चित्रकाराने घरातच साकारला स्टुडिओ, 700 हून अधिक चित्रांचा संग्रह

प्रसाद जोशी
Monday, 5 October 2020

जलरंग, तैलरंग, ऑइल, वॉटर, सॉफ्ट पेस्टल कॅन्व्हास, पेन्सिल पेंटिंग या प्रकारात ते चित्रे काढतात; तर काही अपूर्णावस्थेतील चित्रे त्यांनी लॉकडाऊन काळात पूर्ण केली.

वसई : लॉकडाऊन झाला आणि व्यवसाय ठप्प झाले. घरात वेळ घालवायचा तरी कसा असे एक ना अनेक प्रश्‍न मनाला शिवत होते. त्यानंतर वसईचे सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष गोंधळे यांनी घरातच ऐतिहासिक व कलेची आवड जोपासण्याचा निश्‍चय केला. त्यांनी मोडीलिपीसह युरोपियन गॉथिक कॅलिग्राफी तसेच 50 हून अधिक चित्रे रेखाटली. यातून अपार आनंद मिळाला असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. वसई गावात राहणारे चित्रकार सुभाष गोंधळे यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌मधून शिक्षण घेतले; तर नोकरी व कालांतराने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. जहांगीर आर्ट, नेहरू सेंटरसह अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते. भारतातील विविध राज्यांसह परदेशातील कलारसिकांनी त्यांची चित्रे संग्रहित ठेवली आहेत. 

हे ही वाचा : 'राज साहेब, परप्रांतिय मासेविक्रेत्यांना हटवा'; कोळी भगिनींनी मांडले गऱ्हाणे

लॉकडाऊन काळात सुभाष गोंधळे यांना मन स्वस्थ बसू देत नव्हते. इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी किल्ले वसई परिवाराने आयोजित केलेल्या ऑनलाईन मोडीलिपी प्रशिक्षणात गोंधळे यांनी भाग घेतला व त्यांना प्रथम श्रेणी मिळाली. त्यावरच न थांबता गोंधळे यांनी युरोपमधील गॉथिक व रोमन कॅलिग्राफी म्हणजे अक्षराच्या पद्धतींवर अभ्यास सुरू केला व त्यातही पारंगत झाले. गोंधळे यांच्या म्हणण्यानुसार पेशवेकालीन दस्तावेज हे मोडीलिपीत असून त्याचे वाचन व लिखाण करणारे दुर्मिळ आहेत. त्यामुळे हा अभ्यास आपण जाणून घेतला. मोडीलिपीतील लाखो कागदपत्रे अजूनही अस्तित्वात असल्याने मला वाचन करून इतिहास समजण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

नक्की वाचा : कंगनाच्या ऑफिस पाडकामाची सुनावणी पूर्ण; न्यायालयाने निर्णय ठेवला राखून 

घरीच चित्रांचा स्टुडिओ -
लॉकडाऊनदरम्यान त्यांनी त्यांच्या घरीच चित्रांचा स्टुडिओ तयार केला असून वसईचा किल्ला, जुने वाडे, समुद्रकिनारे, आदिवासी, मच्छीमार, कोळी बांधवांचे व्यवसाय व जीवन, निसर्ग आणि व्यक्तीचित्र कुंचल्याच्या कौशल्याने रेखाटले असून तेथे अशी एकूण 700 हून अधिक चित्रे आहेत. जलरंग, तैलरंग, ऑइल, वॉटर, सॉफ्ट पेस्टल कॅन्व्हास, पेन्सिल पेंटिंग या प्रकारात ते चित्रे काढतात; तर काही अपूर्णावस्थेतील चित्रे त्यांनी लॉकडाऊन काळात पूर्ण केली. तसेच नव्याने 40 हून अधिक चित्रे कुंचल्यातून साकारली आहेत. 

महत्त्वाची बातमी : संजय राऊत आणि कुणाल कामरा यांची भेट, सोशल मीडियावर फोटो शेअर

मोडीलिपी अभ्यासामुळे मला ऐतिहासिक बाबींचा उलगडा करता येईल. तसेच पुढच्या पिढीला माहिती सांगणे सोपे जाईल. मी चित्र काढण्याची आवड लहानपणापासून जोपासली आहे. लॉकडाऊनमध्ये अधिक जोमाने यावर काम केले. नवीन चित्रे साकारली. सकारात्मक विचाराने हा काळदेखील व्यवस्थित जगता आला याचे समाधान आहे. 
- सुभाष गोंधळे, सुप्रसिद्ध चित्रकार, वसई. 

(संपादन : वैभव गाटे)

the artist created a home studio a collection of over 700 paintings


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the artist created a home studio a collection of over 700 paintings