
डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेला सुरुवात
ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचे दर्शन
कासा, ता. १२ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेला शनिवारी (ता. १२) चैत्र पौर्णिमेपासून विधीवत सुरुवात होत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अफाट आहे. आदिवासी समाजाची कुलदेवता मानल्या जाणाऱ्या महालक्ष्मी देवीची ही यात्रा पंधरा दिवस चालते. डहाणूपासून १८ किलोमीटर अंतरावर, वधना गावाजवळ असलेल्या महालक्ष्मी मंदिराचा इतिहास अनेक पौराणिक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांनी नटलेला आहे. मंदिर ९०० फूट उंच डोंगरावर वसले असून येथे पोहोचण्यासाठी ९०० पायऱ्या चढाव्या लागतात. यामुळेच डोंगराच्या पायथ्याशी भाविकांसाठी वेगळे मंदिर उभारले आहे.
यात्रेची सुरुवात चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री होते. सातवी कुटुंबातील पुजारी मोरेश्वर सातवी यांच्या मार्गदर्शनाखाली एकटाच पुजारी देवीच्या ध्वजासह डोंगर चढून जातो. डोंगरावरील ठिकाणी तुपाचा दिवा प्रज्वलित करून ध्वज फडकविल्यानंतर यात्रेचा प्रारंभ होतो. या यात्रेला ऐतिहासिक महत्त्वही आहे. इसवी सन १००० मध्ये सुलतान महमदाने आणि नंतर गजनीच्या महमदानेही या मंदिरावर हल्ला करून लूट केली होती. बखरकार फेरिस्तो यांच्या नोंदीनुसार, मंदिरातून सात लक्ष सुवर्ण दिनार, हजारो मण सोन्याच्या वस्तू लुटल्या गेल्या होत्या. अकबर बादशहादेखील राजा तोरडमल यांच्यासोबत या मंदिरात दर्शनासाठी आला होता. पंजाबचे शासक रणजितसिंह यांनी मंदिरावर सोन्याचा कळस बसवला होता.
कोल्हापूरच्या महालक्ष्मीने गुजरातच्या दिशेने जात असताना या परिसरात विश्रांती घेतली आणि तिथूनच येथे वास्तव्य केले, अशी पौराणिक आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, या मंदिरात आदिवासी पुजारी सोवळं नेसून पूजा करीत नाहीत, ही परंपरा आजही जपली जाते.
भक्तांची रेलचेल
पुजारी मोरेश्वर सातवी यांनी सांगितले, की आम्ही वडिलोपार्जित महालक्ष्मी देवीचे पुजारी आहोत. यात्रेपूर्वी दोन महिन्यांपासून उपवास, जप सुरू असतो. रात्री बारा वाजता ध्वज घेऊन निघतो. डोंगर चढून तीन तासांत वर पोहोचतो आणि पहाटेपर्यंत पूजा आटोपून खाली परततो. त्या दिवशी अंगात वेगळीच शक्ती संचारते. या यात्रेदरम्यान परिसरात धार्मिक वातावरण, भक्तांची रेलचेल आणि परंपरेचे सजीव दर्शन घडत असते. महालक्ष्मी यात्रेचा उत्सव म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.