रायगडमधील चक्रीवादळ 'नुकसानग्रस्तांना' मोठा 'दिलासा', मदतनिधीबाबत महत्वाचा निर्णय

nisarg
nisarg

माणगाव : निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना 350 कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनाही प्रथमच सरकारी नुकसानभरपाई दिली जाणार आहे. याबाबत बुधवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

सुतारवाडी येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले; की कोकणात झालेल्या निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना गेल्यावर्षी सांगली, कोल्हापूर याठिकाणी आलेल्या पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांना दिलेल्या प्रशासकीय मदतीपेक्षा समाधानकारक अशी दुप्पट मदत मिळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटिवार आदी उपस्थित होते.            

खासदार तटकरे म्हणाले, की  निसर्ग चक्रीवादळाचा कोकणाला प्रचंड तडाखा बसला. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळात घरांचे अंशतः नुकसान झालेल्यांना 15 हजार रुपये मिळणार होते. मात्र आता त्यात वाढ करण्यात आली असून 25 हजार अधिक धान्य व इतर वस्तुंसाठी 10 हजार असे एकूण 35 हजार रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या घरांचे अधिकच नुकसान झाले आहे; त्यांना 50 हजार रुपये अधिक 10 हजार असे एकूण 60 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे पूर्ण घर पडलेल्यांना एक लाख 50 हजार रुपये मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे मच्छीमारांच्या नुकसानभरपाईत अडीचपट वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी बोटीचे अंशतः नुकसान झालेल्या मच्छिमारांना सहा हजार रुपये मिळत होते. मात्र आता त्यांना 15 हजार रुपये मिळणार आहेत. तर अधिकचे नुकसान झालेल्या मच्छिमारांना यापूर्वी नऊ हजार मिळत होते. त्यांना आता थेट 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच मासेमारी जाळ्यांसाठी पाच हजार रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थाबाबत बोलताना तटकरे यांनी सांगितले, की जिल्हा परिषदेबरोबरच खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना दोन लाखांपर्यंत मदत मिळणार आहे. फळबागा पुनर्जीवित करून नारळ,सुपारी दालचिनी तसेच इतर  लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विचारविनिमय करून कोकणातील पर्यटन व्यवसायांला चालना देण्यासाठी पॅकेज देण्यासंदर्भात पाऊले उचलण्यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत.

A big relief for the victims of the cyclone in Raigad, an important decision regarding the relief fund

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com