
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्यांकडे नोकरी मागण्याऐवजी नोकरी देणारे उद्योजक व्हा, असा विचार समाजमनात पेरला. त्या विचारांनी प्रभावित झालेले अनेक लोक उच्चशिक्षण घेऊन स्वत:च्या कंपन्या चालवत आहेत. प्रतिष्ठित उद्योजक झाले आहेत. अशाच काही उद्योजकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त बाबासाहेबांच्या उद्योगप्रेरणेबद्दल व्यक्त केलेली ही मनोगतं....
मी मातंग समाजातील. आमच्याकडे फारसे कुणी ऐटीत किंवा सुटाबुटात दिसत नसत. बाबासाहेबांचा सुटाबुटातील फोटो बघून मला नेहमी अप्रूप वाचायचे. आपल्यातील एक व्यक्ती त्या काळात जर इतकी स्टाईलिश राहत असेल, तर आपल्यालाही राहायला काय हरकत आहे, असा विचार मला अगदी लहानपणी असतानाच आला आणि तिथूनच माझी बाबासाहेबांशी नाळ जुळली. त्यांच्या प्रेरणेने 25 वर्षांपूर्वी कंपनी सुरू केली. आज कंपनीची वार्षिक उलाढाल 7 कोटींच्या वर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात कठीण परिस्थितीचा सामना करून आपला मार्ग सुकर केला आहे. मागासवर्गीयांसाठीच्या अनेक सवलती आज उपलब्ध आहेत. आरक्षणातूनच माझ्या आईला सरकारी नोकरी मिळाली होती. हेही बाबासाहेबांचेच उपकार आहेत. बाबासाहेबांचे चरित्र वाचल्यानंतर मी नोकरी न करता उद्योजक व्हायचे ठरवले. डिक्कीच्या सहकार्यातून उद्योगात उतरलो; पण आज मला अभिमान आहे की बाबासाहेबांच्या उपदेशाप्रमाणे आम्ही रोजगार देणारे ठरलो आहोत.
- मिलिंद वायदंडे (संचालक, मेटाक्राफ्ट इंडस्ट्रीज ऑटोमोबाईल कंपनी)
बाबासाहेबांचा आर्थिक स्वावलंबनाचा विचार मला अधिक भावला. जसजसे वाचत गेलो, तसतसे बाबासाहेब अधिक उलगडत गेले. बाबासाहेबांचा आर्थिक विचार मला अधिक महत्त्वाचा वाटतो. आर्थिक प्रगतीशिवाय स्वत:ची, कुटुंबाची आणि समाजाची प्रगती अशक्य आहे, यासाठी उद्योग-धंद्याशिवाय प्रगती नाही, हे मला जाणवले. म्हणून "नोकरी देणारे बना' हे बाबासाहेबांचे वाक्य मी माझ्या मनावर कोरले. त्यातूनच उद्योगात उतरण्याचा निश्चय केला. त्यातूनच 2002 मध्ये मी अभिजित सर्फिंग कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली. बाबासाहेबांच्या नावाने जल्लोष झालाच पाहिजे; मात्र केवळ मिरवणुका, नाच-गाणी, खर्चिक कार्यक्रम नकोत, तर शिक्षण आणि आर्थिक प्रगती महत्त्वाची असून त्यातूनच आपली स्वत:ची, आपल्या कुटुंबाची आणि समाजाची प्रगती होईल.
- गोकुळ गायकवाड (संस्थापक, अभिजित सर्फिंग कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा विचार माझ्या मनात खोलवर रुजला होता. त्यांच्याप्रमाणे आपणही उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे, असे मला सारखे वाटायचे. त्यांच्यातून हीच प्रेरणा घेऊन मी आयायटी मुंबई येथून उच्चशिक्षण घेऊ शकलो. आज माझ्या स्वत:च्या को-अहम टेक्नॉलॉजिस एलएलपी, आरएफआयडी टॅग्स अँड सर्व्हिस यांसह तीन कंपन्या आहेत. 1 कोटींच्या वर वार्षिक उलाढाल आहे. 70 च्या वर व्यक्तींना रोजगार दिला आहे. मी शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करत होतो; मात्र नोकरी करत असतानाच बाबासाहेबांचा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा, उद्योगात उतरा, हा विचार माझ्या डोक्यातून काही जात नव्हता. त्यामुळे उद्योगात उतरण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडली आणि उद्योगात उतरलो. नवीन काही तरी करायचे होते. बाबासाहेब सांगतात त्याप्रमाणे आपण कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. आपण चांगलं काम करू शकतो. केवळ स्वत:चे मार्गदर्शक स्वत: बनून काम सुरू करणे गरजेचे आहे.
