शिवचरित्रातून तरुणांमध्ये राष्ट्रबांधणी करणारा 'हिंदवी परिवार'

शिवचरित्रातून तरुणांमध्ये राष्ट्रबांधणी करणारा 'हिंदवी परिवार'

महाराष्ट्रात हा चळवळींसाठी ओळखला जातो. अशाच एका ऐतिहासिक चळवळींमध्ये कार्यरत राहून आपल्या कामातून एक वेगळा इतिहास निर्माण करणारे डॉ. शिवरत्न शेट्टे हे सर्वांनाच परिचयाचे आहेत. त्यांची "हिंदवी परिवार" नावाची एक संघटना आहे. त्या माध्यमातून किल्ल्यांवर, गडावर, काम सुरु आहे. ते स्वतः इतिहासाचे व्याख्याते आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यांनी देशभरातील कानाकोपऱ्यातील तरुणाईला जोडले आहे. हे काम सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांची चळवळ काम करते. कोणत्या स्वार्थामधून नाही तर एक विचार सुरु ठेवण्यासाठी ही चळवळ सुरु करण्यात आली आहे. अशा विविध कामांतून त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या चळवळीत हजारो तरुण त्यांच्याशी कसे जोडले गेलेत? त्यांची धोरणे काय आहेत? याबाबत संपादक संदीप काळे यांनी डॉ. शिवरत्न शेट्टे यांची  प्रश्नोत्तर स्वरूपात घेतलेली मुलाखत..

"हिंदवी परिवार" संघटना तुम्ही कधी सुरु केली? त्यामागे उद्देश काय होता?

