तस्करीमुळे रायगडातील वन्यजीव धोक्‍यात; दोन वर्षांत 15 गुन्हे दाखल

खवले मांजर
खवले मांजर

महाड : वन्यजीव तस्करी ही जागतिक समस्या बनत असतानाच या समस्येची पाळेमुळे आता रायगड जिल्ह्यातही पोहोचल्याने येथील वन्यजीव वनसंपदा धोक्‍यात आली आहे. 1 ऑक्‍टोबर ते 7 ऑक्‍टोबर या कालावधीत सर्वत्र वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी विविध सामाजिक संस्था अनेक उपक्रमही राबवत आहेत. असे असतानाही गेल्या काही वर्षांमध्ये वन्यजीवांची तस्करी व तिची पाळेमुळे थेट रायगड जिल्ह्यात पोहोचली आहेत. 

वन्यजीव तस्करीचा व्यवहार जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने गेल्या काही वर्षांत वन्यजीव तस्करी रायगडात वेगाने पसरली आहे. घरातील पिंजऱ्यात पक्षी पाळण्यापासून ते वन्य प्राण्यांचे मास खाण्यापर्यंत रुजलेल्या संस्कृतीमुळे वन्यजीव धोक्‍यात आले आहेत. जिल्ह्यातील दक्षिण भागामध्ये वनसंपदा अजूनही टिकून आहे. येथे खवले मांजर, वाघ, हरिण, मांडूळ, तरस असे वन्यजीव आहेत. याचाच फायदा घेत या परिसरात वन्यजीव तस्करी वाढली आहे.

मागील दोन वर्षांमध्ये ठाणे, कल्याण, पुणे, महाबळेश्वर या ठिकाणी वन्य तस्करांना पकडण्यात आल्यानंतर त्यातील अनेक आरोपी हे रायगड जिल्ह्यातील आहेत. त्यांनी पकडलेले वन्यजीव हे येथील जंगलातून पकडल्याचे पुढे आले आहे. या दोन वर्षांत वन्यजीव तस्करीचे 15 गुन्हे रायगड व इतर जिल्ह्यांत घडले आहेत. 

सद्यस्थितीत मांडूळ व खवले मांजराची किंमत 40 ते 50 लाखांच्या घरात असल्याने या दोघांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. वाघाचे कातडे, वाघ नखे, हरणाची शिंगे यांच्या तस्करीचे प्रकारही काही वर्षांमध्ये उघड झालेले आहेत. याप्रकरणी ठाणे, कल्याण, सुधागड, मंडणगड या परिसरामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. वन्यजीव शिकारही या भागात वाढत आहे. महाड, पोलादपूर, म्हसळा, सुधागड, श्रीवर्धन या भागात वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. 

अंधश्रद्धेखाली तस्करी 
औषधाच्या नावाखाली मांडूळ सापाची तस्करी, नागमणीच्या नावाखाली नागांची हत्या, मुंगूस, कासव, ससाणे, लक्ष्मीचे वाहन म्हणून शृंगी घुबडाची विक्री, तर गुप्तधन व भरपूर संपत्तीच्या नावाखाली वन्यजीवांची कत्तल अशा अंधश्रद्धेमुळे वन्य तस्करी वाढत आहे. यामुळे तस्करांनाही कोट्यवधी रुपये मिळत आहेत. 

आतापर्यंतच्या कारवाया 
सुधागडमध्ये 6 मे 2019 ला खवले मांजर तस्करीप्रकरणी सात जणांना अटक. ठाणे वन विभागाने केलेल्या कारवाईत महाड, पोलादपूर व अलिबाग येथील आरोपी अटक. महाबळेश्वर आणि ठाणे येथे वाघाची कातडीप्रकरणी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व महाड परिसरातील आरोपी अटकेत आहेत. 

प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या गावातील वन्यजीवांचे व वनांचे रक्षण केले पाहिजे. तस्करी ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे ती वेळीच रोखली पाहिजे. 
- एस. पी. नावकर, वनप्रेमी 

(संपादन : उमा शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com