दहिसरला कोरोनामुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्न; जाणून घ्या काय करतायत तर..

health checkup
health checkup

मुंबई : मुंबईत सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला तो वरळी कोळीवाडा परिसर. तेथील कोरोना नियंत्रणात येत नाही, तोच धारावीने डोकेवर काढले. धारावीतील कोरोनावर नियंत्रण आणणे प्रशासनासाठी आव्हान होते. अथक प्रयत्नानंतर धारावीतील कोरोना नियंत्रणात आला. मात्र, धारावीनंतर आता उत्तर मुंबईत आणि त्यातही दहिसर हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. दहिसरवरील कोरोनाचा तो शिक्का पुसून काढण्यासाठी तेथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरु केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आता हा लढा दमदार होत चालल्याचे चित्र आहे. 

आपापल्या परिसरातील कोरोना संशयितांची संख्या कमी व्हावी म्हणून संजय घाडी, रिद्धी खुरसंगे, शीतल म्हात्रे, जगदीश ओझा, आसावरी पाटील, तेजस्वी घोसाळकर आदी नगरसेवकांनी परिसराचे निर्जंतुकीकरण, आरोग्य शिबिरे, औषध वाटप, नागरिकांची तपासणी अशा वेगवेगळ्या प्रकारे हा लढा सुरु ठेवला आहे. दहिसरमध्ये नेमंक काय सुरु आहे, त्याचा हा आढावा.. 

निर्धास्त राहिल्याचा फटका
अगदी सुरुवातीला मुंबई शहरात कोरोनाचा फैलाव जास्त होता तर उत्तर मुंबईत प्रभाव कमी होता. त्यामुळे दहिसरचे नागरिक बेसावध राहून घराबाहेर पडू लागले. त्यामुळे जे आधीपासूनच वेगवेगळ्या रोगांनी त्रस्त होते, ते कोरोनाच्या कचाट्यात सापडले. कोरोना रुग्णांशी थेट संपर्क आलेल्यांनाही कोरोनाचा त्रास झाला. मात्र नंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिवर क्लिनिक चालवल्याने त्यात संशयित आढळून आले. महापालिकेच्या मोबाईल व्हॅनसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन तपासणी केली, औषधे वाटली. त्यामुळे रोगाला आळा बसला, असे शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सांगितल्या. 

दुसरे म्हणजे पूर्वी खासगी लॅबमधून रात्री अपरात्री पॉझिटिव्ह रुग्णाला कळवले जात होते. त्यामुळे मध्यरात्रीनंतर त्यांची रुग्णालय शोधण्यासाठी धावपळ होत असे व रुग्णालय मिळत नसे. आता पालिकेतर्फेच सकाळी पॉझिटीव्ह रुग्णांना चाचणीचा निकाल कळवला जातो व कोणत्या रुग्णालयात जायचे हे देखील सांगितले जाते. आता रुग्ण बरे होत असल्याने रुग्णांचा आत्मविश्वासही वाढला आहे. अजूनही दहिसरमध्ये बेकायदा फेरीवाल्यांचा प्रचंड त्रास आहे, असेही म्हात्रे म्हणाल्या. 

आरोग्य शिबिरे
नगरसेवक संजय घाडी आणि रिद्धी भास्कर खुरसंगे यांनी गेल्या आठवड्यात अनेक तपासणी शिबिरे आयोजित केली. यात संशयितांच्या विनामूल्य स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. ज्यांना आपल्या प्रकृतीबद्दल संशय वाटत असेल त्यांना या चाचण्यांमुळे मोठाच दिलासा मिळाला. त्याखेरीज घरोघर जाऊन तपासण्या, आर्सेनिक अल्बमच्या पंधरा हजार बाटल्यांचे वाटप, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दोन हजार पीपीई किटचे वाटप, झोपड्यांमधील स्वच्छतागृहांमध्ये दिवसातून चारवेळा जंतुनाशक फवारणी, दोनशे इमारतींना सॅनिटायझर स्टँडचा पुरवठा, पन्नास हजार किलो तांदुळाचे वाटप केले, असे प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी सांगितले. मागाठाणे विभागात घेतलेली आरोग्य तपासणी शिबिरे व कोरोना योद्धा असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन केलेली तपासणी यामुळे आता फैलाव कमी झाला आहे, असे नगरसेवक संजय घाडी म्हणाले. 

क्लब हाऊसमध्ये विलगीकरण केंद्र
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांवर तसेच डॉक्टरांवर ताण पडत असल्याने रुग्णांची आबाळ होते. त्यामुळे ज्या मोठ्या निवासी संकुलांमध्ये क्लब हाऊस, रेफ्यूज एरिया आहे तेथे त्याच संकुलातील रहिवाशांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्याचा माझा प्रयत्न आहे, असे नगरसेविका आसावरी पाटील म्हणाल्या. एकता मेडोज मध्ये असे केंद्र उभारले असून लवकरच संस्कृती इमारतीतही उभारले जाईल. माझ्या प्रभागातील अनेक ठिकाणी अशी केंद्रे उभारण्याचे माझे प्रयत्न सुरु आहेत. 

त्याचप्रमाणे सध्या रिकामे असलेल्या काही सामाजिक सभागृहातही अशी केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव मी महापालिकेला दिला आहे. आपल्या विभागातील आदिवासींना तसेच शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांनाही मी सर्व प्रकारची मदत केली, असेही पाटील यांनी सांगितले.  तर जगदीश ओझा यांनी गेले काही दिवस मोठ्या टँकरच्या साह्याने विभागात सर्वत्र जंतुनाशक फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य शिबिरे, गोळ्यावाटप, गरजूंना धान्यवाटप याद्वारे आपण या लढ्यात सहभागी आहोत, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com