अडीच दशकापासून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सुरु आहेत, हे विचार पुढे नेण्यासाठी गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यँत, अनेक शहरापासून खेड्यांपर्यंत व्याख्याने पोहचविण्याचे काम सुरु आहे. परंतु व्यख्यान झाल्यावर शिवऊर्जेने भारलेला तरुण नंतर २-४ दिवसानंतर डिस्चार्ज होतो. मग असं लक्षात आले की, आपली ही डिस्चार्ज झालेली तरुणाई पुन्हा नव्याने चार्ज होण्यासाठी कुठेतरी कनेक्ट राहायला पाहिजेत. माझे एक मित्र आहेत, डीसीपी सोमनाथ घारगे यांच्यामुळे खरं तर ही संकल्पना समोर आली. माझं एक व्यख्यान झालं इस्लामपूरला, त्या दरम्यान ते त्याठिकाणी उपस्थित होते. व्याख्यान झालं त्यावेळी त्यांनी सांगितलं की, तुम्ही व्याख्यान देता आणि निघून जाता. हा जो भारलेला तरुण आहे, तो तुमच्याशी कनेक्ट राहिला पाहिजे.  एक संघटना असावी, जेणेकरून आयुष्यभर ही तरुणाई तुमच्याशी, शिवरायांच्या विचारांशी संलग्न राहिली पाहिजेत. मला हा विचार पटला. गत अनेक दशकापासून प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये शिवऊर्जेचे आचरणकरिता अनेक अनुयायी आणि माझा शिष्य वर्ग होता. त्याला एका टायटलखाली आणायचं होते. त्यानंतर संघटनेचं नाव काय असावं? याचा पूर्ण विचार करून जुलै २०१० रोजी "हिंदवी परिवार" नावाची बच्चू भाऊ कडू, पोपटराव पवार, डीसीपी सोमनाथ घारगे, या अनेक मान्यवरांच्या समोर महारष्ट्रातील एकमेव संघटना पावनखिंडीत स्थापन करण्यात आली. आणि खऱ्या अर्थाने विस्कळीत झालेला शिवभक्त हा "हिंदवी परिवार" या नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशनखाली एकत्र आला. ज्याप्रमाणे पंढरीची वारी असते त्याप्रमाणे दरवर्षी आमच्या पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम जुलैला सुरुच असतात. छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या तावडीतून १२ जुलै १६६० रोजी सुटले. महाराज विशाळगडावर पोहचेपर्यंत दोन वीरांनी बलिदान दिले. एक म्हणजे वीर शिव काशीद आणि बाजप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दरवर्षी आम्ही ही ५२ किलोमीटरची पद भ्रमंती भर पावसामध्ये छत्रपतींच्या मार्गाने नेत असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे "हिंदवी परिवाराचे" एक ब्रीद आहे की, आपल्याला छत्रपतींच्या मार्गाने जायचंय, किल्ल्यावर जायचंय ते केवळ भौगोलिक पातळीवर नाही तर छत्रपतींच्या विचार आणि आचरणावर जायचे आहे. त्यामुळे व्यसनमुक्ती ही पहिली अट असते. जर तुम्हाला आमच्या परिवारात सहभागी व्हायचे असते. तर तुम्ही व्यसनमुक्त असले पाहिजे. काहींची वर्षानुवर्षे ही सवय सुटत नाही, मात्र आम्ही त्यांना सांगतो, मोहिमेच्या दरम्यान तुम्हाला ते पावित्र्य राखावेच लागेल. त्यात कुठली तडजोड केली जात नाही. हे मान्य नसेल तर मोहिमेत सहभागी होऊ नका, अशी सक्त सूचना त्यांना देण्यात येते. छत्रपतींच्या मार्गावरून आमच्या हिंदवी परिवाराने एक क्लिष्ट व्याख्या केली आहे. आमचं ब्रीद वाक्य आहे, "राष्ट्र प्रथम; वंदे मातरम"..! संघटनेचा आमचा लोगो आहे, त्यावरही एका बाजूला तिरंगा आणि दुसऱ्या बाजूला भगवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नक्कीच हे राष्ट्रीय स्वराज्य होते. त्यामुळे आज राष्ट्र उभारणीची जी गरज आहे. २४ तास मला छत्रपती शिवाजी महाराज बघत आहे, ही जाण असलेला शिवभक्त निर्माण करण्याचं काम हिंदवी परिवाराने केले. ही भावना प्रत्येकाची असेल तर तो कोणत्याही वाईट मार्गाला जाणार नाही. तो सकारात्मक असेल. आम्ही राष्ट्र बांधणीची व्याख्या छोट्या छोट्या स्वरूपात केली आहे. तुमच्या गावातील एखादा शेतकरी आहे, त्याच जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करा, कुणाला वृक्षरोपणाची आवड असेल तर वृक्ष संवर्धन करा, जनजागृती करा. वैद्यकीय क्षेत्रात आवड असणाऱ्यांनी वैद्यकीय कॅम्पमध्ये जाऊन मदत करा, या छोट्या छोट्या कामातून राष्ट्र बांधणीचे काम सुरु असते. फक्त या मोहिमेत प्रत्येक तरुण जोडला जावा, यासाठी ट्रेकिंग आणि किल्ले भ्रंमतीची जोड दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जाणून घ्यायला किल्ले का चढावे?

