नांदेड : लोकमान्य टिळक निर्माल्य स्वच्छता अभियानात कृतीयुक्त सहभाग नोंदवा- मिलिंद देशमुख

प्रल्हाद कांबळे
Sunday, 30 August 2020

नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीवर बंदी घातली आहे. त्यामुळे 2 ते 5 जणच गणेश विसर्जनासाठी जाऊ शकणार आहेत.

नांदेड - मोठ्या उत्साहात आपण गणरायाचे स्वागत केले आहे. हा सण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहाने साजरा केले, परंतु सध्या भारताला नव्हे तर पूर्ण जगाला कोरोनाच्या संकटामुळे थांबावे लागले आहे. त्यामुळे गणेश उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीवर बंदी घातली आहे. त्यामुळे 2 ते 5 जणच गणेश विसर्जनासाठी जाऊ शकणार आहेत. या गोष्टींचा आढावा घेऊनच गेल्या 13 वर्षांपासून गणेश उत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या नावाने युवा प्रतिष्ठान, नांदेड शहर महानगरपालिका नांदेड, शहरातील विविध महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणावर होणारे जल प्रदूषण टाळण्यात यशस्वी ठरत आहेत.

हेही वाचानांदेड : वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर -

जल प्रदूषण रोखण्यात यश मिळविता येणार

lता. एक सप्टेंबर रोजी श्री विसर्जनाच्या वेगवेगळ्या मार्गावर शहरातील विविध महाविद्यालयातील युवक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थिनी, स्वयंसेवक, महापालिकेचे कर्मचारी थांबून गणेश मंडळांकडून अकरा दिवसांचे निर्माल्य (हार, दुर्वा, केळीचे खांब, कमळ आदी) मोठ्या सन्मानपूर्वक गोळा करणार आहेत. त्यामुळे होणारे मोठे जल प्रदूषण रोखण्यात यश मिळविता येणार आहे. या अभियानाचे प्रमुख प्रतिष्ठानचे निमंत्रक मिलिंद देशमुख व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी ढगे हे असणार असून या अभियानाला महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन यांचे विशेष सहकार्य असणार आहे.

सर्व गणेश मंडळांनी व गणेश भक्तांनी कृतीयुक्त सहभाग घ्यावा

तसेच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून, तोंडाला मास्क लावून योग्य पद्धतीने निर्माल्य गोळा केले जाणार आहेत. सध्या सर्व महाविद्यालय बंद असल्याने या अभियानात शहरातील सर्व गणेश मंडळांनी व गणेश भक्तांनी कृतीयुक्त सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे असे, आवाहन युवा प्रतिष्ठानचे निमंत्रक मिलिंद देशमुख यांनी केले आहे.

येथे क्लिक करा -  मुदखेड केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत सीआरपीएफ खेलो इंडिया -

 गणेश विसर्जनाला येतानाच अकरा दिवसांचे निर्माल्य वेगळे करून घेऊन यावे

तसेच सर्व सहभागींना मान्यवरांच्या सही असलेले प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्यांना या अभियानात सहभागी व्हायचे आहे. सर्व गणेश मंडळ, घरगुती गणपती  यांनी  गणेश विसर्जनाला येतानाच अकरा दिवसांचे निर्माल्य वेगळे करून घेऊन यावे, जेणेकरून ते नदीपात्रात जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन रवी ढगे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. डॉ. प्रशात तावडे, शहाजी भोसले, पद्माकर कुलकर्णी, दिगंबर करंडे, विकास मोरे, गणपत तावडे, संजय पावडे, सर्जेराव मुधोळ, माधव पवार, साईनाथ पवार, शाम रेंगे, बालाजी प्यारलेवार आदींच्या या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Active participation in Lokmanya Tilak Nirmalya Swachhta Abhiyan should be registered Milind Deshmukh nanded news