भायखळा छपाई कारखाना जूननंतर बंद 

File Photo
File Photo

मुंबई : मध्य रेल्वेचा 125 वर्ष जुना भायखळा येथील छपाई कारखाना अखेर येत्या जूननंतर बंद होणार आहे. हा देशातील रेल्वेचा पहिला छपाई कारखाना होता. या कारखान्यासोबतच देशातील इतर चार रेल्वे छपाई कारखानेही बंद होणार असून यापुढे सर्व प्रकारची छपाई कंत्राटी पद्धतीने करून घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे 30 ते 40 टक्के खर्चाची बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे.

रेल्वे प्रवाशांची तिकिटे आणि रेल्वेच्या इतर स्टेशनरीची छपाई करण्यासाठी 125 वर्षांपूर्वी 1895 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल कंपनीने या छपाई कारखान्याला सुरुवात केली होती. येथे तिकिटे तसेच रेल्वेसाठी लागणाऱ्या प्रत्येक कागदाची छपाई केली जात असे.

संगणकीकरणानंतर छपाई कारखान्यांचा भार हलका झाला. त्यातच आता स्वत: छपाई करण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने छपाई करून घेणे स्वस्त पडत असल्याची सबब रेल्वेकडून पुढे केली जात आहे. त्यातूनच देशातील सर्व छपाई कारखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातूनच गेल्याच वर्षी महालक्ष्मी येथील पश्‍चिम रेल्वेचा छपाई कारखाना बंद करण्यात आला होता. 

संगणकाचा वापर आणि कंत्राट पद्धतीपूर्वी वर्षाला सुमारे 25 कोटी तिकीट आणि इतर स्टेशनरी साहित्य या कारखान्यात छापले जात असत. सध्या मात्र 2 कोटी अनारक्षित तिकिटेच येथे छापली जातात. रेल्वेत संगणकीकरण झाल्यानंतर छापील तिकिटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. भायखळा छपाई कारखान्यात कर्मचाऱ्यांची संख्या एक हजारांहून घटून आता सुमारे 325 वर आली आहे. 

भायखळा छपाई कारखाना बंद होऊ नये, यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष आर. पी. भटनागर यांनी भेट घेतली होती. त्या वेळी हा कारखाना बंद करण्याचा पुर्नविचार करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री यांनी दिले होते. त्यानुसार कारखाना बंद करण्यास स्थगिती दिल्याबद्दल आभारी आहोत, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री प्रवीण बाजपेयी यांनी सांगितले.

तीन महिन्यांची मुदतवाढ 
20 फेब्रुवारीला रेल्वे मंडळाच्या पत्रानुसार, 31 मार्चपर्यंत रेल्वे छपाई कारखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला 3 महिन्यांपर्यंत 30 जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. यात भायखळा छपाई कारखान्यासह, हावडा (पूर्व रेल्वे), दिल्ली (उत्तर रेल्वे), चेन्नई (दक्षिण रेल्वे) आणि सिकंदराबाद (दक्षिण-मध्य रेल्वे) यांचा समावेश आहे. 

भारताच्या छपाई इतिहासाचा साक्षीदार
हा कारखाना म्हणजे भारतीय छपाई इतिहासाचा साक्षीदार आहे. हाताने होणारी छपाई त्यानंतर अक्षरांच्या खिळ्यांनी होणारी छपाई, ऑपरेटरद्वारे होणारी छपाई असे एक एक टप्पे करत सध्या या कारखान्यात संगणकीय छपाई केली जात आहे. अशा प्रकारे सर्व प्रकारची छपाई पाहिलेला हा कारखाना इतिहासाचा साक्षीदारच म्हणावा लागेल.

The Byculla railways printing factory will closed after June

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com