बेळगावः गणेशोत्सव मिरवणूक काळात त्रास देणाऱ्या मंडळांची यादी

संजय सूर्यवंशी
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

बेळगाव: गणेशोत्सव मिरवणूक काळात नाहक त्रास देणाऱ्या मंडळांची पोलिस खात्याने यादी बनवली आहे. शहरात जी संवेदनशील मंडळे आहेत, त्यांची यादी बनवून पुढील वर्षी त्यांच्याकडून हमीपत्र घेण्याचा निर्णय पोलिस आयुक्तालयाने घेतला आहे.

बेळगाव: गणेशोत्सव मिरवणूक काळात नाहक त्रास देणाऱ्या मंडळांची पोलिस खात्याने यादी बनवली आहे. शहरात जी संवेदनशील मंडळे आहेत, त्यांची यादी बनवून पुढील वर्षी त्यांच्याकडून हमीपत्र घेण्याचा निर्णय पोलिस आयुक्तालयाने घेतला आहे.

यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत काही मंडळांनी आपापसात वाद निर्माण करत विसर्जन मिरवणुकीत अडथळे आणले. टिळकवाडी येथील रघुनाथ पेठ व राजहंस गल्ली येथील दोन मंडळांनी विनाकारण वाद निर्माण केला, त्याचा परिणाम म्हणून मिरवणूक बराच काळ लांबली. विसर्जन मिरवणुकीचा अखेरच्या टप्प्यात शेवटी विसर्जन कोणी करायचे यावरुन 3 मंडळे अडून बसली. यामुळे मिरवणूक संपायला तब्बल तीन तास उशीर झाला. एका मंडळाला डॉल्बी बंद करण्यास सांगितल्यामुळे त्यांनी रस्त्यावरच ठिय्या धरला. परिणामी यामुळेही तासभर मिरवणूक रखडली. शहरात दरवर्षी धार्मिक तणावाची भीती असते. परंतु, यावर्षी अनेक मंडळांनी आपापसात वाद निर्माण करत मिरवणुकीला अडथळे आणले. यामुळे पोलिस खात्यातून प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे पोलिसांनी जी  मंडळे आगाऊपणा करतात अशा मंडळांची यंदा यादी बनविण्यास सुरुवात केली आहे.

पुढील वर्षी विसर्जन मिरवणुकीच्या आधी या मंडळांकडून हमीपत्र लिहून घेण्याचा विचार चालविला आहे. पोलिस आयुक्त टी. जी. कृष्णभट्ट यांनी याला दुजोरा दिला असून तशी यादी बनविली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. श्री कृष्णभट्ट दोन महिन्यांनी निवृत्त होणार आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी तशी सूचना भविष्यात येणार्‍या आयुक्तांना देऊन जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

अति आगाऊपणा नडणार
मिरवणूक काळात पोलीस अधिकारी कोणी कायदा हातात घेऊ नये म्हणून समोपचाराने भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु काही गणेशोत्सव मंडळ अति आगाऊपणा करत पोलिसांनाच धारेवर धरतात. त्यामुळे अशी मंडळे पोलिसांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या मंडळांकडून पाच ते दहा लाख रुपयांचे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. मिरवणूक काळात काही अनुचित प्रकार घडल्यास, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याला संबंधित मंडळ जबाबदार असेल असे हमीपत्रात लिहून घेण्यात येणार असल्याचे समजते.

Web Title: belgaum news ganesh festival 2017 dolby and police