दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्येच वेळापत्रकाला मान्यतेची प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्येच वेळापत्रकाला मान्यतेची प्रतिक्षा

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च -२०२२ याच कालावधीत ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. यासाठी मंडळाकडून तयार करण्यात आलेले या परीक्षेचे नियोजित वेळापत्रक मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आले असून ही मान्यता मिळण्यासाठी मंडळाला प्रतिक्षा लागली आहे.

राज्यात कोरेानाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे दहावी-बारावीची २०२२ मध्ये घेण्यात येणारी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार असून त्यासाठीची नियोजन आणि कार्यपद्धतीसाठीचे वेळापत्रक मंडळाकडून मागील आठवड्यात शालेय शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले आहे. त्यासाठीची मान्यता मिळाल्यास तातडीने ते जाहीर केले जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. शासनाकडून मान्यता मिळाल्याबरोबर लवकररात लवकर हे वेळापत्रक आणि त्याच्या नियोजनाचा कार्यक्रम आम्ही जाहीर करणार असल्याचेही गोसावी यांनी सांगितले.

हेही वाचा: सध्या ‘काय ते दे द्या’चे राज्य ; भ्रष्टाचारावरून फडणवीस यांची टीका

मागील काही वर्षांमध्ये मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा आणि त्याच्या पॅटर्नमध्ये यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र कोरोनामुळे शाळा-कनिष्ठ महाविद्यालये ही प्रत्यक्षात उशिराने सुरू झाल्याने या परीक्षेच्या तारखांमध्ये सुमारे आठवड्याभराचा फरक असणार आहे. तर दुसरीकडे अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने परीक्षा घेताना त्याचे नियम पाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र वाढण्याची शक्यता असून त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव मंडळाने तयार केला असल्याची माहितीही देण्यात आली.

हेही वाचा: ...म्हणून मुंबईतील शाळा सुरू ठेवण्याचा संस्थाचालकांचा निर्धार

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च-२०२१ मधील सर्व लेखी परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे गुण देऊन उत्तीर्ण केले होते. यामुळे अनेक गुणवत्तेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. यावेळी परीक्षा या ऑफलाईन होणार असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेसाठी चांगली तयारी करावी लागणार आहे.

दरम्यान, आजपासून दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला दिवसभरात विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असल्याची माहितीही देण्यात आली.

loading image
go to top