
वाशी, ता. ८ (बातमीदार) : आशिया खंडातील सर्वांत मोठा औद्योगिक पट्टा म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. या औद्योगिक पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या होत्या; मात्र या कंपन्यांमुळे शहरात होणारे प्रदूषण, आर्थिक मंदीची लाट, युनियनचा फटका बसल्याने मागील २५ वर्षांमध्ये इतर राज्यांमध्ये या कंपन्या स्थलांतरित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता नवी मुंबईतील रासायनिक कंपन्यांची जागा तंत्रज्ञानाशी निगडित असणाऱ्या कंपन्यानी घेतली आहे. नवी मुंबईत आयटी, रिलायन्स, माईन्ड्स स्पेस, आयकीआय, डेटा सेंटर या अत्याधुनिक कंपनीने आपली मुहूर्तमेढ रोवली आहे. नवी मुंबईतील जवळपास ३९ नवीन भूखंड एमआयडीसीकडून कंपन्यांसाठी वाटप करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १९६० च्या दशकामध्ये नवी मुंबईतील शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या. त्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्यांना एमआयडीसीने भूखंड वाटप केले. मोफतलालची नोसील ही एमआयडीसीमधील सर्वांत मोठी केमिकल कंपनी होती. त्याचबरोबर पोयशा, तुर्भे सिंग, कृष्णासिल, कलर केम, रिलायन्स सिलिकॉन, स्ट्रॅण्डेड अल्कोली, आयसीआय, सँडोज या कंपन्या होत्या; मात्र मागील २५ वर्षांमध्ये मंदीच्या लाटेमध्ये शेकडो कंपन्या अन्य राज्यात स्थलांतरित झाल्या; तर काही कंपन्या या कायमच्या बंद झाल्या. १९९९ ते २००१ च्या दरम्यान आलेल्या मंदीच्या लाटेमध्ये या कंपन्यांना तग धरता न आल्याने त्यांनी आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये युनियन असल्यामुळे कंपनीवर येणाऱ्या दबावामुळे काही रासायनिक कंपन्या बंद पडल्या. कलांतराने नवी मुंबईत लोकवस्ती वाढल्यानंतर येथे नवीन रासायनिक कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून परवानगी देण्यात येत नव्हती. त्यामुळे रेड झोनमध्ये असणाऱ्या कंपनीला परवानगी देण्यात येत नसल्याने येथे रासायनिक कंपन्या कमी झाल्या.
--------------
औद्योगिक पट्ट्याला कॉर्पोरेट लूक
रासायनिक कंपन्यांच्या ठिकाणी आता माहिती तंत्रज्ञानाशी निगडित असणाऱ्या कंपन्या येत आहेत. नवी मुंबईमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असल्याने जागतिक दर्जाच्या कंपन्या या नवी मुंबईत आपली मुहूर्तमेढ रोवत आहेत. महापे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची आयकिया कंपनी सुरू झाली असून, विमानतळामुळे जेट एअरवेज कंपनीनेदेखील प्रशिक्षण केंद्रासाठी महापे येथे भूखंड घेतला आहे. व्होडाफोन शेअर सर्व्हिसेस, माइंड स्पेस डाटा सेंटर कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक पट्ट्याला कॉर्पोरेट लूक आला आहे. महापे येथील मिलेनियम पार्क, ऐरोली नॉलेज पार्क, सीबीडीतील आयटीसी पार्क, माइंड स्पेस या ठिकाणी कॅपजीमिनी, माइंड स्पेस, रिलायंबल अशा माहिती तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या स्थिरावल्या आहेत.
----------------
जगाच्या पाठीवर ओळख
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या स्थिरावत असल्याने नवी मुंबईचे नाव हे जगाच्या पाठीवर कोरले जात आहे. येथे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या शहराची वाटचाल आता अत्याधुनिक शहराकडे होत असून, रासायनिक झोन म्हणून ओळखणाऱ्या या शहराची आता आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असल्याने आयटी क्षेत्र म्हणून ओळख होऊ लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.