केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सव मंडळाने घेतला महत्वाचा निर्णय; 'असा' साजरा करणार उत्सव...

keshavji naik
keshavji naik

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाची सुरुवात झाली ती केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सवाने. त्यानंतर मुंबईत अनेक गणेशोत्सव मंडळांची स्थापना झाली. दरवर्षी मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राज्यातील अनेक भागातून लोक मुंबईचा गणेशोत्सव पाहायला येतात. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने गणेशोत्सव साध्यापद्धतीने आणि गर्दी न करता साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

या पार्श्वभूमीवर केशवजी नाईक चाळ या सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव एका घरात साजरा करण्याचे ठरवले आहे. ढोल ताशा तसेच लाऊडस्पीकरचाही वापर न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आमची गणेशमूर्ती कायम दोन फूट उंच असते. तिची स्थापना चाळीच्या परिसरात झाली होती. यंदा आम्ही गणेशोत्सव एका खोलीत साजरा करण्याचे ठरवले आहे. येथील एकाचे घर सध्या रिकामेच आहे. त्यांना आम्ही गणेशोत्सवासाठी जागा देण्याची विनंती केली. ही खोली 160 चौरस फूट आहे. आमच्या संस्थेचे दोन कार्यकर्तेच आरतीसाठी त्या खोलीत जातील. आम्ही आमच्या प्रवेशद्वाराजवळ स्क्रीन ठेवणार आहोत. त्यावरुन श्री गणेशाचे दर्शन घेता येईल. सध्याच्या परिस्थितीत खूप खबरदारी घेण्याची गरज आहे, असे संस्थेचे सचिव अशोक पेडणेकर यांनी सांगितले.  

आम्ही गणेशोत्सव साजरा करताना एकमेकांचा कमी संपर्क कसा होईल याकडे जास्त लक्ष दिले आहे. दरवर्षी आम्ही मुलांसाठी विविध कार्यक्रम घेत असतो, पण यंदा कोणतेही कार्यक्रम होणार नाही. चौघे जण श्री गणेशाची मूर्ती घेऊन येतील. आम्ही स्क्रीनवरुनच दर्शन घेण्याची विनंती केली आहे. आम्ही आमच्या परिसरात कृत्रिम तळे तयार करणार आहोत. त्यात साधेपणाने श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, आत्तापर्यंत मुंबईतील दीडशे गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावर अथवा फूटपाथवर मंडप बांधण्यासाठी अर्ज केला आहे. मुंबईत 14 हजार प्रमुख गणेश मंडळे आहेत. गतवर्षी परवानगी देण्यात आलेल्या मंडळांनी यंदा पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. यामुळे अडीच हजार मंडळांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मुंबई महापालिकेकडे दरवर्षी तीन ते चार हजार अर्ज येत असतात.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com