नवी मुंबईत वाढत्या रुग्णांमुळे चिंता; अधिकारी घेताय काढता पाय!

नवी मुंबईत वाढत्या रुग्णांमुळे चिंता; अधिकारी घेताय काढता पाय!
नवी मुंबईत वाढत्या रुग्णांमुळे चिंता; अधिकारी घेताय काढता पाय!

नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार नेमका कोणाच्या खांद्यावर द्यायचा याबाबत प्रशासनामध्ये एकमत  नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबई पालिका आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरूच आहे. कोरोनासारखी वैश्विक महामारीच्या काळातही नवनियुक्त आरोग्य उपायुक्त डॉ. राहूल गेठे हे रजेवर गेले आहेत. परंतू त्यांचा कारभार इतर कोणाकडेही न सोपवल्यामुळे संभ्रमवस्था निर्माण झाली आहे. पालिकेच्या अंतर्गत राजकारणामुळे आरोग्य विभागातील कारभाराचे तीनतेरा वाजले असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

मुख्य वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांच्या संथगतीच्या कारभाराबाबत प्रशासनामध्ये नाराजी होती. त्यामुळे त्यांच्याऐवजी अतिक्रमण पथकातून अमरिष पटनिगीरे यांना आणले. परंतू त्यांच्या कारभारावर संशय आल्यानंतर नव्याने आलेले उपायुक्त डॉ. राहूल गेठे यांच्याकडे कारभार सोपवण्यात आला. मात्र त्यानंतरही शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवर फारसा परिणाम झाला नाही. गेठे परिक्षेचे कारण देऊन रजेवर गेले आहेत. गेठे रजेवर गेल्यामुळे नाराजी असलेल्या सोनावणे यांनाच पुन्हा कोरोनाचा कारभार पाहावा लागणार आहे. 

दाढीवाल्या मंत्र्याचे मनसबदार
नवी मुंबई पालिकेच्या कारभारात सध्या ठाण्यातील दाढीवाल्या मंत्र्याचे मनसबदार रुजू झाले आहेत. आरोग्य मंत्री असताना त्यांच्याकडे नोकरीला असलेल्या एका डॉक्टरला सरकारी खात्यात तात्पुरता प्रवेश दिला. त्याच आधारावर सध्या तो डॉक्टर महापालिकेत पाठीमागील दाराने उपायुक्त म्हणून प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाला आहे. याच मंत्र्याकडे सध्या असणाऱ्या स्विय सहाय्यकाची पत्नी महापालिकेत अतिरिक्त उपायुक्त म्हणून कार्यरत आहे. ह्या दाढीवाल्याचा हस्तक्षेप वाढत असल्याने पालिकेतील अनेक नेते व अधिकारी त्रस्त आहेत. 

सिडको प्रदर्शन केंद्रातील हॅलोजन बंद करा!
वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात महापालिकेने कोव्हीड केंद्र तयार केले आहे. या केंद्रात अधिक क्षमतेचे हॅलोजन रात्रभर सुरू असल्याने रुग्णांना त्रास होत आहे. ज्यादा क्षमतेचे हे हॅलोजन रात्रभर सुरू असल्याने केंद्रात गरमी तयार होते. तसेच आतील हवा बाहेर जाण्यास मार्ग नसल्याने अंतर्गत वातावरणात उष्मा वाढून त्यामुळे रुग्णांची प्रकृती खराब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.  

200 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
नवी मुंबई शहरात गुरुवारी 200 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या पालिकेच्या आकडेवारीनुसार ही सर्वाधिक नोंद आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 4 हजार 391 पर्यंत पोहोचली आहे. परंतू महापालिकेच्या रुग्णालयातून दोन हजार 519 जण बरे झाल्यामुळे सध्या रुग्णालयात एक हजार 734 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरानामुळे गुरुवारी 9 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 138 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

डॉ. राहूल गेठे हे सरकारी सेवेतील अधिकारी आहेत. त्यांना उपायुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली नसून फक्त कोरोनाबाबत क्षेत्रीय स्तरावरील कामकाज पाहण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच लवकरच नवीन डॉक्टर व इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील परिस्थिती लवकरच सुधारेल.
अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई पालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com