- केतन कोलगे (संस्थापक, को-अहम टेक्नॉलॉजिस एलएलपी, आरएफआयडी टॅग्स अँड सर्व्हिस कंपनी)
माझे आजोबा हे शेतमजूर होते. त्या वेळी शेतात काम करत असताना सवर्ण मालकाच्या मुलाने त्यांना शिवीगाळ केली होती. याची सल माझ्या आजोबांसह वडिलांनादेखील होती. बाबासाहेबांच्या संदेशाप्रमाणे आजोबांनी कुटुंबासह गांव सोडून शहराची कास धरली. नोकरी केली. मुलांना शिक्षण दिले आणि सर्वांवर बाबासाहेबांच्या विचारांचे संस्कार केले. माझ्या वडील उच्चशिक्षण घेऊन ते बीएसएनएलमधून व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले. बाबासाहेबांचा विचार सतत सोबत घेऊन काम केले. त्यातूनच आज आम्ही घडलो. मी आज जो काही घडलोय तो केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळेच, त्यांच्या प्ररणेतूनच आम्ही आज उद्योजक झालो आहोत. आज माझी निर्मला ऑटो केअर सेंटर ही कंपनी आहे. या कंपनीचे पेट्रोल पंप आहेत, जेएनपीटीतील सेंट्रलाईज पार्किंग प्लाझाचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प हा माझाच असल्याचे सांगताना अभिमान वाटतो. या प्रकल्पाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घेतली आहे. याशिवाय डिफेन्सला बॉम्ब शेल तसेच विस्फोटक मटेरियल पुरवण्याचे कामदेखील माझी कंपनी करते. आज वार्षिक उलाढाल 50 कोटींच्या वर असून 200 पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. आज बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे काम करून समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असल्याचा आनंद आहे.
- राजू साळवे (संस्थापक, निर्मला ऑटो केअर सेंटर)
महिला सबलीकरणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. समाजाच्या प्रगतीचा मापदंड ठरवायचा असेल, तर तो समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजता येईल, असे बाबासाहेब सांगत. बाबासाहेबांच्या या विचाराचा जबरदस्त पगडा माझ्यावर आहे. त्यातूनच उद्योगात उतरायचा निर्णय मी घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने मी 2007 मध्ये संगीता महिला औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. महिलांच्या प्रगतीसाठी बाबासाहेबांनी केलेला संघर्ष क्वचितच कुणी केला असेल. त्याची जाणीव ठेवून महिलांसाठी मंच उभा करून देण्याचे काम या माध्यमातून मी सुरू केले. गाड्यांचे स्पेअर पार्टस् बनवण्याची कंपनी आम्ही सुरू केली. महिलांच्या हाताला काम मिळावे, यासाठी याच कंपनीत आम्ही गार्मेंट्सचा व्यवसायही सुरू केला. 15 मशीन घेतल्या आणि त्यातून आज साधारणतः 30 महिलांना रोजगार दिला. माझ्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही 50 ते 60 लाखांच्या वर असून अधिकाधिक महिलांना स्वावलंबी बनवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली वाहण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
- संगीता कांबळे (उद्योजिका, महिला औद्योगिक सहकारी संस्था, कोल्हापूर)
मी आज जो कोणी आहे तो केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच. बाबासाहेब म्हणायचे की, ""घरातील प्रत्येकाने उच्चशिक्षण घ्यायला हवे. कुटुंबातील एकाने शेती करा, दुसऱ्याने नोकरी करा, तर एखाद्याने व्यापार करावा.'' त्याप्रमाणेच माझ्या कुटुंबात एक भाऊ शेती करतो, दुसरा सरकारी नोकरी; तर मी उद्योगात उतरलो. मी 2004 साली नागपार्वती फार्मसी नावाने कंपनीची स्थापना केली. आज माझी कंपनी टॉप 5 मध्ये गणली जाते. बाबासाहेब म्हणायचे की, समाज घडवा, त्याप्रमाणे मी स्वत: समाजातील 15 ते 20 लोकांना उद्योगात आणले. आणखी समाजातील लोकांना उभे करायचे आहे. आपले अनेक लोक व्यवसाय करायला घाबरतात; पण आपण नोकरी आणि आरक्षणावर किती दिवस काढणार? आपली क्षमता आपण सिद्ध करायला हवी. त्यासाठी आपण उद्योग-व्यापार करणे गरजेचे आहे.
- सिद्धाराम चाबुकस्वार (संस्थापक, नागपार्वती फार्मसी)
-------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.