महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा अधिक धोका; ही आहेत कारणे?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका जास्त असल्याचे युरोपातील एका संशोधनातून समोर आले आहे. जगभरात कोरोना बाधित रुग्णामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. यामागील नेमके कारणे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे. 

मुंबई : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची भारतातही अनेकांना बाधा झाली आहे. प्रत्येकाने पुरेशी काळजी न घेतल्यास कोरोनाचा धोका कायम आहे. विशेष म्हणजे महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका जास्त असल्याचे युरोपातील एका संशोधनातून समोर आले आहे. जगभरात कोरोना बाधित रुग्णामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. यामागील नेमके कारणे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईकरांच्या मदतीला धावले वर्ध्यातील 45 डॉक्‍टरांचे पथक

या संशोधनासाठी 11 युरोपियन देशांमधील काही हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी हृदरोग असलेल्या रुग्णांच्या दोन गटांकडून घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये 'एसीई 2'चे प्रमाण मोजले. पहिल्या गटात 1 हजार 485 पुरुष आणि 537 महिलांचा समावेश होता. तर दुसऱ्या गटात 1 हजार 123 पुरुष आणि 575 महिलांचा समावेश आहे. या अभ्यासातून पुरुषांमध्ये आजाराचे प्रमाण अधिक आढळून आले.

ही बातमी वाचली का? चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, दिवसभरात इतके रुग्ण...

प्रत्येकाच्या शरीरात एक 'एसीई 2' म्हणजेच 'एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टरटिंग एन्झाइम' हा घटक असतो. यामुळे आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे आपले रक्तदाब वाढतो. त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. युरोपियन हार्ट जर्नलमधील माहितीनुसार, महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या रक्तात 'एसीई 2'चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचे किंवा त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त आहे. 

ही बातमी वाचली का? महाविकास आघाडीतल्या मंत्र्यालाच शिवसेनेकडून हा खोचक सल्ला

भारतात 65 टक्के पुरुषांना  कोरोना
भारतातील कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये पुरूषांचे प्रमाण  65 टक्के आहे, तर स्त्रियांचे प्रमाण 35 टक्के आहे. यामागे अनेक कारणे आहेत.  त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे अनुवांशिकता. अनुवांशिकतेमुळे 'एसीई 2'चे पुरुषांमध्ये प्रमाण जास्त असते. त्यामुळे पुरुषांना हृदयासंबंधित विकार जास्त असतात. त्यामुळे कोरोनाचा पुरुषांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याचे हा अहवाल सांगतो.

ही बातमी वाचली का? मोदींच्या भाषणानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणतात...

एन्झाईमचे तीन प्रकार
'एसीई 2' या एन्झाईमचे एन्जिओटेन्सिन 1, एन्जिओटेन्सिन 2 आणि रेनीन असे तीन प्रकार आहेत. ज्या व्यक्तीला जास्त रक्तदाबाचा त्रास असतो त्यांच्यात एन्जिओटेन्सिनचे प्रमाण जास्त असते. त्यांना 'अॅन्टीहायपरटेन्सिव्ह एसीई एन' आणि 'एआरबी इन्हिबिटर्स' दिले जातात. त्यामुळे रक्तदाब पूर्वपदावर आणण्यासाठी मदत होते. ज्या लोकांना जास्त ताण असतो, त्या व्यक्तींना या गोळ्यांचे अतिसेवन धोकादायक ठरु शकते, असही कोविड औषधवैद्यकशास्त्र पथकप्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले. 

पुरुषांपेक्षा महिला तंदुरुस्त
आरोग्याचा विचार केला तर पुरुषापेक्षा महिला अधिक तंदुरुस्त आहेत. शारीरीक आजारामुळे होणाऱ्या मृत्युसंख्येत पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत दुप्पट आहे. 'अमेरिकन जर्नल ऑफ रेस्पिरेटरी अँड क्रिटिकल केअर'च्या अभ्यासातही 50 टक्क्यांपेक्षा जास्त पुरुष असंसर्गित आजारांनी ग्रासल्याचे समोर आले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगाच्या व्याधी असलेल्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो, असा निष्कर्ष संशोधनातून काढण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men have a higher risk of corona than women Findings from research in Europe