बीडच्या पाच जणांचा युपीएससीत झेंडा : मंदार पत्की पहिल्या प्रयत्नात तर जयंत मंकलेने केली अंधत्वावर मात

दत्ता देशमुख
Tuesday, 4 August 2020

मंदार पत्की, नेहा किर्दक, डॉ. प्रसन्न लोध, वैभव वाघमारे, जयंत मंकले या बीड जिल्ह्यातील पाच जणांनी युपीएससी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. 

बीड : भारतीय लोकसेवा आयोगाच्या (आयएएस) परीक्षेत बीडच्या मुलांनी यशाचा डंका वाजविला आहे. मंदार पत्कीने पहिल्या प्रयत्नात यशाला गवसणी घालत देशात २२ वा रँक मिळविला आहे. तर, जयंत मंकले यानेही अंधत्वावर मात करत १४३ रँकसह युपीएससीचा कठीण डोंगर सर केला आहे. पत्की व मंकले, नेहा किर्दक यांच्यासह डॉ. प्रसन्न लोध, वैभव वाघमारे यांनीही युपीएससीत यश मिळविले आहे. 

बीड शहरातील मंदार पत्की निवृत्त अभियंता जयंत पत्की यांचा मुलगा आहे. मंदारने पुणे येथून अभियांत्रिकी पदविका व पदवीचे शिक्षण पुर्ण करुन भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. अवघ्या २३ व्या वर्षी त्याने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली. त्याला २२ वा रँक मिळाला आहे.

हे ही वाचा : पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं 

शहरातीलच जयंत किशोरराव मंकले यानेही अंधत्वावर मात करत भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा फडकविला आहे. त्याला १४३ वा रँक मिळाला आहे. मागच्या वेळी त्यांना ९३७ वा रँक मिळाला होता. न खचता त्यांनी अभ्यास करुन त्यांनी यश मिळविले.

आडस (ता. केज) येथील नेहा लक्ष्मण किर्दक हिनेही युपीएससी परीक्षेत यश मिळविले. तीला ३८३ वा रँका मिळाला आहे. सामान्य कुटूंबातील नेहाने मेहनत व अभ्यासाच्या बळावर यशाला गवसणी घातली.

डॉ. प्रसन्न लोध यांनीही युपीएससीत यश मिळविले आहे. मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालयातून वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) घेतल्यानंतर त्यांनी याच ठिकाणी दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम केले. पुढे २०१७ ला राजीनामा देऊन त्यांनी नवी दिल्ली गाठून भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दोन परीक्षांत त्यांना अपयशाचे तोंड पहावे लागले. मात्र, न खचता त्यांनी मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर अभ्यास सुरु ठेवला आणि २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेत यशाचा झेंडा फडकविला. त्यांच्या पत्नी अनु यांनी त्यांना यासाठी प्रोत्साहन दिल्याचे प्रसन्न सांगतात.   

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी येथील मुळ रहिवाशी व अंबाजोगाईत स्थायिक असलेल्या वैभव वाघमारे यानेही भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ७७१ वी रँक मिळविली. वडिल विकास व आई आशा दोघेही शिक्षक आहेत. पुण्याच्या सिओइपी महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी परीक्षा दिली होती. मात्र, अपयशानंतर न खचता त्यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेत यश मिळविले.

Edited By Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: upsc result २०१९ in Beed Mandar Patki Neha Kirdak Dr Prasanna Lodh Vaibhav Waghmare Jayant Makale success story