एक डोळा पद्धतीच्या ऊस लागवडीतून साधली उत्पादन खर्चाची कपात; एकरी सत्तर टन उत्पादन

रामदास साबळे
Monday, 1 February 2021

शेती व्यवसायात निसर्गाचा लहरीपणा, दिवसेंदिवस वाढत जाणारा उत्पादन खर्च व शेतीमालाला मिळणारा बाजारभाव यांचा मेळ घातल्यास शेती व्यवसाय परवडेनासा झाला आहे.

केज (जि.बीड) : सद्यःस्थितीत वाढता उत्पादन खर्च व उत्पन्नाचा शेतकऱ्यांना ताळमेळ लागत नसल्यामुळे शेती व्यवसाय करणे अवघड झाले आहे. मात्र शेती हा ग्रामीण भागाचा मुख्य व्यवसाय असल्याने अनेक प्रयोगशील शेतकरी नव-नवीन प्रयोग शेतीत करताना दिसत आहेत. असाच प्रयोग धारूर तालुक्यातील गांजपूर येथील दोन तरूण शेतकऱ्यांनी एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड करून केला आहे. या पद्धतीने ऊसाची लागवड केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन त्यातून मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाल्याचे समोर आले आहे.

शेती व्यवसायात निसर्गाचा लहरीपणा, दिवसेंदिवस वाढत जाणारा उत्पादन खर्च व शेतीमालाला मिळणारा बाजारभाव यांचा मेळ घातल्यास शेती व्यवसाय परवडेनासा झाला आहे. परंतू ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने तो करणे शेतकऱ्यांना क्रमप्राप्त आहे. यातून शेतीत नवनवीन प्रयोग करणारे तरूण शेतकरी पुढे आल्याची काहीं उदाहरणे दिसून येत आहेत. धारूर तालुक्यातील गांजपूर येथील दादासाहेब सिरसट व भास्कर डापकर या तरूण शेतकऱ्यांनी एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड करून उत्पादन खर्च कमी करून एकरी सत्तर टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे.

या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या एकुण क्षेत्रापैकी चार एकर क्षेत्रावर जुलै महिन्यात एक डोळा पद्धतीने पाच फुटांच्या सरीत दीड फुटाच्या अंतरावर ऊसाच्या डोळ्याची लागवड केली. लागवड करताना ऊसाचा डोळा (कोंब) काढण्याचे केआरडी यंत्र उपलब्ध न झाल्याने केवळ ऊसाच्या डोळ्याचा भाग कापून वाया जाणारा ऊसाची बचत केली. पाणी बचतीसाठी ठिबकद्वारे पाणी देण्यात आले. उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये. यासाठी शेततळ्यात पावसाळ्यातच पाण्याची साठवणूक करून पाणी व्यवस्थापन केले. लागवडीनंतर एक खुरपणी व पाळी टाकून अंतर मशागत करून आवश्यकतेनुसार खतांची मात्रा दिली.

त्यामुळे लागवड केलेल्या एका डोळ्यास साधारणतः सात-आठ पेक्षा जास्त फुटवे येतात. हा ऊस लागवडीनंतर आठ महिन्यांचा कालावधी उलटल्यास ऊस तोडणीयोग्य होतो. अशा पद्धतीने ऊस शेती केल्यास एकरी अठरा-वीस हजार उत्पादन खर्च येतो. उत्पन्न मात्र एकरी सत्तर टन निश्चित मिळते. त्यामुळे एकरी सत्तर टनाचे दोन हजार रूपयांच्या भावाने एक लाख चाळीस हजार रूपये होतात. यातून उत्पादन खर्च वजा केल्यास शेतकऱ्यांना एकरी एक लाख वीस हजार एकरी निव्वळ नफा मिळतो. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने कांडी पद्धतीच्या ऊस लागवडीपेक्षा एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड करणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमखास फायदेशीर ठरते.

"जून्या पद्धतीने ऊसाचा उत्पादन खर्च जास्त येत होता. मात्र नव्याने आलेल्या एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन यातून मिळणाऱ्या उत्पनात पुर्वीच्या तुलनेत अधिक वाढ होते."
- दादासाहेब सिरसाट, ऊस उत्पादक शेतकरी, गांजपूर, ता.धारूर

 

 

 

संपादन - गणेश पिटेकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar Cane Plantation New Method Apply By Farmers Beed News