esakal | जबरी चोरी प्रकरणात तिघांना जन्मठेप; लातूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

court news.jpg

लातूर जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; चालकाला मारहाण करुन तेलाचा टँकर पळवणाऱ्या तिघांना जन्मठेप

जबरी चोरी प्रकरणात तिघांना जन्मठेप; लातूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : चालकाला मारहाण करून व त्याचे हातपाय व तोंड बांधून तेलाचा टँकर पळवून नेणाऱ्या तिघांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश एस. तिवारी यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. २०१४ मध्ये उजनीमोडवर (ता. औसा) मध्यरात्री ही जबरी चोरीची घटना घडली होती. अशा गुन्ह्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ असून निकालामुळे जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारावर चांगलाच वचक बसण्याची शक्यता आहे.

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात  

याबाबत सहायक सरकारी वकील अॅ.ड. लक्ष्मण एन. शिंदे यांनी सांगितले, की येथील किर्ती गोल्ड कंपनीच्या तेलाचा टँकर घेऊन चालक बलभीम कासवीद (वय ५४, रा. टेंभूर्णी, जि. सोलापूर) हा ४ मार्च २०१४ रोजी बोरामणी (सोलापूर) येथे निघाला होता. टँकरमध्ये १६ हजार ९९० किलो कॉटन रिफाइंड तेल होते. पुण्यात वास्तव्यास असलेल्या सुरेश शेषराव साठे (वय ३१, रा. नांदुर्गा, ता. औसा), शाम विश्वनाथ शिंदे (वय ३५) व संदीप सौदागर भोजन (वय २३, दोघे रा. आशिव) या तिघांनी टँकर पळवून नेण्याच्या उद्देशाने एमआयडीसीमधूनच छोटा हत्ती वाहनाने टँकरचा पाठलाग सुरू केला.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

मध्यरात्री साडेबारा वाजता उजनीमोडवर छोटा हत्ती आडवा लाऊन टँकरला गाठले व चालक कासवीद याला हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याचे हातपाय बांधून व तोंड चिकटपट्टीने बंद करून तांदुळवाडी (ता. उस्मानाबाद) शिवारातील शेतातील पिकात फेकून दिले आणि टँकर पळवून नेला. स्वतःला तेल विक्री करणारे दलाल भासवून पंधारे (ता. बारामती) एमआयडीसीत या तेलाची विक्री केली. चालकाने सुटका करून घेत भादा पोलिस ठाणे गाठले. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर व अपर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास केला.

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

असा लागला सुगावा
गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरात पथकाने छोटा हत्ती वाहन असलेल्या व्यक्तींची माहिती मिळवली. यातच त्यांना पुणे येथील सुरेश, शाम व संदिप या तिघांचा सुगावा लागला. पोलिसांनी सापळा रचून तिघांना वारजे माळवाडी परिसरातून ४ मे २०१४ रोजी अटक केली. यातील सुरेश व शाम यांच्या घरातून पोलिसांनी तेल विकलेल्या रक्कमेपैकी अकरा लाख रूपये जप्त केले. त्यानंतर आशिव व नांदुर्गा येथून छोटा हत्ती, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड, मोबाईल, चिकटटेप जप्त केले तर लोणंद (जि. सातारा) येथे सोडलेला रिकामा टँकरही हस्तगत केला.

काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकांना निधी दिला जात नाही : आ. गोरंट्याल यांचा सरकारला घरचा आहेर 

टँकरचालकाची साक्ष ठरली महत्वाची
तपासाअंती तिघांविरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तिवारी यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. यात बारा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. जखमी टँकरचालक कासवीद तसेच पुण्यात रक्कम जप्त करतेवेळी असलेल्या साक्षीदारांची साक्ष यात महत्वाची ठरली. ही साक्ष आणि सहायक सरकारी वकील शिंदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तिघांवर जबरी चोरीच्या गुन्ह्यासाठी दोषी धरले. त्यावरून न्यायालयाने तिघांनाही जन्मठेपेची जबर शिक्षा सुनावली. कलम ३९४ सारख्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अँड. शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणात अॅड. शिंदे यांना अॅड. एस. व्ही. कोंपले, अॅड. विद्यासागर ढगारे, गुन्हे दोषसिद्धी कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक आवेज काझी व कर्मचाऱ्यांनी साह्य केले.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

पुण्यात प्लॉट घ्यायचा होता
या गुन्ह्यात सुरेश हा मास्टर माईंड असून त्याने शाम व संदिपच्या साह्याने टँकर पळवला. सुरेशनेच स्वतःला दलाल सांगत तेलाची विक्री केली. त्याने पुण्यात स्वतःचे घर बांधले होते. त्याचा शाम व संदिपला हेवा वाटत होता. यातून दोघांचेही पुण्यात प्लॉट किंवा फ्लॅट घेण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न तडीस नेण्यासाठी तिघांनी मिळून टँकर पळवला. गुन्हा उघड करण्यासाठी गुन्हे शाखेचे जमादार संजय काळे, संजय कंचे, वहीद शेख, गणेश भोसले, विनोद चिलमे यांच्यासह भादा ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक उस्मान चाँदसाहेब शेख व जमादार गनी शेख यांनी मोठे परिश्रम घेतले.

Edited By Pratap Awachar