जगाच्या इतिहासात नेपोलियन बोनापार्ट, अलेक्सझांडर द ग्रेट या लोकांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्याचा केविलवाणा प्रयत्न काही इतिहासकारांनी केला. मात्र ते कधीच शक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची खूप मोठी आहे. महाराष्ट्रात कदाचित सह्याद्री आणि किल्ले नसते, तर हिंदवी स्वराज्य उभं राहिले नसते. किंबहुना महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वतः इथे दाखल झाला, आणि २७ वर्षे हा महाराष्ट्र त्याच्याशी झुंजला. जगाच्या इतिहासात नेतृत्वाशिवाय लढलेली प्रदीर्घकाळ चालणारी ही लढाई आहे. औरंगजेबाच्या ५ लाख सैन्यापुढे तुमचे आमचे बापजादे लढले, आणि खऱ्या अर्थाने १६८० ते १७६० या काळात औरंगजेबाला झुंजवले. शेवटी या मातीत औरंगजेबाला गाडले, हा आमचा इतिहास आहे, आणि तो निर्माण झाला तो केवळ किल्ल्यांमुळे..! त्यावेळी औरंगजेबाच्या लक्षात आले एक किल्ला रामशेज घेण्यासाठी ५ वर्षे लागली, महाराजांचे ३६० किल्ले महाराष्ट्रात आहेत तर  मोघलांच्या किती पिढ्या इथे बरबाद होतील? याची जाण औरंगजेबाला त्यादिवशी झाली. आणि किल्ले का चढावे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ला हे अविभाज्य आहेत. त्यामुळे किल्ल्यावर आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने समजतात. मी एकच उदाहरण देईल, राजगडावर ज्यावेळी मोहीम होती, त्यावेळी आमदार बच्चू कडू मध्यरात्री हा किल्ला चढले होते. परंतु ज्या-ज्या ठिकाणी इतिहास घडला, जेव्हा आग्रावरून महाराजांची सुटका झाली, त्यावेळी महाराज १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडावर आले, बैरागी गोसाव्यांच्या पेहरावामध्ये आणि त्या पाली दरवाज्यांमध्ये त्यांना अडविण्यात आले, त्याठिकाणी उभा राहून मी हा प्रसंग कडू यांना सांगितला. छत्रपती महाराजांच्या पदस्पर्श झालेला जो काही युद्ध आणि रणभूमीचा भाग आहे, त्याचा साक्षीदार हे किल्ले आहेत. मला वाटते, ज्या-ज्या ठिकाणी इतिहासातील हे प्रसंग घडले त्या-त्या ठिकाणी तरुणांना सांगाव्यात. तरुणांनी त्या ठिकाणी असणारी अनुभूती आत्मसात करावी. त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या अंगी रुजावे. ट्रेकिंग किंवा पद  भ्रमंती हे आम्ही माध्यम म्हणून पाहतो, यातून माणूस घडवतो राष्ट्र बांधणीसाठी..! प्रत्येक माणूस, शिवभक्त व्यसनमुक्त असणारा बनवला तर आमच्यासाठी ते सर्वांत महत्त्वाचे ठरेल. या किल्ले भ्रमंतीला आमचे मार्गदर्शक दुर्गभ्रमंतीकार श्रीकांत कासट, कार्याध्यक्ष अमोल मोहिते, हिंदवी परिवाराचे डॉ. संभाजी भोसले, रामदास पाटील आणि सिद्धेश्वर टेंगळे अशा असंख्य सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मोहिमांचे आयोजन करत असतो. किल्ले हा अविभाज्य अंग आहे. किल्ले तुम्हाला प्रतिकूलता शिकवतं, सह्याद्रीच्या अंग खांद्यावर आम्ही नाही खेळायचं तर कुणी खेळायचं? पुढच्या पिढीतून शिवबा घडवायचे असतील तर आज आपण आपल्या मुलांना किल्ल्यांवर आणले पाहिजे. पुढच्या पिढीतून राजमाता, ताराराणी घडवायचे असतील तर आपणच पुढाकार घ्यायला हवा. हे कधी कुठल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात नाही, तर हे सर्व शिकण्यासाठी किल्ल्यावरच यावं लागते. खरं-खुरे चरित्र आणि इतिहास हा सह्याद्रीत आणि किल्ल्यांमध्ये लपलेला आहे, म्हणूनच किल्ले भ्रमंती हा आमचा मुख्य कणा आहे.

या मोहिमेची सुरुवात कधीपासून झाली? तेव्हापासून आतापर्यंत कितीजण जोडले गेले आहेत?

१६ वर्षांपासून आम्ही पद भ्रमंती करतोय. व्याख्यानाची तर २५ वर्षे झाली. मात्र संघटनात्मक रचना जी आम्ही हिंदवी परिवाराच्या माध्यमातून केली, ती जुलै २०१० ला केली. त्यावेळी ६९० शिवभक्त आमच्यासोबत होते. आज ज्या किल्ल्यावर भ्रमंती करणार आहोत, तेथील प्रतिकूलता अनुकूलता लक्षात घेऊन ही संख्या आम्ही लिमिटेड ठरवतो. ही संख्या प्रत्येक वर्षी वेगवेगळी असते. काही ठिकाणी सोयीसुविधा असतात त्याठिकाणी अनलिमिटेड संख्या असते. ही आकडेवारी लवचिक असते. मात्र आज हजारो शिवभक्त गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यँत अगदी गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब  असे बाहेरून देखील अनेक शिवभक्त आमच्या मोहिमेत सहभागी होतात. मला असं वाटते, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र किंवा मराठी माणसाचा विषय न राहता, भाषा, प्रांत, जात-पंथाच्या पलीकडे जाऊन एक विचार आहे, आणि हा एक सकारात्मक विचार सर्वदूर पोचविण्याचे काम आम्ही करत आहोत.  

छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांना घेऊन लढले, तुमच्या संघटनेतून हा मेसेज कसा जातो?

आज दुर्दैवाने शिवाजी महाराज काहींना समझले नाहीत.शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्म विरोधात नव्हते. त्यांची लढाई ही गुलामगिरीच्या विरोधात होती. जे जुलूम करतात त्यांच्याविरोधात होती. त्यामुळे केवळ मुसलमानांना  मारले असे नाही. शिवाजी महाराजांचा लढा हा जुलूम करणाऱ्यांविरोधात होता. एवढी सरळ साधी त्याची व्याख्या आहे. आमच्या संघटनेत व्यसनमुक्ती ही पहिली अट असते. त्यामध्ये धर्म, जात-पंथ हा कुठलाही मुद्दा नसतो. सर्व धर्मीय आणि जातीपंथाचे लोक आमच्यासोबत सहभागी आहेत. मी निश्चितपणे एका शिष्याचे नाव घेईल, डॉ. निसार शेख हे आज जागतिक ख्यातीचे योगतज्ञ आहेत. ते देखील त्याच आपुलकीने भगवा खांद्यावर घेतात. हा त्यागाचा, हिंदू धर्माचा भगवा, व्यापक अर्थ आहे या भगव्याचा. त्यामुळे कुणीही संकुचित दृष्टीने करत नाही. आजही या मोहिमेत अनेक मुस्लिम बांधव आहेत. या मोहिमेमध्ये निश्चितपणे सुशिक्षित जोडणारी लोकं शिवाजी महाराजांना ज्यावेळी समजून घेतील, त्यावेळी खऱ्या अर्थाने जात-धर्मपंथ हे महत्त्वाचे ठरत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणे काळाची गरज आहे.

तुम्हाला हे सर्व सुरु करणे गरजेचे का वाटले?

खरं म्हणजे आम्ही किल्ल्यांमधून आनंद मिळवत होतो.  दुर्गभ्रमंतीकार श्रीकांत कासट आहेत, त्यांच्यासोबत अनेकवेळा किल्लेभ्रमंती झाली आहे. रायगडाच्या देखील अनेक मोहीमा केल्या. हा आत्मिक आनंद मिळाला, तो इतरांना मिळाला पाहिजे. केवळ मला आनंद मिळाला, किंवा इतर ५० लोकांना मिळाला, संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मिळाला, कुटुंबाला मिळाला, मात्र जे कधी या मार्गावर आलेच नाहीत, त्यांना कुणीतरी याठिकाणी हा आनंद अनुभवायला आणलं पाहिजे. आपण स्वतःला गाडून घेतलं तर लोक निर्माण होतात. एखाद्या मोहिमेचे व्यवस्थापन करणे सोपे काम नाही. हे नियोजन करताना आमचे शिवभक्त आणि पदाधिकारी आपला नोकरी-व्यवसाय बाजूला ठेवून  ते तीन-तीन महिने तयारी करतात. आता पुढच्या वर्षी तामिळनाडूमध्ये आमची मोहीम आहे. राहण्याच्या व्यवस्थेपासून, वनखात्याच्या परवानग्या पाहणे गरजेचे असते.

१६ वर्षांच्या मोहिमेतील वेगळे अनुभव काय आहेत?

