रायगडच्या पर्यटनाकडे आस्ते कदम; पर्यटकांकडून याबाबतची होते अधिक चौकशी

अलिबाग : अलिबाग समुद्रकिनार्‍यावरील सेल्फी पॉईंट पावसात भिजू नये, यासाठी ताडपत्रीने झाकले आहे.
अलिबाग : अलिबाग समुद्रकिनार्‍यावरील सेल्फी पॉईंट पावसात भिजू नये, यासाठी ताडपत्रीने झाकले आहे.

अलिबाग : सहा महिन्यांपासून बंद असलेले लॉज, बोर्डिंग, हॉटेल व्यवसाय सुरू करण्याबद्दल राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवल्याने रायगडमधील पर्यटन व्यावसायिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. हॉटेलची डागडुजी, निर्जंतुकीकरण, कामगारांची व्यवस्था याकडे सध्या व्यावसायिकांनी भर दिला आहे. काही व्यावसायिकांनी ऑनलाईन बुकिंगही सुरू केले आहे. मात्र, ग्राहकांच्या अल्प प्रतिसादामुळे या व्यावसायिकांना सवलतींचे नवे पॅकेज करावे लागत आहे. 

मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यापासून मुंबई-पुण्यापासून जवळ असल्याने रायगडमधील पर्यटनस्थळांची चौकशी पर्यटकांकडून केली जात आहे. राज्यातील इतर पर्यटनस्थळांपेक्षा रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचे आकर्षण अधिक आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यासाठीची प्राथमिक तयारी करण्यावर येथील व्यावसायिकांनी भर दिला असून, आता फक्त ग्राहकांची प्रतीक्षा त्यांना लागली आहे.

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायावर दुरगामी परिणाम होणार असून, यासाठीचे बदल आतापासूनच करण्याचे प्रयत्न अलिबागमधील व्यावसायिकांचे आहेत. केलेल्या तयारीत ग्राहकांचा स्वच्छतेकडे कटाक्ष असल्यामुळे हॉटेल, लॉजच्या रूमचे निर्जंतुकीकरण, येणाऱ्या ग्राहकांची थर्मल चाचणी, दररोज लॉंड्री बदलणे, कर्मचाऱ्यांना मोजे, मास्क पुरवण्यावर प्राधान्य दिले जात आहे. तरीही मुरूड, दिवेआगर, नागाव, रेवदंडा येथील पर्यटन व्यावसायिकांना ग्राहकांकडून अल्प प्रतिसाद दिला जात आहे.

फक्त मांडवा, किहीम येथील व्यावसायिकांना रो-रो सेवा सुरू झाल्याने थोड्या फार प्रमाणात प्रतिसाद मिळत आहेत. वेबसाईटवरून बुकिंगची चौकशी केली जाते. या अल्प प्रतिसादामुळे काही व्यावसायिकांनी सुरुवातीपासूनच विशेष सवलत पॅकेजचे आकर्षण दाखवण्यास सुरुवात केली आहे. 

सहा महिने आमचा लॉज पूर्णपणे बंद होता. सध्या ग्राहकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, ग्राहकांकडून स्वच्छता व्यवस्थेची जास्त चौकशी केली जाते. त्याचबरोबर दरातही सवलत देण्याची मागणी केली जात आहे. 
- विजय घारपुरे, श्रेयश लॉज, मारुती नाका- अलिबाग 

ग्राहकांकडून दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी रूम मिळेल का, याची चौकशी होत आहे. त्याचबरोबर कुटुंबासह पर्यटनासाठी येण्यास इच्छुक असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. आम्ही ग्राहकांच्या चेक आऊटनंतर रूम निर्जंतुकीकरण, स्टाफला सुरक्षा साधने देण्यावर भर दिला आहे. 
- सुभेदार प्रजापती, गुरुजी हॉटेल, 
अलिबाग समुद्र किनारा 

पूर्वी ज्या रूमचे भाडे चार हजार रुपये होते. त्या बदल्यात साडेतीन हजार रुपये आकारले जात आहेत. याबरोबर ग्राहकांना आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे वाटतील, अशा सुविधा आणि सवलती दिल्या आहेत. याबाबतची चौकशी सुरू झाली असली, तरी पर्यटकांचा ओघ कमी आहे. 
- अग्नी मोटा, हॉटेल सी. व्ही, अलिबाग 

जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत पर्यटकांचा ओघ कमीच राहणार आहे. मुंबईपासून जवळचे ठिकाण असल्याने अलिबागमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. केवळ कोरोनामुळे ते येत नाहीत. निर्जंतुकीकरणासाठी येणाऱ्या खर्चाचे प्रमाण जास्त आहे, तरीही व्यवसाय सुरू व्हावा, यासाठी करावा लागत आहे. 
- उज्जव म्हात्रे, कल्पवृक्ष कॉटेज, वरसोली 

(संपादन : उमा शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com