का रखडली कबनूर नगरपरिषदेची मागणी?  

का रखडली कबनूर नगरपरिषदेची मागणी?  

कबनूरची लोकसंख्या सुमारे पंचावन्न हजार असताना आणि अनेक वर्षापासून कबनूरला नगरपरिषद व्हावी या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे गावचा विकास खुंटला असून अनेक नागरी सुविधांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकांची ससेहोलपट लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी कबनूरला नगरपरिषद व्हावी. या मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषण केले. जिल्ह्यातील लोकसंख्येने मोठे असलेल्या या गावाला स्वतंत्र पालिकेचा दर्जा हवा आहे. याबाबत वेध घेणारी मालिका आजपासून ... 


कबनूर : कबनूर, कोरोचीसह यड्राव आणि तारदाळ या चार गावांचा इचलकरंजी नगरपालिका हद्दीत समावेश करावा. याबाबत महाराष्ट्र शासनाने राजपत्र (गॅझेट) काढले. 1983 मधील या राजपत्राला राजकीय नेत्यांनी स्थगिती आणली होती. ही स्थगिती उठवण्यासाठी अनेक वर्षात विशेष प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे कबनूरसह चार गावांचा नगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव रेंगाळत पडला. 

कबनूरला स्वतंत्र नगरपालिका व्हावी. यासाठी एक याचिकाही दाखल झाली होती. दरम्यान कबनूरची लोकवस्ती प्रचंड प्रमाणात वाढली. मात्र कबनूरला नगरपालिका होऊ शकली नसल्याने कबनूरचा जवाहरनगर हा मोठा भाग, त्याचबरोबर जुना कोल्हापूर नाका परिसर आणि इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्था हे सर्व भाग इचलकरंजी नगरपालिकेत समाविष्ट झाले. 

कबनूरचे हे इतके भाग इचलकरंजी नगरपालिकेत समाविष्ट झाले तरीही कबनूरची आज लोकसंख्या सुमारे पंचावन्न हजार आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावास नागरी सुविधा पुरवणे आवाक्‍याबाहेर आहे. त्यामुळेच नागरी सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांचे अनेकवेळा मोर्चे ग्रामपंचायतीवर येतात. अनेकवेळा ग्रामपंचायत कामगारांचे पगार थकतात. गावचा विकास थांबला आहे. त्यामुळे आता कबनूरला नगरपरिषद होणे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

गावातील मुख्य चौकात सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय वसंत शिंदे, सुधाकर कुलकर्णी, उत्तम जाधव, दत्तात्रय संभाजी पाटील, अजित खुडे, महावीर लिगाडे, शांतीनाथ कामत, सुनील इंगवले, आदींनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. या उपोषणातील उपोषणकर्त्यांना सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधींनी व नेते मंडळीनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून कबनूरला नगरपरिषद होणे किती अत्यावश्‍यक आहे हे स्पष्ट झाले आहे. कबनूरपेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात नगरपरिषद झाली. त्यामुळे सहाजिकच कबनूरलाही नगरपरिषद व्हावी, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खासदार धैर्यशील माने यांनी कबनूर नगरपरिषदेसाठी मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री यांच्याशी चर्चा करुन नगरपरिषद करु, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र भविष्यात याबाबत ठोस निर्णय न झाल्यास लढा तीव्र होणार आहे. 
(क्रमश:) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com