प्रत्येक मोहीम हा वेगळा अनुभव देऊन जाते. आमची पन्हाळगड ते पावनखिंड ही पावसाळ्यातील पायी मोहीम दरवर्षी जुलैमध्ये राबवतो. साधारणत: दुसऱ्या आठवड्यात १२ जुलै १६६० ला सुटले आम्ही ती तारीख घेत नाही, मात्र त्यावेळी असलेल्या अनुकूल वातावरणानुसार आम्ही मोहीम सुरु करतो. त्यामुळे जुलैमधील दुसरा शुक्रवार, शनिवार, रविवार हे आम्ही निश्चित ठेवलेले आहेत. अनेकजण बोलतात, धो-धो पावसात नको, जानेवारीमध्ये मोहीम ठेवा. मात्र महाराज याठिकाणाहून लढत गेले होते, आपल्याला केवळ चालत जायचे आहे. त्यामुळे तो अनुभव येणे गरजेचे आहे, म्हणून ही मोहीम पावसाळ्यातच असते. हिवाळी मोहीम म्हणून रायगड प्रदक्षिणा सुरु केली. संपूर्ण रायगडाला प्रदक्षिणा मारल्यावर काय अनुभूती येते, जे सभासदबकरी मध्ये दिली आहे. महाराजांनी राजधानीचे एवढे किल्ले असताना रायगडाची निवड का केली? तर सभासदबकरीच्या भाषेत सांगायचे तर "राजा खासा जाऊन पाहता, गड बहुत चकोट, दिडगाव उंच, पर्जन्यकाळात कड्यावर गवत उगवत नाहीत, धोंडा तासीव एकच, ऐसे देखून बहुत संतुष्ट जाहले आणि बोलले तक्टा जागा हाच गड करावा.." म्हणजे दिडगाव उंच म्हणजे अत्यंत उंच असा, धोंडा तासीव एकच म्हणजे जणू परमेश्वराने तासलेले धोंडा आहे, तो पर्वत.. धो-धो पाऊस असेल तरी कड्यावर गवत उगवत नाही, त्यामुळे महाराजांनी या गडाची निवड केली. आम्ही एक एक थीम घेतली आहे. त्यानुसार हिवाळी मोहीम सुरु केली. दरवर्षी आपण नवीन किल्ल्याना जात असतो. यामध्ये अनेक मोठ्या पदावरच्या लोकांचा देखील समावेश असतो. मराठ्यांचा इतिहास जेवढा मोठा आहे, तो सर्वदूर पोहचविण्याचा आमचा मानस आहे.

या मोहिमेत सहभागी होणारे तरुण पुढे कशापद्धतीने काम करतात?

काही जणांना त्यांच्या आयुष्यात किल्ल्यांचा स्पर्श झालेला नसतो. काहींना केवळ सहलीच्या काळात अनुभवायला मिळतो. जेव्हा परिपक्व असे वय नसते. किल्ल्यांचा स्पर्श हा परिपक्व वयात झाला पाहिजे. आम्ही किल्ले भ्रमंती करतो म्हणजे दमछाक होईल असं करत नाही. तर किल्ल्याचा इतिहास स्लाईडशोच्या माध्यमातून दाखवत असतो. किल्ल्यांची जी भ्रमंती आहे, ती दुर्गभ्रमंतीकार श्रीकांत कासट स्लाईडशोच्या माध्यमातून दाखवत असतात. माझी व्याखाने ही ज्या ठिकाणी इतिहास घडलेला आहे, त्याठिकाणचा ज्वलंत इतिहास आम्ही रात्री व्याख्यानाच्या माध्यमातून देत असतो. दरवर्षी आम्ही एक वक्ता बोलवत असतो. तो त्याच्या शैलीत व्याख्यान देत असतो. २०१९ च्या हिवाळी मोहिमेत विश्रामगडची मोहीम करणार आहोत. या मोहिमेत कधीच कोणते किल्ले रिपीट होत नाहीत. कुठल्याही मोहिमेत सहभागी होणारे शिवभक्त हा मोहिमेतून प्रेरणा घेऊन जातो. तुमच्याकडे जे कौशल्य आहे, त्याचा राष्ट्रबांधणीसाठी वापर करा, असा आमचा हेतू असतो.

