नाल्यांचे बळी थांबेनात; प्रशासनाचे दुर्लक्ष चिमुकल्यांसाठी ठरतायत घातक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

घाटकोपर येथील सावित्रीबाई फुले नगर आणि बेस्ट बस आगारामधून जाणाऱ्या लक्ष्मीबाग नाल्याच्या रुंदीकरणासाठी 2011 मध्ये कंत्राटदार नियुक्त करण्यात आला. या वस्तीतील 292 झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न महापालिका प्रशासन अद्याप सोडवू शकलेले नाही.

मुंबई :  घाटकोपर येथील सावित्रीबाई फुले नगर आणि बेस्ट बस आगारामधून जाणाऱ्या लक्ष्मीबाग नाल्याच्या रुंदीकरणासाठी 2011 मध्ये कंत्राटदार नियुक्त करण्यात आला. या वस्तीतील 292 झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न महापालिका प्रशासन अद्याप सोडवू शकलेले नाही. त्यामुळे 240 मीटर लांबीच्या नाल्यालगत संरक्षक भिंत बांधण्याचे कामही रखडले आहे. याच भागात हुसेन शेख नाल्यात पडला होता. रात्री अग्निशमन दलाने या मुलाचा शोध थांबवला. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा मुलगा स्थानिकांना नाल्यात आढळला. त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

वाचा ः स्थलांतरीत कामगारांचे मुंबईत परतण्यासाठी मालकांना साकडे; वाचा बातमी

प्रशासनाने वेळीच या भागातील रहिवाशांचे पुनर्वसन केले असते, तर ही दुर्घटना घडलीच नसती, असा आरोप भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केला. याबाबत अनेक वेळा प्रशासनासोबत बैठकाही घेतल्या होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नाल्यात पडून लहान मुलाचा जीव जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. 

वाचा ः लॉकडाऊनमध्ये एसटीने शोधला उत्पन्नाना नवा मार्ग; 21 लाखांचे मिळाले उत्पन्न

गेल्या वर्षी याच प्रकारे तीन लहान मुलांचा बळी गेला. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावर आंबेडकर चौकात राहणारा दोन वर्षाचा दिव्यांश धानसी रस्त्यालगतच्या नाल्यात पडला. झाकण नसलेल्या या नाल्यावर स्थानिकांनी प्लायवूड टाकले होते. त्यावरून हा मुलगा नाल्यात पडला. नाल्यावरील झाकण चोरीला गेल्याचा दावा नंतर महापालिकेने केला होता. 

वाचा ः क्रीडाविश्वासाठी आशेचा किरण; कोरोनाच्या संकटातही युरोपातील 'ही' प्रतिष्ठेची फुटबॉल लीग पार पडली.. वाचा सविस्तर...

धारावीतही गेल्या वर्षी नाल्याने सातवर्षीय मुलाचा बळी घेतला. धारावी पिवळा बंगला परिसरातील नाल्यात सुमित जैसवाल नावाचा मुलगा पडला होता. हा नाला थेट मिठी नदीला मिळतो. या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने त्याला शोधणे स्थानिकांनाही शक्‍य झाले नाही. खड्डेही लहान मुलांचे बळी घेत आहेत. वरळी येथे कोस्टल रोडच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 12 वर्षांच्या बबलू कुमार पासवान याचा मृत्यू झाला होता.

वाचा ः वाफेघर ग्रामस्थांच्या एकीमुळे गाव उजळले; जनसहभागातून महावितरणच्या कामाला वेग...

प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा 2017 मध्ये एल्फिन्स्टन रोड येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. पावसाचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी स्थानिकांनी या मॅनहोलचे झाकण उघडल्याचा दावा करत महापालिकेने काही जणांवर कारवाई केली होती. त्यानंतर मॅनहोलच्या झाकणाखाली लोखंडी जाळ्या बसवण्यास महापालिकेने सुरुवात केली. या जाळ्या फक्त मॅनहोलवर बसवण्यात आल्या आहेत. रस्त्यालगतच्या नाल्यांवरील तुटलेली झाकणे तातडीने बदलण्याची मागणी नागरिक करत आहेत.

वाचा ः आयुषमान खुराना म्हणाला, अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले...

अशी आहे परिस्थिती

  •  मोठ्या नाल्यांलगत अनेक ठिकाणी संरक्षक भिंतींचा अभाव.
  •  नाल्याना लागून अनेक ठिकाणी घरे.
  •  लहान नाल्यांवरील फायबरची झाकणे हलकी, कमकुवत.
  •  पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नागरिकांकडून झाकणे बाजूला.
  •  कमकुवत झाकणे तुटण्याचे प्रमाण जास्त.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to negligence of bmc administration, childrens flooded in drainage