तंबाखू सेवन किती धोकादायक.......यासाठी वाचाच

Effects of Tobacco on Health
Effects of Tobacco on Health

नांदेड : भारत एक विकसनशील देश आहे. जगाच्या पाठीवर भारत प्रत्येक गोष्टीत अग्रेसर बनत आहे. सर्वात जास्त तरुणवर्ग भारतात आहे.पण हाच तरुणवर्ग व्यसनाच्या विळख्यात अडकलाय. जगात तंबाखूचे उत्पादन घेण्यात चीन नंतर दुसरा क्रमांक भारताचा लागतो. कारण आपल्या देशात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. युवा पिढी व्यसनाने अखंड बुडलेली आहे व व्यसनात मश्गुल झालेली आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. रविवारी (ता. ३१) जागतीक तंबाखू सेवन विरोधी दिन आहे. या निमित्ताने हा लेख.... (Effects of Tobacco on Health)

तंबाखूमध्ये चार हजार रसायने
खरंतर तंबाखू हे भारतातील नव्हे तर अमेरिकेत एक वनस्पती होती. लष्करातील शिपाई या तंबाखूचे सेवन करायचे. तुर्क सैनिकाकडून तंबाकूची सिगारेट म्हणून ब्रिटिश लष्कर सैनिकांनी हे व्यसन सुरू केले. व्यसनाच प्रमाण वाढत गेलं. पोर्तुगीजांनी तंबाखूची वनस्पती भारतात आणली. भारतात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तंबाखूच सेवन केलं जाऊ लागलं. तंबाखूमध्ये तब्बल चार हजार रासायनिक रसायने असतात. यात सर्वात महत्वाचा आणि हानिकारक रसायन म्हणजे निकोटिन होय. निकोटिन हे रसायन मानवाला तंबाखूचे सेवन करायला भाग पाडतं. निकोटिन हे मानवाच्या छोट्या मेंदूवर परिणाम करतं. आणि या निकोटिनचं प्रमाण शरीरात जाणं हेच माणसाला तंबाखू सेवन करण्याच्या सवयीत बांधून ठेवतं. माणसाला एकदा का निकोटिनची सवय लागली की तो वारंवार मग ते व्यसन करतो. जर त्याला वेळच्या वेळेवर ते तंबाखू अथवा इतर व्यसन मिळालं नाही तर त्याला मानसिक ताण येतो, मानसिक बेचैनी सुरू होते. जर त्या व्यसनी माणसाच्या शरीरात तेवढ्या प्रमाणात निकोटिन गेलं नाही तर तो चिडचिडपणा करतो, त्याचं डोकं चालत नाही. एकंदरीत तंबाखूमुळे मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक असे दूरगामी परिणाम होतात.

युवक वर्गातून व्यवसाला सूरवात
तंबाखूच व्यसन करायला सुरुवात ही सध्या युवक वर्गातून मोठ्या प्रमाणात होताना दिसते. याच कारणही तसंच रोमांचक आहे. तंबाखू असेल अथवा गुटखा याची आवरणे ही खूप आकर्षक असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पुड्या, पाकिटे असतात. तरुण वर्गातील मुलांना त्यात काय आहे याची उत्सुकता असते. चित्रपटात हिरो, हिरोईन सिगारेट ओढतात हे पाहून त्यांना ही करावंसं वाटतं. तसेच वडीलधारी मंडळी जर मुलांच्या देखत सिगारेट ओढतात, किंवा त्यांना पेटवून आणायला सांगतात. त्यामुळे मूलं उत्सुकतेने त्याला घेतात, ओढण्याचा प्रयत्न करता. पहिल्या दुसऱ्या वेळेस, थोडीशी चक्कर येणे, मळमळ होणे अस होतं. पण तरीही मित्रांच्या संगतीने असो की त्याला त्या तंबाकूच्या आवडीने असो तो ते व्यसन करू लागतो. त्याला त्रास होतो तरीपण तो खातो. मग एकदाका तंबाकू सेवन केले मग तो वारंवार करू लागतो. याचे रूपांतर सवयीत होते आणि मग व्यसन लागतं. तरुणवर्गच नाही तर आपल्या देशातील पुरुष व महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात या व्यसनात बुडालेले आहेत.

तंबाखूच्या सेवनाने अनेक दुष्परिणाम
तंबाखूच्या सेवनाने मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यात प्रामुख्याने कॅन्सर म्हणजेच कर्करोग होतो. यात तोंडाचा कर्करोग, ओठाचा, जबड्याच्या, फुफुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा व मूत्राशयाचा कॅन्सर इत्यादी तंबाखू सेवनाने होतात. भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ९० टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे कारण हे धूम्रपान आहे. तंबाखूमुळे छातीत दुखणे, हृदयविकार झटका येणे, रक्तवाहिन्याचे विकार इत्यादी रोग जडतात. जर धूम्रपान जास्त केले तर टी बी सुद्धा होऊ शकतो. जितके जास्त धूम्रपान तेवढा जास्त टी बी माणसाला होतो. तंबाखू शरीरातील धमण्याच्या पापूद्र्याला नुकसान पोहचवतात. धूम्रपान किंवा तंबाखू हे अचानक रक्तदाब वाढविते तसेच हृदयाकडे जाणार रक्तपुरवठा कमी करते. धूम्रपानामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त बळावते. तसेच रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होत जाते. जी व्यक्ती धूम्रपान करते तिला हृदयरोग व पक्षाघात हा न धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या तीप्पटिने लवकर होतो. 