"हिंदवी परिवार"चे सदस्य होऊन या मोहिमेत सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल?

आमची एक वेबसाईट आहे, www.hindaviparivar.org या वेबसाईटला जाऊन त्यावर विविध मोहिमांचे कार्य देण्यात आले आहे. हे कार्य करत असताना आपली आर्थिक परिस्थिती पाहणे देखील गरजेचे आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणारा शिवभक्त मी कधीही निर्माण करणार नाही. तो स्वयंपूर्ण असला पाहिजे, स्वतः च्या पायावर उभा राहिला पाहिजे. उरलेल्या वेळेत त्याने हे कार्य करावे. या आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन खूप सुशिक्षित लोक आमच्यासोबत जोडले गेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणत पावसाने हानी झाली. अनेकजण वाहून गेले, कुटुंबाचे नुकसान झाले हे दृश्य पाहिल्यावर ठिकठिकाणाहून फोन आले. "या भारतमातेचे रक्षण करण्यासाठी सांगली, सातारा मधून मोठ्या प्रमाणात भूमिपुत्र येतात. आज ते सीमेवर लढत आहेत, त्यांचं कुटुंब इथे आहे, त्यांच्या रक्षणासाठी आपण पावले उचलली पाहिजेत." त्यानुसार आम्ही शिबीर घेतली, डॉक्टरांना आवाहन केले. त्यावेळी २६ कॅम्प आम्ही त्याठीकाणी राबवले. ज्या भागात वैद्यकीय सेवा पोहचू शकत नाही अशा ठिकाणी आम्ही काम करत होतो. आमचे शिवभक्त झोपड्यांमध्ये जाऊन म्हाताऱ्या माणसांना उचलून आणून उपचार करत होते. यामागे एकच प्रेरणा होती, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघत आहेत. एक जाण असलेला शिवभक्त आम्ही निर्माण केला. त्यामुळे इथे काम करताना कुठली फॉर्मलीटी नाही, चमकोगिरी नाही केली. हृदयापासून काम करणारा शिवभक्त येथे होता. पुण्यातून देखील अनेक मंडळी याठिकाणी आली होते. जनावरांच्या गोठ्यातील असंख्य जनावरे मृत तर जखमी झालेली होती. ज्यावेळी आमचे हिंदवी परिवाराचे सदस्य या गोठ्यांमध्ये गेले त्यावेळी मुके जनावरे एका आशेने त्यांच्याकडे पाहत होती. हे हृदयाला जोडून ठेवणारे काम होते. आमच्या सदस्यांनी गोठ्यात जाऊन मदत केली. त्यामुळे वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी राष्ट्रबांधणी करणे हे हिंदवी परिवाराचे सूत्र आहे.

आजच्या तरुणांना काय आवाहन कराल?

आजची वस्तुस्थिती आहे की, इतिहासाची आवड असणाऱ्यांना पुस्तक वाचण्याची आवड नाही. त्यामुळे आम्ही किल्ले भ्रमंतीमध्ये प्रबोधनाची सवय लागावी यासाठी वेगवेगळे वक्ते बोलविण्याचे काम करतो. त्यानंतर प्रश्नावली होते. त्यातून तरुणांमधील कौशल्ये समोर येतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची कुठली पुस्तके वाचायची? इतिहास काय? याबाबत प्रश्न विचारतात. हळूहळू ही तरुणाई वाचनसंस्कृतीकडे वळायला लागली आहे. पुढच्यावर्षी येताना खूप प्रगती त्यांच्यात झाली असते. गेल्यावर्षी आलेला शिवभक्त हा परिपक्व होऊन आलेला असतो. दरवर्षीच तो अपडेट होतो. आपल्या विभागात प्रबोधन करतो. यातून असंख्य वक्ते निर्माण होतात. त्यातून शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार होतो. किल्लेभ्रमंती हे शिवभक्त एकत्र येण्याचे माध्यम आहेत. त्यामुळे असंख्य शिवभक्त येथे येतात. आजच्या तरुणांनी नक्की यामध्ये सहभागी व्हावे.

special article by sandip kale on hindavi pariwar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com