Vidhan Sabha 2019 : लोकभावना नसलेलं सरकार उलथवून टाका : पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

पाच वर्षातील भाजपचा कारभार पाहता बदल हवा, अशी भावना लोकांनी बनवली आहे. परिवर्तनाची गरज आहे. कारण समाजातला असा कोणताही वर्ग नाही की तो समाधानी आहे.

मुंबई : 'देशातला प्रत्येक वर्गातील माणूस त्रस्त असताना उद्योगपतींची लाखो-कोटी रूपयांची कर्जमाफी मोदी सरकार देत आहे. मोदी आणि फडणवीस सरकारला लोकभावनेची कदर नाही. त्यामुळे हे सरकार उलथवून टाका,' असे आवाहन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. चेंबूर येथील सभेत अणुशक्तीनगरचे राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक आणि चेंबूरमधील काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

- Vidhan Sabha 2019 :..तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलीच नसती : डॉ. कोल्हे

यावेळी उपस्थित जनसमूहाला संबोधित करताना पवार म्हणाले की, 'पाच वर्षातील भाजपचा कारभार पाहता बदल हवा, अशी भावना लोकांनी बनवली आहे. परिवर्तनाची गरज आहे. कारण समाजातला असा कोणताही वर्ग नाही की तो समाधानी आहे. शेतकरी, कामगार, युवक, महिला, विद्यार्थी, व्यापारी सगळे नाखूश आहेत. हाताला काम नसल्याने बेरोजगारीची स्थिती चिंताजनक बनली आहे, पण या सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. 

- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतोय 'सट्टाबाजार'?

मोदी सरकारने मोठ्या उद्योगपतींचे 70-80 हजार कोटी कर्ज माफ केले, पण शेतकऱ्याचे कर्ज माफ करत नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला. आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात उद्योग उभे केले, पण आज पन्नास टक्के उद्योग बंद पडलेत. जे सुरू आहेत, ते कसेबसे सुरू आहेत. कामगार उघड्यावर पडला आहे, पण या सरकारला भावनिक मुद्द्यावर निवडणूका लढवायच्या आहेत. 

हे सरकार लोकांच्या हिताची जपणूक करणारं नाही. म्हणून ते उलथवून टाकायलाच हवं, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

- Vidhan Sabha 2019 : मतदाराच परिवर्तन घडवू शकतात : सिन्हा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Sharad Pawar comment about State and Central Government