तब्बल तीस वर्ष सेवा दिल्यानंतर आयएनएस विराट निघाली शेवटच्या प्रवासाला

तब्बल तीस वर्ष सेवा दिल्यानंतर आयएनएस विराट निघाली शेवटच्या प्रवासाला

मुंबई, ता. 19 : देशासाठी गेली तीस वर्षे भारतीय नौदलाची समर्थपणे सेवा बजावणारी विमानवाहू युद्धनौका INS विराट आज आपल्या अखेरच्या प्रवासासाठी गुजरातमधील अलांग या भंगारखान्याकडे निघाली. तेथे ही युद्धनौका तोडून तिचे पोलाद पुनर्वापरासाठी वितळवले जाईल. 

मूळची ब्रिटिश नौदलातील एचएमएस हार्मिस ही युद्धनौका 12 मे 1987 मध्ये भारतीय नौदलात आयएनएस विराट म्हणून समाविष्ठ झाली. श्रीलंकेच्या किनारपट्टीवर जाऊन भारतीय शांतीसेनेला मदत, कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानच्या किनारपट्टीजवळ जाऊन कराचीतील पाकिस्तानी नौदल बंदराची टेहळणी आणि नाकेबंदी अशा महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विराटला 6 मे 2017 रोजी नौदलसेवेतून निवृत्ती मिळाली. तिच्यावर नौदल संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव होता, मात्र त्यात कोणी फारसा रस न दाखवल्याने अखेर ती भंगारात काढण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज तिला ताकदवान टग बोटींच्या साह्याने ओढत गुजरातकडे नेण्यास सुरुवात झाली. 

  • वजन - 28 हजार 500 टन
  • लांबी - 227.33 मीटर
  • रुंदी - 46.5 मीटर
  • नांगर - प्रत्येकी आठ टनांचे दोन नांगर
  • इंजिनक्षमता - 76 हजार अश्वशक्ती
  • वीजनिर्मिती - 9 मेगावॉट

ही युद्धनौका सेवेत असताना तिच्यावर दीड हजार नौसैनिक रहायचे, सीकिंग आणि सी हॅरियर ही इंग्लंडची पराक्रमी हेलिकॉप्टर आणि विमाने विराटची शान वाढवीत असत. त्याखेरीज चेतक, कामोव्ह तसेच भारतीय बनावटीचे ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर यांनीदेखील तिच्यावरून उड्डाणे केली होती. ब्रिटनमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत 1944 मध्ये तिचे बांधकाम सुरु झाले होते. त्यामुळे जगातील सर्वात जास्त काळ सेवा बजावलेली विमानवाहू युद्धनौका असा तिचा लौकीक होता. 

ही नौका शांतीकाळात बराचवेळ मुंबईच्या नौदल गोदीत होती. मुंबईत वा देश-विदेशातील बंदरांमध्ये घालवलेला तिचा कालावधी वगळला तर तिच्या आतापर्यंतचा समुद्रावरील प्रवासाच्या वेळेची बेरीज दोन हजार 258 दिवस (6 वर्षांपेक्षा जास्त) भरते. या कालावधीत तिच्यावरील विमाने आणि हेलिकॉप्टरनी 22 हजार 622 तास उड्डाणे केली. तर आतापर्यंत तिच्यावरील बॉयलर (मुख्य इंजिन) 80 हजार 715 तास (सव्वानऊ वर्षे) धगधगत होते. 

( संपादन - सुमित बागुल )

final voyage of INS viraat starts battleship will be dismantled in gujrat

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com