जालन्यात कोरोनाच्या बळींनी गाठले सप्तक 

महेश गायकवाड
Friday, 12 June 2020

जिल्ह्यात गुरुवारी (ता.११) २६ संशयित व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, अंबड शहरातील मदिना चौक परिसरातील कोरोनाबाधित ६५ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा सातवा बळी गेला आहे.

जालना - जिल्ह्यात गुरुवारी (ता.११) २६ संशयित व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, अंबड शहरातील मदिना चौक परिसरातील कोरोनाबाधित ६५ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा सातवा बळी गेला आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात डॉक्टरांना यश येत असताना गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला. अंबड शहरातील मदिना चौक परिसरातील ६५ वर्षीय व्यक्ती ता.पाच जून रोजी कोरोनाबाधित आढळून आली होती. हा रुग्ण हृदयाचा आजार, उच्चरक्तदाब व न्युमोनियाग्रस्त होता. त्याच्यावर आयसीयू वॉर्डात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

दरम्यान, गुरुवारी दिवसभरात २६ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये जाफराबाद शहरातील आदर्शनगरमधील सात व किल्ला परिसरातील ११, घनसावंगी तालुक्यातील पारडगाव व राजेगाव येथील प्रत्येकी एक, जालना शहरातील पोलिस निवासस्थानातील दोन, गुडलागल्लीतील दोन, लक्कडकोट व नानक निवास भागातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. तर बरे झालेल्या तीन रुग्णांमध्ये जालना तालुक्यातील पिंपळगाव येथील ३५ वर्षीय पुरुष व बदनापूर ६० वर्षीय महिला व दहावर्षीय मुलाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

सध्या रुग्णालयात ९६ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी पाच रुग्ण औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात सहाशे व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ६०० व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील संत रामदास वसतिगृहात ११, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेलमध्ये २५, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात २९, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३८, पोलिस प्रशिक्षण केंद्रात ३०५, परतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात १०, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात १७ व पंचगंगा मंगल कार्यालयात ३३ व्यक्तींचे अलगीकरणात आहे. अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात २८, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेलमध्ये ३९ व अल्पसंख्याक गर्ल्स होस्टेलमध्ये २०, मंठा येथील डॉ. मॉडेल स्कूलमध्ये ३९ तर कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात १५, बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात एक व्यक्तीचे अलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total seven Corona patient died