लॉकडाउनमध्ये हाल, बीड पोलिसांच्या माणुसकीने आनंदाश्रू विरले 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

  • पश्चिम बंगालचे मजूर अखेर रवाना 
  • पिंपळनेर पोलिसांची सतर्कता 
  • पोलिस वाहनातून सोडले नेऊन 
  • थांबा नसतानाही पूर्णाला थांबविली ट्रेन 
  • महिनाभरापासून किराणा - जेवणाचीही सोय 
     

बीड - खाकी वर्दीबद्दल प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. तशा काही घटनाही घडलेल्या असतात. पण, खाकी वर्दीच्या आतही माणुसकी दडलेली असते याचा अनुभव पश्चिम बंगालच्या मजुरांना आला. मात्र, पिंपळनेर पोलिसांची सतर्कता आणि माणुसकीमुळे पश्चिम बंगालमधील मजुरांना त्यांच्या गावी पोचता आले. या मजुरांनी दोन महिने लॉकडाउनमध्ये सोसलेले हाल पोलिसांच्या माणुसकीच्या दर्शनाने आनंदाश्रूत विरले. 

लॉकडाउनमध्ये खाल्लेल्या खस्ता आणि पोलिसांमुळे गावचा सापडलेला रस्ता यामुळे या मजुरांच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू टपकले. बसच्या यादीत नावे नसल्याने पिंपळनेर पोलिसांनी दोन वाहनांतून या मजुरांना पूर्णा रेल्वे जंक्शन येथे तर सोडलेच. शिवाय येथे ट्रेनचा थांबा नसतानाही अनेक कसरती करून येथे ट्रेनही थांबविली. घडला प्रकार असा : जिल्ह्यात पश्चिम बंगाल राज्यातील सव्वाशेवर मजूर विविध ठिकाणी कामे करत आहेत. पिंपळनेर भागात १२ मजूर वीजखांब उभारणे, तारा जोडणे अशी कामे कंत्राटदाराच्या हाताखाली करत.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

लॉकडाउनमुळे कामे बंद पडली. ठेकेदारानेही हात झटकले. महिनाभर जवळच्या पैशाने धकविले. पण मागच्या महिनाभरात या मजुरांचे खाण्या-पिण्याचे वांधे सुरू झाले. मात्र, पिंपळनेर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी या मजुरांच्या जेवणाची सोय करण्यासाठी किराणा किट उपलब्ध करून दिले. दरम्यान, शासनाच्या धोरणानुसार परराज्यातील मजुरांना परिवहन महामंडळाच्या बसने सोडण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध भागांत पश्चिम बंगालमधील मजूर काम करतात.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार... 

विविध ठाण्यांनी सदर यादी परिवहन महामंडळाकडे सुपूर्द केली. शुक्रवारी (ता. २९) नांदेडहून सुटणाऱ्या विशेष रेल्वेने या प्रवाशांना रवाना करण्यासाठी जिल्ह्यातून या बस या मजुरांना घेऊन दाखल झाल्या. परंतु, या बसच्या यादीत पिंपळनेर भागातील १२ जणांची नावेच आली नाहीत. चार वाजता ट्रेन सुटणार होती आणि दुपारी १२ पर्यंतही मजुरांसाठी बसच आली नाही. मग, मजुरांनी सहायक पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांच्याकडे कैफियत मांडली. यानंतर परिवहन महामंडळाशी संपर्क, त्यानंतर बसची उपलब्धता या बाबींमुळे चार वाजता नांदेड गाठणे कठीण असल्याने या मजुरांचे चेहरेच पडले. पण, भुतेकरांनी त्यांना धीर दिला आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या कानी घातली. श्री. पोद्दार यांनीही तत्काळ दोन वाहने घेऊन मजुरांना रवाना करण्याची सूचना केली. 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

जेवण अन् शिदोरीही सोबत 
दुपारी एक वाजता पोलिस वाहनांनी मजूर रवाना झाले. नांदेडहून चार वाजता विशेष रेल्वे निघणार होती. त्यावेळेपर्यंत नांदेडला पोचणे शक्य नव्हते. मग, हर्ष पोद्दार यांनी नांदेडच्या पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पूर्णा रेल्वे जंक्शनला ट्रेन थांबविण्याची विनंती केली. थांबा नसताना तिथे ट्रेन थांबलीही. विशेष म्हणजे रेल्वेच्या दोन दिवसांच्या प्रवासात जेवण मिळणार नाही म्हणून पिंपळनेर पोलिसांनी त्यांना पूर्णालाही जेवण उपलब्ध करून दिले आणि सोबतही काही शिदोरी दिली. 

 

पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या परवानगीने पोलिस वाहनांतून या मजुरांना सोडले. त्यांनीच नांदेडच्या प्रशासनाशी संपर्क केल्याने पूर्णाला ट्रेन थांबली व या मजुरांना गावी जाता आले. कर्तव्यासोबत माणुसकी दाखविता आल्याचे समाधान आहे. 
- शरद भुतेकर, सहायक पोलिस निरीक्षक, पिंपळनेर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tears of joy were shed by the humanity of Beed police