सोलापूरच्या उपमहापौरांचे बंड ठरले "पेल्यातील वादळ' 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 18 मे 2020

प्रस्ताव मागे घेण्याच्या पत्रावर असा आहे मजकूर 
मे महिन्याच्या सभेत आयुक्तांच्या बदलीबाबत सभासद प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मात्र भाजपची ध्येय धोरणानुसार या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पालकमंत्र्यांनी आवश्‍यक त्या कार्यवाची आश्‍वासन दिल्याने सभासद प्रस्ताव मागे घेत असून, तो मे महिन्याच्या विषयपत्रिकेवरून वगळण्यात यावा. 

सोलापूर : आयुक्तांविरुद्ध केलेल्या तक्रारीबाबत आवश्‍यक ती चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री दत्तात्रय भामरे यांनी दिल्याने आयुक्त दीपक तावरे यांना शासनाकडे परत पाठविण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा, असे पत्र उपमहापौर राजेश काळे यांनी आज सोमवारी नगरसचिवांना दिले. त्यामुळे काळे यांनी आयुक्तांविरुद्ध पुकारलेले बंड हे पेल्यातील वादळ ठरले.

वाचा मूळ बातमी - आयुक्तांना शासनाकडे परत पाठवा

प्रस्ताव दिलेल्यांवर तो मागे घेण्याची नामुष्की येईल, असा अंदाज विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी दिला होता, त्यावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, सभेची पुरवणी सोमवारी प्रसिद्ध झाली. त्यामध्ये विषय प्रसिद्ध झाला आहे. आता सभेच्या वेळी हा विषय वाचनानंतर वगळण्यात येईल. 

बातमीचा पाठपुरावा - उपमहापौरांच्या प्रस्तावावरून कलगीतुरा 

श्री. काळे यांनी आयुक्तांविरुद्ध विविध आक्षेप नोंदवित ते अकार्यक्षम असल्याने त्यांना शासनाकडे परत पाठवा, असा प्रस्ताव दाखल केला होता. भाजपचे अविनाश बोमड्याल यांनी या प्रस्तावावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. हा प्रस्ताव दाखल झाल्यावर पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली. त्यावेळी हा प्रस्ताव वैयक्तिक आहे, त्याचा पक्षाशी काही संबंध नाही असे सांगत भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी या प्रस्तावातील हवाच काढून घेतली. 

हेही वाचा - सोलापुरातील कचरा उचलण्यासाठी नवा मक्तेदार

कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत प्रशासनाच्या पाठिशी राहून काम करणे आवश्‍यक आहे. काही मतभेद असतील तर चर्चेद्वारे मिटवता येतील. आम्ही आयुक्तांच्या पाठिशी राहणार अशी भूमिका विरोधी पक्षातील गटनेत्यांनी घेतली. त्याचवेळी हा प्रस्ताव डळमळणार हे स्पष्ट झाले. दरम्यान काल रविवारी आयुक्त तावरे लोकमंगल हॉस्पिटल कोरोनासाठी ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांची आमदार सुभाष देशमुख यांच्याशी भेट झाली. उपमहापौरांनी दिलेल्या प्रस्तावावर यावेळी चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर उपमहापौर काळे यांनी सोमवारी कार्यालयीन वेळ सुरु झाल्यावर काही वेळातच नगरसचिव कार्यालय गाठले आणि प्रस्ताव मागे घेण्याचे पत्र महापौर आणि नगरसचिव कार्यालयात दिले. पत्र देऊन ते तातडीने घरी परतले. त्यानंतर त्यांचा मोबाईल स्विच्ड ऑफ झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy mayor of Solapur withdraws proposal against commissioner