तंबाखूच्या सेवनामुळे ताकत कमी होते
तंबाखूच्या सेवनामुळे शारीरिक ताकत कमी होते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते. तंबाखू सेवनाने तोंडाची दुर्गंधी, केसांची दुर्गंधी, डोळ्यांखाली काळेपणा येणे, दातांना इजा पोहोचणे हे परिणाम होतात. जर गरोदर स्त्री धूम्रपान करत असेल तर त्यांच्यात गर्भपाताच्या समस्या निर्माण होतात, मूल कमी वजनाचे भरते, बाळाचा अचानक मृत्यू देखील होऊ शकतो. तंबाखूच्या सेवनाने पुरुषांमध्ये नपुंसकत्व निर्माण होते. जगात दर आठ सेकंदात एका व्यक्तीचा मृत्यू धूम्रपान केल्यामुळे होतो. एवढे दूरगामी दुष्परिणाम करणारे रोग होत असले तरी तंबाखू खाणारे मात्र याला डोळेझाकून सेवन करतात.

आजची पिढी पूर्णपणे व्यसनाधीन
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीलाही याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. कारण सिगारेट ओढणारी व्यक्ती फक्त ३० टक्के धूर घेतो आणि उरलेला ७० टक्के धूर वातावरणात राहतो आणि इतरांवर परिणाम करतो याला अप्रत्यक्ष सेवन म्हणतात. एखादा व्यक्ती तंबाखू मळत असेल तर बाजूच्याला शिंका येतात हा तंबाकूचाच परिणाम आहे. याचा परिणाम लगेच समजत नाही तर याचे दूरगामी परिणाम होतात. खास करून युवावर्गात सिगारेटची विशेष वेळी एन्ट्री होते. नात्यातील जबाबदाऱ्या आणि वाढत चाललेल्या अपेक्षा यामुळे आजची पिढी पूर्णपणे व्यसनाधीन असल्याची प्रचिती जागोजागी येत आहे. त्यांना मानसिक आधार कुठेच मिळत नाही मग ते व्यसनाच्या आहारी जातात.

व्यसनाला अनेक कारणे
मुलगी नाही म्हणाली, नापास झालं, दगा दिला, पार्टी, गम झाला, खुशी झाली कोणत्याही प्रसंगी फक्त आणि फक्त एकच उपाय मानतात आणि मग पी दारू -ओढ सिगारेट असे नको नको ते मार्गांचा अवलंब करताना दिसून येतात. खरंतर तरुण पिढी आजकाल खूपच व्यसनाधीन होत चालली आहे. यामुळे देशाची प्रगती होईल का ? यात शंकाच आहे. महाराष्ट्र शासनाने व्यसनमुक्तीसाठीअनेक योजना राबवल्या. पण अयशस्वी. कारण आजच्या युवापिढीसाठी नुसत्या योजना राबवून चालणार नाही तर त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

तंबाखू सोडल्यास अनेक फायदे
तंबाखू सोडण्यास कधीच उशीर झालेला नसतो. तंबाकू जेंव्हा ही सोडला तेंव्हा त्यापासून होणाऱ्या दुष्परिणाम हे कमी होतील. तंबाखू सोडल्याने मानवाची शारीरिक आणि सामाजिक उन्नती होते. तंबाखू सोडल्यास हृदयरोग, उच्च रक्तदाब येणे हे धोके कमी होतात. तुम्ही धूम्रपान करत असल्यास त्याचा परिणाम सोबतच्यांवर होतो. आपल्यांवरच होतो तो होणार नाही. धूम्रपानामुळे होणारा नाहीसा होतो. तंबाखू सोडल्याने दात स्वच्छ व शुभ्र होतील. तंबाकू सोडल्याने खूप फायदे होतात. जसे तुम्ही तुमच्यावर नियंत्रण ठेऊ शकाल, आत्मशक्ती व आत्मविश्वास वाढेल. आज व यापुढे भविष्यात तुमी तुमच्या मुलांसाठी एक निरोगी पालक बनाल.

तंबाखूविरोधी उपक्रम राबविण्याची गरज
तंबाखूमुक्त भारत करण्यासाठी उपाययोजना ही तेवढीच ताकतीची करावी लागेल. आजची युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात लवकर अडकत आहे. यासाठी शाळा स्तरावरूनच प्रयत्न करावे लागतील. शाळेत तंबाखूविरोधी उपक्रम राबविणे. शाळेवर, शालेय स्टेशनरीवर तंबाखूविरोधी, जनजागृती विषयी घोषवाक्य लिहून ठेऊ शकता. विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी प्रबोधन होण्यासाठी व्याख्यान आयोजित करता येतील. तसेच रॅली काढणे, नाटक सादर करून जनजागृती करणे असे उपक्रम राबवता येतील. शालेय स्तरावर तंबाखू विरोधी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा इत्यादी आयोजित करून प्रबोधन करता येईल. अशाप्रकारे शालेय स्तरातुन संस्कार केले गेले तर निरोगी, सदृढ, व्यसनमुक्त आणि बलशाली नागरिक नक्कीच घडतील.

चला व्यसनमूक्त होऊ
सुखी जीवनाचा ध्यास घेऊ
सोडून धूम्रपान अन तंबाखू
निरोगी मोकळा श्वास घेऊ

-विजय वाठोरे (साहिल), नांदेड.
संपर्क क्रमांक : 9975593359

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com