...तर दादर स्थानक होणार देशातील सर्वात अत्याधुनिक रेल्वे स्थानक; वाचा काय होणार आहे नेमकं?

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जून 2020

देशातील रेल्वेस्थानकांचा विकास करण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. लंडन, पॅरीसच्या धर्तीवर सुरुवातीला दादर रेल्वे स्थानकाचे रुप पालटणार आहे. यासंदर्भात भारतीय रेल्वे स्टेशन विकास मंडळ आणि दक्षिण कोरियातील कोरियन अँड लँड हाऊसिंग को-ऑपरेशन लिमिटेडसह परस्पर समन्वय करार होणार आहे.

मुंबई : देशातील रेल्वेस्थानकांचा विकास करण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. लंडन, पॅरीसच्या धर्तीवर सुरुवातीला दादर रेल्वे स्थानकाचे रुप पालटणार आहे. यासंदर्भात भारतीय रेल्वे स्टेशन विकास मंडळ आणि दक्षिण कोरियातील कोरियन अँड लँड हाऊसिंग को-ऑपरेशन लिमिटेडसह परस्पर समन्वय करार होणार आहे. हा करार 10 जुलैस होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

...अन्यथा तुमची गाडी जळून खाक होऊ शकते; अग्निशमन दलाने दिला खबरदारीचा इशारा...

या योजनेची पूर्तता झाल्यास दादर देशातील सर्वात अत्याधुनिक रेल्वे स्थानक होऊ शकेल. या अत्याधुनिकीकरणाचा सर्व खर्च सुरुवातीस कोरियातील कंपनी करणार आहे. त्याची परतफेड तीस वर्षात करायची आहे. देशातील रेल्वे स्थानकांचे स्वरुप बदलण्यासाठी तसेच त्यातून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी भारतीय रेल्वे स्थानक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे मंडळ देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करणार आहे. 

झोपडपट्टीपाठोपाठ आता इमारतींमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; महापालिकेनेच जाहीर केली आकडेवारी...

देशातील रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण, अत्याधुनिकीकरणाची प्रक्रिया नवी दिल्ली स्थानकापासून सुरु होणार होती, परंतु आता दादरपासून सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरियाच्या कंपनीने दादर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाची योजना आखताना स्थानिक अधिकाऱ्यांसह चर्चा केली आहे. नव्याने होणारे काम व्हर्टीकल स्वरुपाचे असेल. याचाच अर्थ स्थानकांच्या वरती सर्व सुविधा असतील. स्थानक संकुलातून लांब पल्ल्याच्या तसेच उपनगरी सेवा होतील तसेच फ्लायओव्हरही त्याचाच भाग असतील. 

नियम मोडणाऱ्या खासगी बसगाड्यांवर कारवाई करायची कोणी? प्रादेशिक परिवहन विभागापुढे पेच...

या कामाची प्राथमिक सुरुवात करण्यापू्र्वी पॅरीस, लंडन रेल्वे स्थानकांचा अभ्यास करण्यात आला आहे. हे नूतनीकरण तीन टप्प्यात होईल. त्यातील पहिला टप्पा 456 कोटींचा आहे. त्यासाठी दादर स्टेशनच्या उत्तर बाजूची निवड करण्यात आली आहे. तिथे पाच एफएसआयचे काम होईल. ते एकंदर 7 लाख 16 हजार 445 चौरस फूटाचे असेल. तिथे पार्किंगपासून फेरीवाल्यांची व्यवस्था असेल. दादरचा प्रसिद्ध कापड बाजारही याच ठिकाणी असेल. नव्या योजनेनुसार दादरच्या रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना तसेच प्रवेश करताना प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये याकडे लक्ष देण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dadar station will be developed with new adcance facilities as railway board makes mou with korea