esakal | अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्याही लागताहेत रांगा; मग सोशल डिस्टन्सिंग कसं पाळणार??
sakal

बोलून बातमी शोधा

csmt crowd

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर या कर्मचाऱ्यांची थर्मल तपासणी केली जात असून त्यांचे ओळखपत्र सुद्धा तपासले जात आहे. हीच पद्धत लोकल थांबा असलेल्या सर्वच रेल्वे स्थानकांवर असल्याने मंगळवारी कर्मचाऱ्यांना ऐन घरी जाण्याच्या वेळेत लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्याही लागताहेत रांगा; मग सोशल डिस्टन्सिंग कसं पाळणार??

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने सोमवारपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली. पहिल्या दिवशी नगण्य कर्मचाऱ्यांनी लोकलने प्रवास केल्यानंतर मंगळवारी तीनही रेल्वे मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे सायंकाळी कर्मचारी घरी जाताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्याबाहेर कर्मचाऱ्यांच्या रांगा दिसून आल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांचे जबाब नोंदवले; मात्र....

अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्ट्रीने राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या एकमताने लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी या कर्मचाऱ्यांसाठी एसटी आणि बेस्टच्या गाड्याने प्रवास करावा लागत होता. कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केल्याची माहिती कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी मिळाली नाही. परिणामी मंगळवारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी तीनही मार्गांवरील रेल्वे स्थानकांवर गर्दी केली होती. 

बॉलीवूडच्या पडद्यामागील 'तो' काळाकुट्ट अंधारच ठरतोय घातक... ​

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर या कर्मचाऱ्यांची थर्मल तपासणी केली जात असून त्यांचे ओळखपत्र सुद्धा तपासले जात आहे. हीच पद्धत लोकल थांबा असलेल्या सर्वच रेल्वे स्थानकांवर असल्याने मंगळवारी कर्मचाऱ्यांना ऐन घरी जाण्याच्या वेळेत लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या आहे. मात्र या रांगेमुळे सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे. 

टी-20 विश्वचषकाबाबत भारताचे दबावतंत्र; ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आणि क्रिकेट मंडळात मात्र मतभिन्नता...​

मध्यरात्री घोषणेचा रेल्वेला फटका
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 15 जूनपासून लोकल सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केली. त्यानंतरच्या निर्णयाची कर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना आतुरता लागली होती. मात्र, रेल्वे विभागाने यासंबंधीतील घोषणा रात्री 11.30 वाजेपर्यंत राखून धरल्याने हा निर्णय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचू शकला नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. मात्र, मंगळवारी याच कर्मचाऱ्यांची रेल्वे स्थानकांबाहेर प्रचंड गर्दी दिसून आली. पश्चिम रेल्वे मार्गावरील अत्यावश्यक सेवेसाठी मंगळवारी 162 लोकल धावण्यात आल्या असून, रात्रीपर्यंत सुमारे 35 हजार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रवास केल्याची माहिती पश्चिम रेल्वे जनसंपर्क विभागाने दिली आहे.
 

आता कस्तुरबात दिवसाला ८०० चाचण्या करणं होणार शक्य, कारण कस्तुरबात आलंय 'हे' नवीन मशीन

पश्चिम रेल्वे मार्गांवरील प्रत्येक लोकलमध्ये 700 प्रवाशांनाच प्रवास करता येतो. सध्या 400 प्रवासी प्रवास करत असून कुठेही गर्दी झालेली नाही. तसेच कोव्हिड-19 च्या नियमांचे पालन केल्या जात आहे. सोशल माध्यमांवर जुने व्हिडीओ व्हायरल करून पश्चिम रेल्वेच्या कार्याला बदनाम केले जात आहे. 
- रविंद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग आणि कोव्हिडचे नियम पाळण्याचे संपूर्ण प्रयत्न केले जात आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर रेल्वेचे सर्व अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर आहे. प्रवाशांची गर्दी होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या; तसेच प्रवाशांनीही रेल्वे प्रशासनाला सहकार्य केले आहे. यामध्ये नियमांचे कुठेही उल्लंघन करण्यात आले नाही.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

loading image