धक्कादायक प्रकार ! विलगीकरण कक्षातच उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

शहरातील क्वारंटाईन केलेल्या 75 रुग्णांना सध्या गांधी विद्यालयातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले असून त्यात कोरोनाची लक्षणे असलेले आणि नसलेले अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांचा समावेश आहे.

अंबरनाथ : कोरोनाची चाचणी केल्यानंतर एका संशयित रुग्णाचा अहवाल प्राप्त होण्याआधीच त्याचा विलगीकरण कक्षातच उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ नगरपालिका कार्यालयापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयात शुक्रवारी (ता. 26) रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली.

मोठी बातमी - मुंबईत कोरोना संक्रमणाची बाधा आणि प्रसाराचीही होणार उकल, आणखी १० हजार व्यक्तींवर होणार 'हे' सर्वेक्षण..

शहरातील क्वारंटाईन केलेल्या 75 रुग्णांना सध्या गांधी विद्यालयातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले असून त्यात कोरोनाची लक्षणे असलेले आणि नसलेले अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांचा समावेश आहे. 75 पैकी 15 रूग्णांमध्ये लक्षणे दिसून येत असल्याने त्यांच्यासोबत असलेले इतर रुग्ण भयभीत झाले आहेत.अंबरनाथमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल ३९ जणांचे बळी गेले आहेत. त्यानंतरही येथे योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार येथील रुग्णांकडून होत आहे. अशीच तक्रार गांधी विद्यालयातील एका क्वारंटाईन रुग्णाने लेखी पत्राद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

हेही वाचा : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण..

बाधित रुग्णांची अन्यठिकाणी सोय करा
विलगीकरणातील रुग्णांसमोरच एका रुग्णाचा उपचाराअभावी रात्री मृत्यू झाल्यानंतर शाळेतील इतर रुग्णांनी छाया रुग्णालयातील डॉक्टरांना बोलावून आणले. संबंधित रुग्णाचा मृतदेह नेईपर्यंत मध्यरात्री अडीच वाजता बाकीचे रुग्ण शाळेबाहेर उभे होते. त्यामुळे बाधित रुग्णांची दुसऱ्या ठिकाणी सोय करावी आणि एका अधिकाऱ्याची केंद्रात नियुक्ती करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा : कोरोना मागोमाग लागूनच मुंबईवर येऊ शकतं 'हे' मोठं संकट; मुंबईकरांना वाचवणार आता एकच गोष्ट...

रात्री नऊच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन रुग्णांची पाहणी केली होती. ज्या रुग्णाचा मृत्यू झाला, त्याला रक्ताची उलटी झाली होती,  त्याचा कोरोना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित असून प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेऊन लक्षणे असणाऱ्या रुग्णांना इतर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणार आहे.
- जगतसिंग गिरासे, प्रशासक, अंबरनाथ नगरपरिषद

Patient dies due to lack of treatment in isolation ward


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patient dies due to lack of treatment in isolation ward