नाईट लाईफ ठीक आहे; सामाजिक सुरक्षेचे काय?

File Photo
File Photo

मुंबई : राज्यात नवीन सरकार आल्याने नाईट लाईफची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपला ड्रीम प्रोजेक्‍ट साकारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन त्यांनी याबाबत नुकतीच माहिती घेतली.

मुंबईत 8 जानेवारी रोजी झालेल्या विधिमंडळाच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नाईट लाईफच्या त्यांच्या संकल्पनेबद्दल फार काही सांगितले नाही. पण लवकरच करू, अशा शब्दांत त्यांनी मध्यरात्रीनंतरची मुंबई आता अधिकृतरित्या जागी राहील, याचे सूतोवाच केले.

काय आहे नाईट लाईफ? 
रात्रीच्या निवांत कुशीत मनोरंजनाची, तसेच आनंदाची उधळण म्हणजे नाईट लाईफ. सिंगापूर, दुबई, बॅंकॉक या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये नाईट लाईफची संकल्पना स्वीकारली गेली आहे. मुंबईतही चकाकती दुनियेचा हा अनुभव सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतर देशांप्रमाणे मुंबईतही हे नाईट लाईफ एन्जॉय करता यावे, याबाबतची संकल्पना मांडून त्याचा पाठपुरावा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुरू केला आहे. याआधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या गृह विभागाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत नाईट लाईफच्या प्रस्तावातील हवा काढून टाकली होती. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने नाईट लाईफचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठवला होता. पण त्यावेळी राज्याच्या नगरविकास विभागाने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. आता मात्र नाईट लाईफच्या मार्गातले अडथळे दूर होऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री झाल्याने या प्रस्तावावर सकारात्मक कार्यवाही होणार आहे.

नाईट लाईफला पालिकेत आतापर्यंत विरोध करणारा कॉंग्रेस पक्ष शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाल्याने त्यांचाही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे. अनेक मुंबईकरांची कामाची शिफ्ट उशिरा सुटत असल्याने त्यांना काही खरेदी करायची असल्यास अडचण निर्माण होते. म्हणून पालिका आयुक्तांकडे कमर्शियल दुकाने 24 तास सुरू ठेवण्याची मागणी केल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. परंतु हॉटेल, बार 24 तास सुरू ठेवताना सुरक्षेची काळजी घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. मुंबईतल्या अनिवासी भागातील सर्व ठिकाणे रात्रभर खुली ठेवण्याची विनंती आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना केलीय. मुंबई आणि इतर शहरांत नाईट लाईफसाठीच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका, मुंबई पोलिस आयुक्त यांनीही हिरवा कंदील दाखवलाय; तर गेल्याच वर्षी विधिमंडळातही हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. 

पर्यटन वाढीस चालना मिळणार
आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईत जगभरातून पर्यटक येतात. अनेक देशांप्रमाणे मुंबईदेखील रात्री सुरू राहिल्यास पर्यटकांची संख्या वाढू शकते. विदेशातून आलेले पर्यटक दिवसा पर्यटन, तर रात्री शॉपिंग करू शकतील. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून अर्थव्यवस्था वाढीस मदत होईल. 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल 
मुंबईतील सव्वा कोटी जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी ही 45 ते 50 हजार पोलिसांवर आहे. अशातच नाईट लाईफ सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास पोलिसांवर ताण येईल, तसेच कायदा व सुरक्षेचा प्रश्‍नही निर्माण होईल, असे मत माजी पोलिस अधिकारी वसंत ढोबळे यांनी व्यक्त केले. पोलिसांवर आधीच सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचा ताण आहे. त्यात पुन्हा रात्रभर दुकाने उघडी राहिल्यास त्यांच्यावर ताण येईल. यामुळे निदान 20 हजारांच्या अतिरिक्त पोलिस दलाची आवश्‍यकता भासणार आहे. त्यामुळे पुरेशी खबरदारी घेतल्याशिवाय असा कुठलाही निर्णय घेऊ नये, असेही मत ढोबळे यांनी व्यक्त केले आहे. 

महिला सुरक्षा धोक्‍यात येईल 
महिलांवरील विविध अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातच नाईट लाईफ सुरू केल्यास महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. नाईट लाईफमुळे मुंबईतील ठराविक परिसरात लोकांची गर्दी वाढेल. त्यात महिलाही मोठ्या संख्येने येतील. या महिलांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला पटेल यांनी उपस्थित केला आहे. नाईट लाईफ सुरू करण्यापूर्वी महिलांच्या सुरक्षेची हमी सरकारने आणि पोलिसांनी घ्यावी, असेही त्या म्हणाल्या. 

गुन्हेगारी वाढण्याची शक्‍यता 
नाईट लाईफचा प्रयोग करण्यास काही हरकत नाही, मात्र यामुळे गुन्हेगारीचा आलेख वाढण्याची शक्‍यता आहे, अशी भीती माजी अपर पोलिस संचालक पी. के. जैन यांनी व्यक्त केली. यामुळे अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताची गरज भासेल. एकाबाजूचा पोलिस बंदोबस्त कमी करून तो नाईट लाईफसाठी तैनात करावा लागेल. तरीदेखील नाईट लाईफवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होईल, असे वाटत नाही, असेही जैन यांनी सांगितले. 

सर्वसामान्यांना त्रास नको 
मुंबई हे भारतातील आंतरराष्ट्रीय शहर असून ते कायम चालू राहिले पाहिजे. हे जरी खरे असले तरी मुंबईतील सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि येथील कायदा व सुव्यवस्थेवर कुठेही व कधीही बाधा येणार नाही, याची शासनाला काळजी घ्यावी लागेल, असे मत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केले. मुंबईत रेल्वे, एसटी व खासगी वाहनांची ये-जा सुरू असते. मुंबईतील सोईच्या दृष्टीने आवश्‍यक असलेले हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्रभर चालू ठेवण्यास हरकत नसावी, मात्र तेथील बियर बार, पब, वाईन शॉप्स, मॉल्स व चित्रपटगृहांना अजिबात परवानगी देऊ नये. एक वेगळा प्रयोग आणि गरज म्हणून हरकत नसावी, पण चंगळ करण्यासाठी बिलकूल नको, असेही गलगली म्हणाले. 

होणाऱ्या परिणामांचा विचार व्हावा 
नाईट लाईफ सुरू करण्यापूर्वी त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करणे आवश्‍यक आहे. नाईट लाईफमध्ये केवळ हॉटेल नाही, वाहतूक कोंडी, रेल्वे, बस या सरकारी वाहतूक व्यवस्थेसह टॅक्‍सी, रिक्षा आदी वाहतुकींवर होणाऱ्या परिणामांचा विचारही करावा लागेल, असे मत माजी पोलिस अधिकारी समशेर पठाण यांनी व्यक्त केले. नाईट लाईफ ही ठराविक परिसरात सुरू करता येणार नाही, त्याची अंमलबजावणी संपूर्ण मुंबईत करावी लागेल, त्यामुळे संपूर्ण मुंबईवरील ताण वाढण्याची भीती पठाण यांनी व्यक्त केली आहे. 
Nightlife is fine; What about Social Security?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com