गणेशोत्सवाला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी नियम आणि व्यवस्था करावी; माजी मंत्री नसीम खान यांची मागणी

train
train

मुंबई: सध्याची कोरोना व टाळेबंदीची अवस्था पाहता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी नियम आणि व्यवस्था तयार करावी. त्यांच्यासाठी यंत्रणा आणि विनामूल्य वाहतुकीची व्यवस्थाही करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री व माजी आमदार मोहमद आरीफ (नसीम) खान यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

कोरोनाचा फैलाव होण्याच्या भीतीमुळे भारतातून हाज ला देखील यात्रेकरू गेले नाहीत, तसेच पंढरीची वारी देखील रद्द करण्यात आली. अशातच कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव ऑगस्ट अखेरीस येत असल्याने त्याची पूर्वतयारी राज्य शासनाने आतापासूनच केली पाहिजे. 

सध्या कोरोनामुळे आणि निसर्ग चक्रीवादळामुळे आधीच कोकणवासियांचे पुष्कळच नुकसान झाले आहे. तरीही घराघरात हा सण साजरा होणारच आणि घरच्या उत्सवाला जावे असे शहरातील भाविकांना वाटणारच. त्यामुळे या भाविकांना परवानग्या, वाहतूक व्यवस्था, अन्य व्यवस्था याबाबत सरकारने आधीच विचारविनिमय करून निर्णय घ्यावा व त्याची तयारी सुरु करावी. भाविकांना कोकणात कसे जाऊ द्यावे, काय काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंग कसे पाळावे, वैद्यकीय व्यवस्था कशी असावी याबाबत आधीच सर्व पातळ्यांवर चर्चा करावी, अशी मागणी नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. 

सध्या जिल्हाअंतर्गत वाहतूक सुरु असली तरी दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते आहे. दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी व रेल्वे बंद असल्याने भाविकांच्या प्रवासासाठीही सरकारने व्यवस्था करावी. पुढील दीड महिन्यात परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारली तर कोकणात जाणाऱ्या भाविकांना परवानगी देता येईल. मात्र सध्याच्या निराशाजनक वातावरणात भाविकांमध्येही अस्वस्थता आहे. 

त्यामुळे सरकारने या विषयावर त्वरेने पावले उचलून व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. निदान एकाच घरात राहणाऱ्यांना कोकणात जाण्याची परवानगी द्यावी का, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार असेल तर भाविकांना स्वतःच्या वाहनांनी कोकणात जाण्यास परवानगी द्यावी का, कोरोनाचा फैलाव नसेल त्या विभागांबाबत काय धोरण असावे, आदी विषयांवर सरकारने निर्णय घ्यावा, असेही नसीम खान यांनी म्हटले आहे. 

खरे म्हणजे गणेशोत्सवात राज्यात सर्वत्र भाविक आपापल्या नातलगांकडे जात असतात, त्यामुळे सर्वांबाबतच निर्णय होणे जरुरी आहे. मात्र कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने त्याबाबत प्राधान्याने विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

make decisions for people who travel in ganesh festival 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com