...म्हणून परदेशांतून आलेल्या प्रवाशांसाठी केलीये घरापर्यंत वाहनांची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

महापालिका आयुक्ताची जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना 

मुंबई : भारतात 22 मार्चपासून परदेशातून एकही विमान येणार नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मोठ्या संख्येने परदेशी प्रवासी येण्याची शक्‍यता आहे. या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवस सक्तीने एकांतात राहायचे असल्याने मुंबईत त्यांची व्यवस्था होणे कठीण आहे. म्हणून त्यांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्याची सूचना महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला केली.

सावधान ! महाराष्ट्रात एका दिवसात वाढलेत ११ कोरोना रुग्ण; अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा..

परदेशांतून आल्याचे समजावे म्हणून विमानतळावरच संबंधित प्रवाशांच्या हातावर शिक्के मारले जात आहेत. त्यामुळे रेल्वेप्रवासात असे प्रवासी ओळखता येत आहेत. मागील दोन दिवसांत पालघर आणि बोरिवली स्थानकांवर अशा प्रवाशांना उतरवण्यात आले. येत्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात परदेशी प्रवासी येण्याची शक्‍यता आहे. त्या सर्वांना 14 दिवस एकांतात ठेवण्याची सोय मुंबईत होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे त्यांना रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहतूक सेवेतून प्रवास करू देणेही योग्य नाही.

अशा लोकांना काय बोलावं; थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास...

परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसल्यास त्यांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात पाठवण्यात येईल. बाधा झाल्याची लक्षणे नसलेले प्रवासी, ज्येष्ठ नागरिक व अन्य आजार असलेल्या व्यक्तींना 14 दिवस मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात ठेवण्यात येईल.

#COVID19 : घाबरू नका! करोनाला निष्प्रभ करण्यासाठी प्रयत्न सुरू...

कोणतीही लक्षणे नसलेल्या निरोगी प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून घरातत एकांतात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यांना मुंबईबाहेरील निवासस्थानी जायचे असल्यास या वाहनांचा वापर करता येईल. त्यासाठी विनावातानुकूलित 15 ते 25 बसगाड्या आणि 20 ते 25 टॅक्‍सी उपलब्ध करून द्याव्यात, असे महापालिका आयुक्तांनी कळवले आहे. 

बाजारपेठांचे शटरडाउन....  

प्रवाशांवरच खर्चाचा भार
मुंबईपासून 300 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या प्रवाशांना बसगाड्यांतून घरापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्याहून अधिक अंतरावर राहणाऱ्या प्रवाशांना लहान वाहनांतून घरी पोहोचवण्यात येणार आहे. या प्रवासाचा खर्च संबंधित प्रवाशांनाच करावा लागेल. त्यासाठी आवश्‍यक वाहने उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत.

Arrangements of transport for foreigner passengers up to home


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrangements of transport for foreigner passengers up to home