मागणी...! म्हणून करा `ही ` महापालिका बरखास्त

मागणी...! म्हणून  करा `ही ` महापालिका बरखास्त

सोलापूर : अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून लाखो रुपयांची बिले उचलण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस आला. त्यास सत्ताधारी भाजपचे आमदार आणि महापालिकेतील पदाधिकारी जबाबदार आहेत. महापालिकेच्या कारभारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने महापालिका बरखास्तीची मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे. 

नगरसेवकच मक्तेदार
नगरसेवकच मक्तेदार म्हणून काम करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा प्रकार केवळ प्रभाग चारपुरताच मर्यादित नाही, तर शहराच्या विविध भागांत याच पद्धतीने कामे सुरू आहेत. उघडकीस आलेला प्रकार तर फारच गंभीर आहे. प्रभाग आठमध्येही मोठ्या प्रमाणात अशी कामे झाली आहेत. सोलापूरकरांच्या कररूपी पैशातून ही कामे केली जात आहेत. अशा पद्धतीने गैरप्रकार होणे, ही गंभीर बाब आहे. जनतेच्या पैशाचे संरक्षण करणे हे आयुक्‍तांचे कर्तव्य आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्यांचे नगरसेवकपद त्वरित रद्द करावे. कोणाच्या तरी दडपणाखाली ही कारवाई झाली नाही तर पालकमंत्र्यांकडे महापालिका बरखास्तीची मागणी करण्यात येईल, अशीही मागणी पुढे आली आहे.

गैरप्रकारास विजय देशमुख जबाबदार - सपाटे 
महापालिकेत उघडकीस आलेल्या प्रकरणास आमदार विजय देशमुख जबाबदार आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच हा प्रकार केला आहे. केवळ प्रभाग चारच नव्हे तर ज्या प्रभागात भाजपचे नगरसेवक आहेत, तेथे आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व कामांची चौकशी करावी आणि तपासणी करावी. या सर्व प्रकरणांस देशमुख हेच जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा'', अशीही मागणी माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केली. दरम्यान, श्री. सपाटे यांनी केलेल्या आरोपासंदर्भात श्री. देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. 

हेही आवश्य वाचा - .. म्हणून वाढणार घोडेबाजार 

सर्वच कामांची चौकशी व्हावी ः महापौर 
शहरातल्या विविध भागांत झालेल्या सर्वच कामांची त्रयस्थपणे चौकशी व्हावी आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी भूमिका महापौर श्रीकांचना यन्नम यांनी मांडली. त्या म्हणाल्या, ""ज्यांनी महापालिकेच्या निधीचा गैरवापर केला आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. लोकविकासाची कामे झाली पाहिजेत; मात्र तीही नियमानुसार. बनावट सह्या करून महापालिकेचे नुकसान झाले असेल तर त्या प्रकरणातील केवळ अधिकारीच नव्हे, तर इतर दोषींवरही कारवाई व्हावी.'' दरम्यान, शहरातील सर्वच विकासकामांची तपासणी करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com