच्यासाठी कायम मुके झालेत ही भावना तिला अस्वस्थ करीत आहे. तिने दाखविलेल्या हिमतीची दाद पंचक्रोशीतून तिला दिली जात आहे.

संपादन-प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com