वरळीतील रुग्णांमुळे प्रभादेवीतही वाढली चिंता, वाचा काय झालं नेमकं... 

Ground Report Prabhadevi
Ground Report Prabhadevi

मुंबई : मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धिविनायक मंदिर आणि शतकाहून मोठा इतिहास असलेल्या प्रभादेवी मंदिरासारखी दोन मोठी देवालये असलेला प्रभादेवी परिसर आज कोरोनाच्या सावटाखाली आहे. प्रभादेवीची मुख्यतः तीन भागांत विभागणी होते. समुद्राजवळचा भाग म्हणजे जुनी प्रभादेवी, पुढे नवी प्रभादेवी आणि मध्य प्रभादेवी असे तीन भाग. भौगोलिक रचनेत जुनी प्रभादेवी आणि वरळी मतदारसंघ यांच्या सीमा एकच असल्यामुळे आणि वरळी हाच कोरोनाचा मुंबईतील केंद्रबिंदू ठरल्याने जुनी प्रभादेवीदेखील तणावग्रस्त बनली आहे. 

कधी काळी येथून जवळच असलेल्या बॉम्बे डाइंग, स्टॅण्डर्ड मिलमुळे प्रभादेवी परिसर हा गिरणी कामगारांचा परिसर म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे अनेक वाड्या आणि चाळी विस्तारलेल्या होत्या. पुढे प्रभादेवीचे रूपडेच बदलले. पेडर रोड, मरिन्स लाईन्स यांच्यासारख्या स्क्वेअरफूटच्या हिशेबाने टोलेजंग आणि गगनाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती उभ्या राहिल्या. जुन्या प्रभादेवीत अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे बंगले आहेत. नेस वाडिया, ज्येष्ठ अभिनेत्या सुलोचना, अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि तिचा पती रणवीर सिंग आदी अनेक कलाकार नव्या प्रभादेवीत राहतात; मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरिकांना किमान जीवनावश्‍यक वस्तूंसाठी तरी दबक्‍या पावलाने घराबाहेर पडावे लागत आहे. 

कोरोनाची सुरुवात कशी झाली? 
26 जुलैच्या प्रलयातही प्रभादेवीमध्ये गुडघाभरही पाणी साचले नव्हते; आता मात्र कोरोनामुळे प्रभादेवीकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे वरळी कोळीवाड्यात पसरलेली कोरोनाची साथ. जुनी प्रभादेवी येथे असलेल्या डॉ. पारिख यांना कोरोना झाल्याची बातमी आली आणि सर्वांच्या मनात धस्स झाले, कारण या डॉक्‍टरांकडे परिसरातील अनेक जण जात असतात. त्यानंतर कोळीवाड्यात आठ रुग्ण सापडले. काही दिवसांत आदर्शनगर येथेही रुग्णांची माहिती पुढे आल्यावर जुनी प्रभादेवीतील नागरिकांची पाचावर धारण बसण्यास सुरुवात झाली. 

हॉटस्पॉट नेमके कोणते? 
वरळी-प्रभादेवी हॉटस्पॉट झाल्याच्या बातम्या झळकू लागल्या तशी चिंता वाढू लागली. भौगोलिकदृष्ट्या वरळी हा हॉटस्पॉट होता; पण त्यात प्रभादेवीचेही नाव आल्याने पोलिसांनी नाकेबंदी केली. त्यामुळे जुन्या प्रभादेवीत रुग्ण नसतानाही चिंता वाढली. दूध, भाजीपाला आदी जीवनावश्‍यक वस्तूंसाठी दोन दिवसांतून किमान एकदा तरी इमारतीच्या बाहेर जावे लागते. एखाद्‌ दुसरे दुकान सुरू असेल, तेथून जे काही हाताला लागेल ते खरेदी करताना आजूबाजूला असलेली व्यक्ती वरळीतून तर आलेली नाही ना, ही शंका कायम प्रत्येकाच्या मनात असते. 

"खाडा' परिसरातील चिंता 
जुन्या प्रभादेवीत चिंतेचे वातावरण असताना मध्य प्रभादेवीत मात्र कोणतीही चिंता नाही. तेथील रहिवाशांना जीवनावश्‍यक वस्तू मिळवण्यात कोणतीही अडचण येत नाही, परंतु मध्य प्रभादेवीतील एका टोकाला असलेला "खाडा' या परिसरात काही रुग्ण सापडल्यामुळे संपूर्ण प्रभादेवी परिसर हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला असावा. "खाडा' परिसरात पूर्वी फार झोपडपट्ट्या होत्या, वस्तीही भरपूर होती. "एसआरए'मधून आता तेथे अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत; मात्र पूर्वीपासून गर्दीचा भाग असलेल्या या परिसरात आता इमारतींचीही गर्दी झाली आहे. तेथील दोन नंबरच्या इमारतीत दोन जण पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी एका वृद्ध महिलेचे निधन झाले, पण तिला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथे तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यात अनेकांनी स्वतःहून चाचणी करून घेतली. 

अफवाच अधिक 
प्रभादेवी परिसराचे तीन भाग असले, तरी येथे कोकणातील रहिवासी अधिक आहेत. त्यामुळे एकमेकांचे नातेवाईक तीन भागांत विभागलेले. अशातच कोरोनाबाबत बरी-वाईट बातमी ऐकण्यात आली की अफवांचे पेव फुटते. खरी माहिती कोणाकडेही नसताना केवळ अंदाज बांधत बातम्या पसरवल्या जातात. त्यामुळे विनाकारण चिंता वाढत आहे. 

एक परिसर दोन नगरसेवक 
भौगोलिक दृष्ट्या तीन विभागांत असली तरी प्रभादेवी हा एकच विभाग; मात्र विभागात हेमांगी वरळीकर आणि समाधान सरवणकर असे दोन नगरसेवक. वरळीकर स्वतः कोळीवाड्यात राहत असल्याने त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी आहे. 

दृष्टिक्षेपात 

  •  प्रभादेवीत एकूण 10 रुग्ण 
  •  खाडा परिसरात एका वृद्ध महिलेचा मृत्यू 
  •  निर्जंतुकीकरणाचे प्रमाण वाढवण्याची गरज 
  •  काही भागांत नाकाबंदीमुळे जीवनावश्‍यक वस्तू मिळण्यास अडचणी 
  •  विभागवार इमारतींच्या गेटवरच भाजीपाला उपलब्ध करून देण्याची गरज 

माझ्या प्रभागात वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा काही भाग येतो. त्यामुळे दोन्हीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची आणि पोलिसांची मदत घेत आहोत. 
- हेमांगी वरळीकर, नगरसेविका. 

प्रभादेवीतील एका कुटुंबाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. कोरोना पसरू नये यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. उपाययोजना केल्याने या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. 
- समाधान सरवणकर, नगरसेवक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com