मनसेच्या विरोधी पक्षनेत्यासह 17 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पार्श्व इंडस्ट्रीयल प्रिमायसेस सोसायटीमधील कमिटी सदस्यांनी सोसायटी मेंटेनन्सचे चुकीचे आकडे दाखविले. तसेच बँकेच्या रिसीटमध्ये खाडाखोड करून व सोसायटीच्या आवारात अनधिकृतपणे गाळे बांधून त्यावर टॅक्स वसूल केला.

डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडील पार्श्व इंडस्ट्रीयल प्रिमायसेस सोसायटीचे सदस्य व कल्याण डोंबिवली महापालिकेचे विरोधी पक्षनेता मंदार हळबे यांच्याविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात स्वतःच्या फायद्याकरता 1 कोटी 9 लाख 84 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते हळबे यांनी संबंधित सोसायटी आपण 5 वर्षांपूर्वीच सोडल्याचे सांगितले. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पार्श्व इंडस्ट्रीयल प्रिमायसेस सोसायटीमधील कमिटी सदस्यांनी सोसायटी मेंटेनन्सचे चुकीचे आकडे दाखविले. तसेच बँकेच्या रिसीटमध्ये खाडाखोड करून व सोसायटीच्या आवारात अनधिकृतपणे गाळे बांधून त्यावर टॅक्स वसूल केला. तसेच याबाबतची चुकीची माहिती देत शासनाचा आयकर बुडवून कोट्यवधी रकमेचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत शरद जोशी यांनी केडीएमसीतील मनसेचे विद्यमान विरोधी पक्षनेते मंदार हळबे, व्यावसायिक आणि सोसायटीचे चेअरमन मुकुंद इनामदार यांच्यासह सोसायटीचे 12 समिती सदस्य तसेच विकासकाच्या 5  सदस्यांविरोधात डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: Kalyan news filed fraud case against MNS leader